Next
पुणे सराफ असोसिएशनतर्फे शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 04:51 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुणे सराफ असोसिएशनतर्फे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने १५ शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. नीतू मांडके सभागृहात हा कार्यक्रम झाला.  

पुणे सीआरपीएफचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) बिरेंद्र कुमार टोप्पो यांच्या हस्ते ही मदत शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात आली. या वेळी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष नितीन अष्टेकर, सचिव अमृत सोलंकी, सहसचिव राजाभाऊ वाईकर, खजिनदार कुमारपाल सोलंकी, कार्यक्रमाच्या समितीचे अध्यक्ष विपुल अष्टेकर, पुणे सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट सचिन गायकवाड, असिस्टंट कमांडंट संतोष भोसले यांबरोबरच पुणे सीआरपीएफचे जवानदेखील उपस्थित होते.  

पुलवामा हल्ल्यातील शहीद रोहितदास लांबा, गुरू एच., नारायण लाल गुर्जर, हेमराज मीना, रमेश यादव, संजय राजपूत, कौशल कुमार रावत, प्रदीप सिंग, श्याम बाबू, अजित कुमार आझाद, नितीन राठोड, भगीरथी सिंग, जयमल सिंग, पंकज कुमार त्रिपाठी, कुलविंदर सिंग या महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश व कर्नाटकातील जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करीत त्यांना एक लाखांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

या वेळी बोलताना बिरेंद्र कुमार टोप्पो म्हणाले ‘‘सीआरपीएफ’च्या या १५ शहीद जवानांच्या कुटुंबियांना असोसिएशनने जी आर्थिक मदत देऊ केली आहे ती मदत ही केवळ त्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नाही, तर ‘सीआरपीएफ’मध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्व जवानांच्या कुटुंबियांना केली आहे असे आम्ही मानतो. या मदतीमुळे आम्हा सर्व जवानांच्या मनात एक आंतरिक समाधानाची भावना निर्माण झाली आहे.’ 

‘युद्ध सीमेवरील असो अथवा देशाच्या आंतरिक भागातील त्याची सर्वांत मोठी किंमत ही शहिदांच्या कुटुंबियांना द्यावी लागते. त्यामुळे आम्ही लढत असताना शहीद झालो तर आमच्या मागे आमच्या कुटुंबियांना मदत करायला आपल्या देशातील नागरिक नक्की उभे राहतील हा विश्वास आम्हाला आला आहे. आम्ही करीत असलेल्या बलिदानाची किंमत नागरिकांना आहे, याचे आम्हाला समाधान आहे,’ असे टोप्पो यांनी सांगितले.

‘‘सीआरपीएफ’चे काम हे तीनही सैन्य दलाच्या तोडीस तोड तर आहेच याबरोबरच देशांतर्गत भागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीदेखील आम्ही कार्यरत असतो. आज देशाची अंतर्गत सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची असून, गणपती असो, रथयात्रा असो, नक्षली हल्ला असो वा कोणतीही निवडणूक आम्हाला नेहमीच सज्ज असावे लागते. त्यामुळे आमची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. सरकारने आमच्यावर दिलेली ही जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न आमचा प्रत्येक जवान करीत असतो,’ असेही टोप्पो यांनी नमूद केले.


या उपक्रमाविषयी बोलताना रांका म्हणाले, ‘देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती आदर सगळेच व्यक्त करतात; मात्र तो जवान गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची होणारी आर्थिक अडचण लक्षात घेत पुणे सराफ असोसिएशनने या शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे आमच्या सभासदांना आम्ही आवाहन केले. सभासदांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली. त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश व कर्नाटकातील १५ जवानांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत करू शकलो. याच्या पुढच्या टप्प्यात शहिदांच्या आणखी कुटुंबियांना आम्ही नक्की मदत करू.’

‘एखादा जवान शहीद झाला की त्याच्या अंत्ययात्रेला हजारो, लाखो लोक जमतात, त्याचे कौतुक होते, त्याच्या बलिदानाचे पोवाडे गायले जातात; मात्र काही महिने, वर्षे गेली की त्या शहिदाबरोबरच त्याच्या कुटुंबियांचादेखील सर्वांना विसर पडतो. या वेळी त्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी आणि वीरमुलांबरोबर हलाखीच्या आर्थिक परिस्थितीखेरीज कोणीही उरत नाही. या आर्थिक संकटात असोसिएशनने दिलेली हा आर्थिक मदतीचा हात त्या कुटुंबियांसाठी खूप मोठी मदत आहे,’ असे मत सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले.  

या वेळी शहीद प्रदीप सिंग यांच्या पत्नी नीरजदेवी आणि श्याम बाबू यांचे चुलत भाऊ सुरेश कुमार यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. फत्तेचंद रांका यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजाभाऊ वाईकर यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search