Next
थायलंडमधील संस्कृतच्या महाचक्रवर्ती
BOI
Monday, April 03, 2017 | 05:30 PM
15 7 0
Share this article:

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मभूषण सन्मान स्वीकारताना थायलंडच्या राजकुमारी महाचक्री सिरिन्धोर्नथायलंडच्या राजकुमारी महाचक्री सिरिन्धोर्न यांची विद्वान म्हणून, तसेच संस्कृत व पाली भाषेच्या तज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख आहे. संस्कृतप्रसारासाठीच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना गेल्या आठवड्यात पद्मभूषण सन्मान देऊन गौरवले. तसेच, काल, दोन एप्रिलला त्यांनी वयाची ६२ वर्षे पूर्ण केली. या दोन्हींच्या औचित्याने संस्कृतच्या महाचक्रवर्तींची ही ओळख...
....................

मुरलीमनोहर जोशी...शरद पवार...विराट कोहली...चमू कृष्णशास्त्री...
निवेदिका एका एका नावाची घोषणा करते आणि ते ते मानकरी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यास पुढे जातात. या नावांसोबतच एक नाव येते राजकुमारी महाचक्री सिरिन्धोर्न! उपस्थितांच्या चेहऱ्यावर संभ्रमाचे भाव. या बाई कोण, त्यांना हा मान कशासाठी? व्यासपीठावरून निवेदिका जाहीर करते, ‘परदेशी श्रेणीमध्ये पद्मभूषण सन्मान थायलंडच्या राजकुमारी महाचक्री सिरिन्धोर्न यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येत आहे.’ तरीही उलगडा होत नाही. संक्षिप्त परिचयामध्ये राजकुमारी महाचक्री यांचे संस्कृतच्या प्रचारात योगदान असल्याचे सांगण्यात येते. त्याने थोडीफार माहिती मिळते; परंतु पूर्ण संशय दूर होत नाही. 

गेल्या आठवड्यात झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यातील हे दृश्य. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. त्यातील काही नावांवर खळखळ होते, तर काही नावांचे मनःपूर्वक स्वागत होते. महाराष्ट्रातील लोकांच्या दृष्टीने शरद पवार हेच नाव जिव्हाळ्याचे असल्यामुळे त्यांची सर्वाधिक चर्चा होणे स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळे भारताशी अत्यंत जवळचा संबंध असलेल्या आणि भारताबद्दल कित्येकदा जवळीक प्रकट केलेल्या व्यक्तीबद्दल अनास्था न्याय्य ठरत नाही. महाराष्ट्रच नाही, अगदी देशपातळीवरही या राजकुमारींची म्हणावी तशी दखल घेतली गेल्याचे दिसले नाही. 

वास्तविक महाचक्री सिरिन्धोर्न यांचे नाव भारतीयांसाठी एवढेही अपरिचित असायचे काही कारण नाही. भारतातील अनेक शिक्षणसंस्थांनी त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. दिल्ली विद्यापीठाने त्यांना १९८७ सालीच साहित्यातील मानद पीएचडी बहाल केलेली आहे. भारत सरकारने २००४मध्ये इंदिरा गांधी शांती, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानाचा मॅगसेसे पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. असे असले तरी, त्यांचे हे कार्य आणि त्या कार्याला मिळालेली दाद फक्त विद्वानांच्या वर्तुळापुरती राहिली अन् चेहरे गोंधळलेले दिसायची वेळ त्यामुळेच आली.

संस्कृतसाठी दिलेल्या योगदानाबदल अगदी गेल्याच वर्षी त्यांना पहिला ‘जागतिक संस्कृत पुरस्कार’ देण्यात आला होता. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार देण्याची घोषणा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केली होती ती जागतिक संस्कृत परिषदेत २०१५मध्ये. बँकॉक येथे ती परिषदच मुळात झाली होती ती राजकुमारी महाचक्री सिरिन्धोर्न यांच्या आश्रयाने! त्या परिषदेत जाहीर केलेल्या पहिल्या संस्कृत पुरस्काराच्या मानकरी त्याच ठरल्या, यात काय नवल! मात्र त्यापूर्वीही महाचक्री सिरिन्धोर्न यांचा भारताशी जवळचा संबंध आलेला होता. 

थायलंडच्या राजघराण्यातील असूनही राजकुमारी सिरिन्धोर्न यांची विद्वान म्हणून स्वतःची ओळख आहे. प्रसात फानोम रंग या मंदिराबाहेरील संस्कृत शिलालेख हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. संस्कृत आणि पाली भाषेच्या तज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर त्यांची ख्याती आहे. जागतिक पातळीवर संस्कृत भाषेला सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्या ज्या प्रकारे प्रयत्न करत आहेत, ते अनेक भारतीयांना लाज वाटावी, असे आहेत. 

