Next
पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, September 26, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सलग नवव्या वर्षी एक ते आठ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन, कोथरूड येथे होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती डॉ. कुमार सप्तर्षी, संस्थेचे सचिव अन्वर राजन यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी युवक क्रांती दलचे सचिव संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष मयुरी शिंदे, नितीन शास्त्री आदी उपस्थित होते.  

गांधी सप्ताहाचे उद्घाटन सिक्कीम राज्याचे माजी प्रांतपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते एक ऑक्टोबरला सायंकाळी  पाच वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘युवक क्रांती दल’ यांनी केले आहे. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी असतील.

सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला ७१ वर्षांनंतरही सांगणे अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. गांधी सप्ताहादरम्यान गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे शांती मार्चचे आयोजन करण्यात येते. हा शांती मार्च सकाळी नऊ वाजता होणार असून, अलका चौक, सेनापती बापट पुतळा ते लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मंडई येथे त्याची समारोप सभा होईल.’

गांधी सप्ताह उद्घाटनाआधी महात्मा गांधींच्या जीवनकार्यावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन एक ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. हे उद्घाटन गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अभय छाजेड यांच्या हस्ते कला दालन, बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे संयोजक नितीन शास्त्री आहेत. खादी व विविध उपयोगीचे स्टॉल सप्ताहादरम्यान गांधी भवन आवारात उपलब्ध असतील.

दोन ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता गांधी भवन येथे शुभांगी मुळे व सहकलाकार यांचे प्रार्थना व भजन, सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत प्रसाद भोजन आणि त्यानंतर ‘गांधी’ फिल्म शो सादरीकरण होईल. तीन ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता ‘लाइफ इज ब्युटीफुल’ (१९९७) हा ऑस्कर विजेता चित्रपट दाखवला जाईल. सायंकाळी सहा वाजता ‘शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन कधी?’ विषयावर परिसंवाद होईल. यात कृषी मूल्य आयोगचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी सुकाणू समितीचे सचिव अजित नवले, स्वामिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, आमदार बच्चू कडू सहभागी होतील.

चार ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता ‘बेन-हर’ (२०१६) या १९५९च्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक दाखवण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ विषयावर विवेकानंदांचे अभ्यासक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची मुलाखत व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल. पाच ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता ‘अजात’ हा जाती अंताचा पुरस्कार करणार्‍या अजात पथावरील माहितीपट दाखविण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता ‘अघोषित आणीबाणीचे आव्हान’ या विषयावर पत्रकार निखिल वागळे यांच्याशी मुक्त संवाद होईल. सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल.

सहा ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता चार्ली चाप्लीनचा गाजलेला चित्रपट ‘मॉडर्न टाइम्स’ दाखवला जाईल. ‘गांधी की खोज’ या विषयावर दिल्ली विश्वविद्यापीठाचे प्रा. अपूर्वानंद झा यांच्याशी सकाळी ११ वाजता मुक्त संवाद, तर सायंकाळी सहा वाजता त्यांचे व्याख्यान होईल. सात ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता माधव कुलकर्णी या गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकावरील माहितीपट दाखवला जाईल. सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध जादूगार संजय रघूवीर याचे ‘जादूचे प्रयोग’ होतील. सायंकाळी सहा वाजता पवन नाईक आणि सहकलाकार यांचे ‘सुफी दरबार’ गाण्याचा कार्यक्रम होईल.

गांधी सप्ताह उद्घाटनाविषयी :
दिवस :
एक ऑक्टोबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन, कोथरूड, पुणे.

छायाचित्र प्रदर्शन उद्घाटनाविषयी :
दिवस :
एक ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : कला दालन, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
किरण जगताप About 144 Days ago
खुपच छान उपक्रम. डॉ. कुमार सप्तर्षी चाहता अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या घ्याव्यात ही विनंती. पत्रकार प्रा. किरण जगताप कर्जत जि.अहमदनगर 88 30 52 22 75
0
0

Select Language
Share Link