Next
राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे उद्घाटन
BOI
Friday, August 10, 2018 | 12:26 PM
15 0 0
Share this story

ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वाद्यपूजन करताना मान्यवर.पुणे : ‘ढोल-ताशा वादन हे केवळ मोठया आवाजापुरते मर्यादित नाही, तर ती एक कला आहे. त्यातील ताल, मात्रा यांनाही नियम आहेत. सध्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये ढोल-ताशांचा मोठया प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे ढोल-ताशा वादन आणि वादकांना उज्ज्वल भविष्य असून, ही कला अशीच जोपासावी,’ असे प्रतिपादन संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकीज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ नातूबाग पटांगण येथे राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी वेंकीज उद्योग समूहाचे जगदीश बालाजी राव, भोला वांजळे, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सुनील गोडबोले, अशोक गावडे, मोहन ढमढेरे, बालकलाकार गौरी गाडगीळ, अपूर्वा देशपांडे, अनिल दिवाणजी, राजाभाऊ चव्हाण, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांनी उत्सवाला विशेष सहकार्य केले आहे.

स्पर्धेची माहिती देताना निवृत्ती जाधव म्हणाले, ‘राज्यभरातून स्पर्धेसाठी ३७ संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील १३, तर मुंबईतील ११ संघ आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी भागांतील १३ पथकेही सहभागी होत आहेत. ११ ऑगस्टला दुपारी १२ ते रात्री नऊ या वेळेत प्राथमिक फेरी व अंतिम फेरी होणार असून रात्री ९.३० वाजता ‘वेंकीज’चे संचालक बालाजी राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.’

सुर्यवंशी म्हणाले, ‘स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक विजेत्यांस अनुक्रमे पाच लाख, तीन लाख आणि दोन लाख रुपये, चतुर्थ क्रमांकास एक लाख आणि पाचव्या क्रमांकास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. पुण्यातील सहभागी पथकांना १० हजार, मुंबईतील पथकांना १५ हजार, तर इतर शहरातील सहभागी पथकांना २५ हजार रुपये दिले जातील. उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, तसेच उत्कृष्ट ताल वादकास प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेचे परीक्षण गुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे करतील.’

उद्घाटनप्रसंगी स्वाती दातार यांच्या स्वरदा नृत्यसंस्थेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. तत्पूर्वी सकाळी मंडईतील म्हसोबा मंदिरात श्रीं ची पूजा, होमहवन व धार्मिक विधी कलाकार वैष्णवी पाटील हिचे वडिल विजय पाटील आणि आई ज्योती पाटील यांच्या हस्ते पार पडले. अभिनेत्री अश्विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

ढोल-ताशा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी जगप्रसिद्ध तालवादक तालयोगी शिवमणी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील ढोल-ताशा वादकांना त्यांच्या वादनाची अनुभूती घेण्याची संधी मिळणार असून, सायंकाळी ५.३० वाजता नातूबाग पटांगणात त्यांच्या वादनाला सुरुवात होणार आहे.

( कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link