‘संस्कृत म्हणजे मानवजातीचा शाश्वत वारसा आहे,’ असे त्या म्हणतात. त्याचप्रमाणे संस्कृतच्या माध्यमातूनच भारतीय मूल्ये व संस्कृती थाई संस्कृतीत समाविष्ट झाल्याचेही प्रतिपादन करतात. शिवाय, ‘संस्कृतच्या प्रसारासाठी मी जे केले आहे, ते या क्षेत्रात अन्य विद्वानांनी केलेल्या कामाच्या तुलनेत महासागरातील केवळ एक थेंब आहे,’ असे सांगण्याची नम्रताही त्यांच्या अंगी आहे. 

सिरिन्धोर्न देबरतसुदा कितिवधनदुलसोभाक हे त्यांचे मूळ नाव. सिंहासनाच्या रांगेत त्यांचा क्रमांक दुसरा आहे. महाचक्री हे त्यांच्या उपाधीतील एक पद. थाई जनता त्यांना फरा थेप म्हणजे राजकुमारी देवदूत म्हणून ओळखते. संस्कृतच्या जाणकार असल्या, तरी सिरिन्धोर्न यांचे शिक्षण भारतात झालेले नाही, हे विशेष. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते संस्कृत साहित्यिक सत्यव्रत शास्त्री हे महाचक्री सिरिन्धोर्न यांचे शिक्षक. त्यांनीच १९७०च्या काळात सिल्पकोर्न युनिव्हर्सिटी या विद्यापीठात राजकुमारींना संस्कृत शिकवले होते. त्याकरिता त्यांचा थायलंडच्या राजघराण्याकडून दोनदा सन्मान झाला होता. नोव्हेंबरमधील राजकुमारींच्या भारत दौऱ्यातच त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र प्रकाशित केले होते. 

शास्त्री हे आग्नेय आशियाई भाषांमधील संस्कृत शब्दांच्या एका प्रकल्पावर काम करत होते. त्या वेळी त्यांना व्हिएतनामी-इंग्रजी शब्दकोश हवा होता. त्याच वेळेस राजकुमारींच्या खासगी संग्रहातील १२ हजार पुस्तके पाहण्याची संधी त्यांना मिळाली होती. शास्त्री यांना हवा असलेला शब्दकोश राजकुमारींच्या संग्रहात असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा, ‘अशी पुस्तके मिळणे खूप दुर्मिळ असते,’ असे त्यांनी सहज बोलता बोलता राजकुमारींना सांगितले; मात्र भारतात परतल्यानंतर काही आठवड्यांनी त्यांच्या हातात एक पुडके पडले. त्यात हा शब्दकोश होता. खुद्द राजकुमारींनीच तो पाठवला होता, अशी आठवण शास्त्रींनी अलीकडेच सांगितली होती. 

राजकुमारींच्या विनंतीवरून सत्यव्रत शास्त्रींनी थाई रामायणाचा संस्कृत अनुवाद केला होता. त्यांनी थायलंडवर संस्कृत काव्यही रचले आणि त्याचे भाषांतरही स्वतः राजकुमारींनी केले होते. आपले हे संस्कृत व भारतप्रेम त्यांनी आजही जपले आहे. दोन वेळेस जागतिक संस्कृत परिषदा आयोजित करून त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे. त्यांच्याच प्रयत्नाने आज बँकॉक विद्यापीठात संस्कृत अध्ययन केंद्र आहे. 

पद्म पुरस्कारांच्या निमित्ताने एका संस्कृतप्रेमी राजकन्येचा पुनःपरिचय घडवल्याबद्दल सरकारला धन्यवादच द्यावे लागतील. संस्कृत पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या आल्या असताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची त्यांनी भेट घेतली होती. ‘महाचक्री सिरिन्धोर्न यांच्यामध्ये भारत देश आपल्या विशेष मित्राला पाहतो,’ असे त्या वेळी राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले होते. ही घनिष्ठता शाही पातळीवर न राहता सामान्यांमध्ये प्रचलित व्हावी म्हणजे हितचिंतकांचा सन्मान होताना गोंधळलेले चेहरे पाहावे लागणार नाहीत!

- देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com 

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 7 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jagruti vaishnav About
Sanskrit should be taught in all school as a proper language with grammar n literature..
0
0
Saroj Lalit Vora About
Bahu bahu abhinandanani
0
0

Select Language
Share Link
 
Search