Next
बा. सी. मर्ढेकर, काका कालेलकर
BOI
Friday, December 01, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘भूकंपाचा इकडे धक्का पलीकडे अन् युद्ध-नगारे; चहूंकडे अन एकच गिल्ला, जुन्या शवांवर नवे निखारे. फत्तरांतला देव पाहतो कुठे जहाली माझी फत्ते...’ यांसारख्या मर्मभेदी कवितेने ओळखले जाणारे युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर आणि थोर गांधीवादी नेते व हिंदी भाषेचा भारतभर प्रसार आणि प्रचार करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या काका कालेलकर यांचा एक डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
....................
बा. सी. मर्ढेकर 
एक डिसेंबर १९०९ रोजी मर्ढे गावी जन्मलेले बाळ सीताराम गोसावी यांनी आपल्या गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव स्वीकारलं आणि त्याच नावाने त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालं. त्यांनी लहान वयातच काव्यलेखनाला सुरुवात केली होती. त्यांनीच एका ठिकाणी लिहून ठेवलं होतं - ‘I composed my first four verses of meaningless poetry before I was ten.’ आजच्या धकाधकीच्या जीवनातल्या विविध अंगांचा मर्मभेदक आणि अचूक शब्दांनी वेध घेणारे युगप्रवर्तक कवी म्हणून ते ओळखले जातात. ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि हळव्या मनोवृत्तीचे होते. 

सुरुवातीच्या काळात इंग्लिश भाषेचे प्राध्यापक म्हणून अल्प काळ नोकरी करून नंतर त्यांनी ‘ऑल इंडिया रेडिओ’वर दीर्घ काळ नोकरी केली. त्यांनी कवितेबरोबरच काही कादंबऱ्या आणि संगीतिकाही लिहिल्या होत्या. 

मर्ढेकरांच्या क्रांतिकारी कविता सामान्य वाचकांनाच नव्हे, समीक्षकांनाही आव्हान देणाऱ्या, काहीशा दुर्बोध, पण तरीही गुंतवणाऱ्या असत. त्यांच्या कवितांमध्ये त्यांनी नव्या प्रतिमा वापरून केलेलं भाष्य असे. उदाहरणार्थ – 

अजून येतो वास फुलांना,
अजून माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते.
अस्मानावर भगवा रंग
आणि नागवे समोर पोर;
अजून डुलक्या घेत मोजतें
ह्या दोहोंतील अंतर ढोर.
भूकंपाचा इकडे धक्का
पलीकडे अन युद्ध-नगारे;
चहूंकडे अन एकाच गिल्ला,
जुन्या शवांवर नवे निखारे.
फत्तरांतला देव पाहतो
कुठे जहाली माझी फत्ते;
माणूस म्हणतो चिरंतनाचे
मनांत माझ्या अस्सल कित्ते.
चढेल तुसडी तेढी नातीं
नश्वरतेतही चिरका नखरा;
शिजत्या मांसामधून कोणी
स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा.
सटीक मानवतेची टिपणी
पुन्हा वाचली अर्थ तोच तरि;
आभाळाच्या पल्याड स्पंदन
टिपरी त्याची ह्या मडक्यांवरि.
जगून थोडे अखेर मरणे
उघडझाप ही डोळ्यांचीच;
अंधारातून राडाराचा
किरण चालला सलत पुढेच .
कार्तिकांतले गव्हाळ ऊन
जरी मनाची अशा रितीने
फाडुनि बघतें ढिली कातडी
जखम आतली जुन्या भितीने ;
तरीही येतो वास फुलांना,
तरीही माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
तरीही बकरी पाला खाते.
अस्मानावर भगवा रंग
आणि नागवे समोर पोर;
तरिही डुलक्या घेत मोजतें
ह्या दोहोंतिल अंतर ढोर!

रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यासुद्धा प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांचं ‘नटश्रेष्ठ’ हे नाटकही प्रसिद्ध आहे. 

नुसतीच स्वप्नं बघणारा आणि वैफल्यग्रस्त सामान्य आयुष्य जगणाऱ्या त्यांच्या कवितेतल्या ‘बिडी पिणाऱ्या गणपत वाण्याची’ वेदना बहुतेक मराठी वाचकांना माहीत असते –

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन् मनाशीच की
या जागेवर बांधीन माडी;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला..

त्यांना १९५६ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. २० मार्च १९५६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(बा. सी. मर्ढेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी  येथे क्लिक करा. त्यांच्या काही कविता https://goo.gl/qABpue या लिंकवर उपलब्ध आहेत.)
......................
दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर 

एक डिसेंबर १८८५ रोजी साताऱ्यामध्ये जन्मलेले दत्तात्रय ऊर्फ आचार्य काका कालेलकर हे थोर गांधीवादी विचारवंत, निबंधलेखक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते गांधींचे निकटवर्ती होते आणि गांधींबरोबर त्यांनी तुरुंगवास भोगला होता. ‘सर्वोदय’ पत्रिकेचे ते संपादक होते. 

त्यांनी गुजराथी आणि हिंदी भाषेतून प्रामुख्याने लेखन केलं. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना १९६४ सालचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्राप्त झाला होता. 

उत्तरेकडील भिंती, बासरी, रामतीर्थ चरित्र, स्मरणयात्रा, अर्णवाचे आमंत्रण, हिमालयातील प्रवास, आमच्या देशाचे दर्शन, भारत दर्शन भाग एक ते सात – असं त्याचं मराठी लेखन प्रसिद्ध आहे. 
२१ ऑगस्ट १९८१ रोजी त्यांचं निधन झालं.

(काका कालेलकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी  येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search