Next
अनधिकृत व्यवहारांतून होणारे नुकसान कसे टाळाल?
BOI
Saturday, September 08, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

ऑनलाइन किंवा डिजिटल आर्थिक व्यवहार अगदी सहजपणे केले जात असले, तरी त्यातील असुरक्षितता हा कॉसमॉस बँकेतील एटीएम हॅकिंग प्रकरणामुळे चर्चेचा विषय झाला आहे. बँक खात्यातून हॅकिंग/फिशिंग किंवा अन्य कारणांनी होणाऱ्या अनधिकृत व्यवहारांबाबत ग्राहकांच्या व बँकेच्या जबाबदारीसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. तातडीने तक्रार केल्यास ग्राहकाला नुकसान टाळता किंवा कमी करता येते. त्याविषयी जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
......
सध्या डिजिटल बँक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. विशेषत: निश्चलनीकरणानंतर डिजिटल पेमेंट हा तर परवलीचा शब्दच होऊन गेला. याचा दृश्य परिणाम म्हणजे गेल्या दीड वर्षात भीम, यूपीआय, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, वॉलेट पेमेंट यांचा वापर वैयक्तिक, संस्थात्मक व सरकारी आर्थिक व्यवहार करताना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. यातील सुलभता, तत्परता व पारदर्शीपणामुळे दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांत लक्षणीय वाढ होत आहे. असे असले, तरी यातून काही प्रमाणात अनधिकृत व्यवहार वरचेवर होत असल्याचे दिसून येते. असे अनधिकृत व्यवहार कधी ग्राहकाच्या चुकीमुळे/हलगर्जीपणामुळे, कधी बँकेच्या चुकीमुळे, कधी ग्राहक व बँक यांची चूक नसतानासुद्धा कोणी त्रयस्थाने केलेल्या हॅकिंग/फिशिंग किंवा डेटा चोरी यांसारख्या कृत्यामुळे होत असतात. अशा व्यवहारांतून ग्राहकाच्या होणाऱ्या नुकसानाबाबतचे दायित्व ठरविण्याबाबत रिझर्व्ह बँकेने जुलै २०१७मध्ये काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचनांबद्दल आज आपण माहिती घेऊ.

- ज्या अनधिकृत व्यवहारात ग्राहकाची अथवा बँकेची चूक नसेल व असा व्यवहार कोणी त्रयस्थाने केलेल्या हॅकिंग/फिशिंग किंवा डेटा चोरीमुळे झाला असेल आणि होणाऱ्या नुकसानाची एसएमएस/मेल/फोनद्वारे सूचना मिळाल्यापासून तीन कामकाजी दिवसांच्या आत ग्राहकाने बँकेला सूचना केल्यास ग्राहकाला संपूर्ण नुकसानभरपाई देणे बँकेला बंधनकारक असते.

- ग्राहकाच्या हलगर्जीपणामुळे असा अनधिकृत व्यवहार झाल्यास बँकेस कळवेपर्यंत होणाऱ्या संपूर्ण नुकसानाची जबाबदारी ग्राहकाची असते.

- अनधिकृत व्यवहारात ग्राहकाची, तसेच बँकेचीही चूक नसेल आणि असा व्यवहार कोणी त्रयस्थाने केलेल्या हॅकिंग/फिशिंग किंवा डेटा चोरीमुळे असेल आणि होणाऱ्या नुकसानीची एसएमएस/मेल/फोनद्वारे सूचना मिळाल्यापासून चार ते सात दिवसांच्या आत ग्राहकाने बँकेला सूचित केल्यास अशा व्यवहाराची ग्राहकाची जबाबदारी कमीतकमी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये इतकी असते. खात्याचा प्रकार किंवा व्यवहारासाठी वापरलेल्या ‘फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट’वर ते अवलंबून असते.

वरील माहितीवरून, आपल्या असे लक्षात येईल की, आपल्या बँक खात्यावरील अनधिकृत व्यवहार शक्य तितक्या लवकर आपण बँकेस कळविला, तर आपले नुकसान टाळता येते किंवा कमी करता येते. यासाठी झालेला प्रत्येक व्यवहार आपल्याला त्वरित कळावा म्हणून आपण आपला मोबाइल नंबर बँक खात्याला लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपला ई-मेल आयडी बँकेकडे नोंदवावा. यासाठी बँकांनीही २४/७ टोल फ्री नंबर, एसएमएस सुविधा ग्राहकांना देणे जरूरीचे आहे.

अनधिकृत व्यवहारांबाबतची सूचना बँकेला त्वरित फोनवर देऊन, नंतर शक्य तितक्या लवकर समक्ष बँकेत जाऊन ती लेखी स्वरूपात देऊन त्याची सबंधित अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याने पोहोच घ्यावी. याशिवाय आपल्या खात्याबाबतची कुठलीही माहिती कुणालाही समक्ष अथवा फोनवर, तसेच ई-मेलने देऊ नये. अशा माहितीची मागणी झाल्यास समक्ष बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यास लेखी स्वरूपात देऊन, संबंधित अधिकाऱ्याच्या सही-शिक्क्याने पोहोच घ्यावी. 

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search