Next
‘इफ्फी’च्या निमित्ताने...
BOI
Wednesday, November 21, 2018 | 03:51 PM
15 0 0
Share this article:


गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’ २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात ६८ देशांमधील २१२ चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात ४५ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. २०१८ हे या महोत्सवाचे ४९वे वर्ष आहे. त्या निमित्ताने, ‘इफ्फी’ची सुरुवात कशी झाली, या महोत्सवातील काही महत्त्वाचे टप्पे कोणते आणि अन्य आनुषंगिक बाबींचा आढावा घेणारा अनिरुद्ध प्रभू यांचा हा विशेष लेख...
............
अभिनेते देव आनंद आणि विजय आनंद१९५१च्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यावर विचार केला गेला आणि ती कल्पना तत्काळ अंमलात आणली गेली. त्या काळात संपूर्ण आशियामध्ये एकही चित्रपट महोत्सव भरवला जात नव्हता. तेव्हा हा महोत्सव सुरू झाल्याने सांस्कृतिक वर्चस्व सिद्ध होईल हा विचार केला गेला. ही कल्पना सुचण्यामागे काही अंशी तत्कालीन सुपरस्टार देव आनंद आणि त्यांचे बंधू विजय आनंद यांचाही वैचारिक सहभाग असल्याचे म्हटले जाते; मात्र त्याला ठोस पुरावा आढळत नाही. कारण काहीही असले, तरी त्या निमित्ताने आशियातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारतात भरवला गेला आणि आजच्या घडीला जगात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘इफ्फी’ची सुरुवात झाली.

पहिल्यांदा १९५२मध्ये २४ जानेवारी ते एक फेब्रुवारी या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या महोत्सवाचे आयोजन कोण्या एकाच शहरात न करता, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या देशातील चार प्रमुख शहरांमध्ये विभागून करण्यात आले होते. प्रत्येक शहरात हा महोत्सव समर्थपणे आयोजित केला गेला. त्या वेळी अमेरिकेसह जवळपास २३ देश त्यांचे ४० चित्रपट आणि १००हून अधिक लघुपट घेऊन या महोत्सवात सहभागी झाले होते. संपूर्ण आशियामध्ये अशा प्रकारचा महोत्सव आधी कुठेच झाला नव्हता. परिणामी या सगळ्या महोत्सवाची व्यवस्था चोख व्हावी म्हणून अनेक ठिकाणी भारतीयांच्या ‘जुगाडू’ वृत्तीप्रमाणे अनेक वेगळे वेगळे प्रयोग केले गेले. त्यात मग ‘ओपन एअर थिएटर’ची संकल्पना सांगणारा, बांबूच्या साह्याने स्टेज आणि थिएटर बांधण्याचा प्रयोगही याच काळात झाला.

आशियातील पहिला महोत्सव म्हणून या महोत्सवाचे वेगळे महत्त्व असले, तरी हॉलिवूडपट आणि भारतीय चित्रपट यांना एकाच छताखाली आणण्याचे श्रेयदेखील याच महोत्सवाला जाते. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या चित्रपट आणि मनोरंजन मंत्रालयाच्या विनंतीवरून त्यांचे प्रतिनिधी म्हणून फ्रँक काप्रा भारतात आले. त्यांच्या या भारतभेटीमुळे पुढे अनेक हॉलिवूड स्टार भारतात आले आणि येत राहिले. पुढील काही वर्षांत, त्या वेळी तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला ग्रेगरी पीक भारतात आला. फ्रँक काप्रा यांनी तर भारतात आल्या आल्या सगळ्यात आधी ‘मुघल-ए-आझम’साठी खास तयार केला गेलेला शीशमहल पाहण्याची इच्छा पूर्ण करून घेतली. संपूर्ण काचेच्या असलेल्या त्या वास्तूत मोठ्या प्रमाणात प्रकाश परावर्तित होत असतानाही, भारतीय तंत्रज्ञ त्यात कसे काम करतात, याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. पुढे ते मधुबालालाही भेटले. त्या वेळी त्यांनी तिला हॉलिवूडमध्ये नेण्याची तयारीही दाखवली होती; पण तेव्हा ते शक्य झाले नाही. मधुबाला तेव्हा हॉलिवूडमध्ये गेली असती, तर पुढील काळात तिच्या आयुष्याचा आलेख कदाचित काही तरी वेगळा असता.

या पहिल्या चित्रपट महोत्सवात राज कपूरचा ‘आवारा’, तेलुगूमधील ‘पाताळ भैरवी’, बंगालीमधील ‘बाबल’ आणि मराठीतला ‘अमर भूपाळी’ असे एकूण चार भारतीय चित्रपट दाखवले गेले. अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेल्या काप्रा यांनी या काळात अनेक भारतीय चित्रपट बघितले. या सगळ्यांत ‘संत तुकाराम’ हा मराठी चित्रपट जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला जागतिक ओळख मिळवून देतो ही त्यांची विशेष नोंद आपल्याला बरेच काही सांगून जाते.

सुरुवातीचे दोन महोत्सव हे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले; मात्र १९६२ला झालेला तिसरा महोत्सव हा स्पर्धात्मक झाला. त्याला स्पर्धेचे स्वरूप आले. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. म्हणून याच वर्षीपासून या स्पर्धेतील सर्वोत्तम चित्रपटासाठी ‘गोल्डन पीकॉक’ अर्थात ‘सुवर्णमयूर’ पुरस्काराची सुरुवात झाली. तसेच सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसाठी ‘सिल्व्हर पीकॉक’ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुढे २०१३मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीने शंभर वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने या पुरस्कारांमध्ये आणखी एका नवीन पुरस्काराची भर पडली. ती म्हणजे ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ दी इयर’ या पुरस्काराची. २०१३पासून आजपर्यंत सहा जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

१९५२च्या पहिल्या महोत्सवाचे आयोजन चार शहरांत झाले होते. त्यानंतरची पुढची ३३ वर्षे महोत्सव आयोजनाचा मान मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद असा सतत बदलत राहिला. अखेर २००४पासून गोव्यात त्याला कायमचे स्थान देण्यात आले. तेव्हापासून आजवर गोव्याचे हे स्थान कायम आहे.

यंदाच्या (२०१८) या महोत्सवाचे बिगुल वाजले असून, पुढील वर्षी संपूर्ण भारत या महोत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करील. संपूर्ण जगभरात चित्रपटांत, त्याच्या माध्यमांत, तो प्रदर्शित करण्याच्या पद्धतींत अनेक बदल झालेले दिसतात, तसेच काही बदल या महोत्सवांमध्येही होताना दिसतात. गेल्या काही वर्षांत भारतातील दर्दी प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. तसेच विविध विषयांची सांगड घालून आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवांची संख्याही वाढत आहे. हे चित्र निश्चितच आशादायी आहेच. त्याहीपेक्षा एक रसिक म्हणून, एक भारतीय म्हणून मान उंचावणारे आहे हे नक्की. अर्थात या सगळ्याचे पहिले श्रेय ‘इफ्फी’ला जाते, हे मात्र वेगळे सांगायची गरज नाही.

संपर्क : अनिरुद्ध प्रभू, वेंगुर्ला
मोबाइल : ७७५६९ ६२७२१

(अनिरुद्ध प्रभू ब्लॉगर असून, प्रामुख्याने चित्रपटविषयक लेखन करतात.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search