Next
सहावीपासूनच मुले शिकणार थ्री-डी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स
पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये मिळणार प्रशिक्षण
BOI
Saturday, June 08, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या ‘राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग’मध्ये शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन थ्री - डी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स प्रशिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका शाळेच्या माध्यमातून असे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी ही देशातील अग्रेसर शाळा बनली आहे. ही शाळा विविध अभिनव उपक्रमांमुळे देशात मॉडेल बनलेली असून, गेली आठ वर्षे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता राखून शंभर टक्के निकालाची परंपराही शिवदर्शन येथील या शाळेने जोपासली आहे,

या प्रकल्पाचा पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी याची माहिती दिली. ‘थ्री - डी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स ही नव्या युगाची शैक्षणिक गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देत असतानाच त्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग’मध्ये थ्री - डी प्रिंटिंग व रोबोटिक्सच्या दोन स्वतंत्र लॅब उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम शिक्षकांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रोज एक तास प्रशिक्षण देतील. विद्यार्थ्यांच्या एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत विविध प्रकारचे प्रकल्प त्यांच्याकडून करून घेतले जातील. सध्या थ्री - डी प्रिंटिंग व रोबोटिक्सचे प्रशिक्षण केवळ इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्येच दिले जाते; 
मात्र सहावीपासूनच विद्यार्थ्यांना याचे शिक्षण दिल्यास त्यांचा पाया मजबूत होऊन भविष्यात इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल, मेडिसिन, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांत हे विद्यार्थी अधिक चमकतील. तसेच विज्ञान, शरीरशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल अशा प्रत्येक क्षेत्रात हे विद्यार्थी थ्री - डी प्रिंटिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष नकाशा साकारणे, शरीराचे विविध अवयव साकारणे इत्यादी प्रयोग करतील. पारंपरिक पुस्तकी अभ्यासाला प्रत्यक्ष मॉडेलची जोड दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्या विषयाचे त्यांचे ज्ञानही अधिक वाढेल.’ 



पुण्यातील ‘स्निकपिक थ्री – डी’ या कंपनीतर्फे शाळेतील शिक्षकांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे आबा बागुल म्हणाले. ‘यासाठी ‘राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग’मध्ये दोन सुसज्ज वातानुकुलित लॅब उभारण्यात आल्या असून, येथील विद्यार्थ्यांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेच्या अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील येथे प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या प्रकल्पातील प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना बहुपयोगी रोबो तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करता येईल. तसेच घरगुती वापरासाठीचे अनेक प्रकारचे छोटे रोबोटदेखील विद्यार्थी तयार करू शकतील. त्यासाठीचे सर्व साहित्य शाळेतर्फे उपलब्ध करून दिले जाईल.’ 



‘विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या रोबोटचे अनोखे प्रदर्शनही शाळेत भरवले जाईल व त्यातून अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल,’ असे आबा बागुल म्हणाले. ‘या प्रकल्पामुळे केवळ ‘राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग’च्याच नव्हे, तर पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या वैभवात मोलाची भर पडली आहे. पुणे महानगरपालिकेच्या शाळा व त्यातील विद्यार्थीदेखील अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणात मागे नाहीत, ही प्रत्येक पुणेकराला अभिमानाची बाब वाटेल,’ असे आबा बागुल यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search