Next
नूर मोहम्मद साठे
BOI
Sunday, November 25, 2018 | 10:53 AM
15 0 0
Share this article:

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या आठव्या दिवशी (२४ नोव्हेंबर २०१८) ‘नूर मोहम्मद साठे’ हे नाटक सादर झालं. ९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेलं हे नाटक ‘श्री जाकादेवी देवस्थान, खालगाव’ या संस्थेनं सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
..........
नृत्यांगना इला आणि कादंबरीकार सुगथ यांच्या वैवाहिक जीवनात येऊन गेलेल्या एका लहानशा, पण झंझावाती वादळाची ‘नूर मोहम्मद साठे’ ही गोष्ट. लग्नाच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला इला आणि सुगथ एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जातात. तिथं खाणं-पिणं सुरू असतानाच एका बाजूला अंधारात दबा धरून बसल्यासारखा दिसणारा एक जण अचानक जवळ येतो आणि सुगथनं अडवताच ‘माझं तुमच्या बायकोवर प्रेम आहे,’ असं सांगू लागतो. सुदृढ शरीरयष्टीचा सुगथ त्या काटकुळ्या माणसाला चांगलंच बदडून काढतो.

दोघं अस्वस्थ मनानं घरी परततात. सुगथ पुन्हा मद्यपान करू लागतो. इतक्यात दारावरची घंटा वाजतो. मघाशी हॉटेलातली मारामारी सोडवणारा वेटर दारात उभा. सुगथचा राहिलेला कोट आणि इलाची पर्स त्यानं आणलेली असते; पण आपण मारामारी केली त्या भरात ती पर्स विसरली असेल, असं न वाटता ‘ती पर्स तुझ्याकडे कशी आली, तू ती बाजूला ठेवली नाहीस ना,’ अशा शंका सुगथ काढत बसतो. त्या प्रसंगावरून इला आणि सुगथ यांच्यात वाद होऊ शकतो. हिच्या आयुष्यात दुसरं कुणी आलंच नसेल? पहिला आणि एकमेव पुरुष मीच असेन, असे प्रश्न सुगथच्या मनात येऊ लागतात. इथूनच पुढे सुरू होतं ते वादळ....!

‘नूर मोहम्मद साठे’ या प्रेमानंद गज्वीलिखित नाटकाचं हे कथानक. श्री जाकादेवी देवस्थान, खालगाव या संस्थेच्या कलावंतांनी ते सादर केलं. अविनाश पांचाळ यांच्या दिग्दर्शनाखाली ते रसिकांपुढे आलं....

मघाचा तो काटकुळा माणूस पोलिसांत तक्रार देतो. इकडे तो वेटर ‘तो माणूस एक कोटी रुपये मागतोय,’ असं सांगतो. कारण एवढ्या मोठ्या हॉटेलात मारामारी झाली, ही गोष्ट बाहेर फुटू द्यायची नाहीये. पोलीसही त्यांना परस्पर मिटवण्याचा सल्ला देतो.

तो काटकुळा माणूस म्हणजेच नूर मोहम्मद साठे. तो चित्रकार आहे. त्याला इलाचं एक चित्र काढायचंय, बस्स, एवढंच. मग तो पोलिसांत जाणार नाही. ही तडजोड सुगथला पटते. चित्रकलेचं साहित्य घेऊन नूर घरी येतो. आपल्याला विचारल्याशिवायच हे चित्राचं ठरलं, हे पसंत नसलेली इला नूरचं नाव ऐकताच त्याच्याबद्दल काही आडाखे मनात बांधते. त्यात त्याचं विचित्र वागणं, चमत्कारिक बोलणं... शेवटी इला साडी नेसून चित्राला पोझ देण्यासाठी येते; पण चित्र पुरं होता होता कुठे तरी बिघडतं.

नूर सुगथवर भडकतो. इलाचं एक नृत्य पाहताना तिचं चित्र काढायला घेतलं आणि मध्येच कुणी तरी उभं राहिल्यानं सारं काही बिघडलं, असा पुष्कळ दिवसांपूर्वीचा एक प्रसंग नूर सांगतो. मध्येच उभ्या राहिलेल्या मनुष्यावर तो ओरडतो, ‘खाली बस, हरामखोरा!’

अरे! नेमकं हेच वाक्य मघाशी इलाला सुगथनं सांगितलं होतं. तीन वर्षांपूर्वीची आठवण उजळताना.... ‘स्वरांचं चांदणं, शब्दांची बहार आणि तुझा पदन्यास...!’ तिच्या नृत्याला दाद देत आवेगानं उभ्या राहिलेल्या सुगथला त्या वेळी हेच शब्द ऐकू आलेले असतात. 

नूर मोहम्मद साठेचे चित्र काढण्याचे प्रयत्न सुरूच राहतात. दोन-तीन दिवस ती नृत्याच्या पोझ देत असते. नृत्य करत राहते. करता करता थकून जाते; पण चित्र मनासारखं होत नाही. बारा वेळा कॅनव्हास फाडला जातो; पण पूर्णता नाही. शेवटी एकाकी नूर आपल्या छातीत सुरा खुपसून घेतो, खाली पडतो, हालचाल थांबते. इला त्याच्या कलेवराशेजारी विमनस्कपणे बसून राहते. एकटा पडल्याच्या भावनेनं जवळच सुगथ रिकाम्या मनानं उभा राहतो. पडदा पडतो!

कथानक गुंतागुंतीचं, तसंही म्हणण्यापेक्षा मध्यंतरानंतर अधिक गूढ झालेलं. मध्यंतरापूर्वी प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शेवटपर्यंत मिळत नाहीत; पण असं असलं, तरी सुगथ, इला आणि नूर ही पात्रं कलावंतांनी समर्थपणे सादर केली आहेत. सुगथच्या भूमिकेत संजय घाणेकर यांनी, संशयाचं भूत मनात शिरलेला, शीघ्रकोपी आणि एकाकी पडत चाललेला मनुष्य प्रत्ययकारी रीतीनं उभा केलाय. मानसी पाथरे या युवा कलावतीचं सहजसुंदर नृत्य आणि प्रसंगानुरुप बदलणारा प्रतिसाद दाद देण्याजोगा. कुरळे, भरपूर वाढलेले केस राखलेला, भरगच्च डिझाइनचे शर्ट घालणारा, भेसूर आणि गूढ हसणारा कलंदर नूर, दिग्दर्शक अविनाश पांचाळ यांनीच सादर केलाय. नेपथ्यही त्यांचंच आहे. त्यातलं नावीन्य आणि रेखीवपणा नजरेत भरतो.

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रत्नागिरीतील शिवोली सेवा मंडळ ‘कॉफिन’ हे नाटक सादर करणार आहे. या स्पर्धेतील सर्व नाटकांचे परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राकेश गोताड About 264 Days ago
नाटक खूप छान झाले अप्रतिम
0
0

Select Language
Share Link
 
Search