Next
सुरांनी भारलेल्या वातावरणात ‘सवाई’ला सुरुवात
BOI
Thursday, December 13, 2018 | 12:46 PM
15 0 0
Share this story

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बेगम परवीन सुलताना सादरीकरण करताना

पुणे : सनईच्या मंगल सुरांनी सुरुवात झालेल्या ६६व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा पहिला दिवस युवा कलाकारांचे उत्तम सादरीकरण आणि ज्येष्ठ कलावंतांच्या प्रभावी सादरीकरणाने अविस्मरणीय ठरला. प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईवादनाने प्रसन्न झालेल्या श्रोत्यांना एकापुढे एक उत्कृष्ट सादरीकरणाचे नजराणे मिळत गेले आणि कान आणि मन तृप्त झालेल्या श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलावंतांना मनःपूर्वक दाद दिली. प्रथमच मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर होत असलेल्या या महोत्सवाला रसिकांनी गर्दी केली होती.  नव्या ठिकाणीही हा स्वरसोहळा उत्साहात रंगला. 

सनई वादक कल्याण अपार

महोत्सवाच्या सुरुवातीला कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून सादर केला. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार यांनी तबल्यावर, अनिल तोडकर, शेखर परांजपे आणि निवृत्ती अपार यांनी सनईवर साथ केली. सूरपेटीवर जगदीश आचार्य, स्वरमंडळावर तुळशीराम अतकरे, तानपुऱ्यावर वैष्णवी अवधानी आणि वैशाली कुबेर यांनी साथ केली. कल्याण अपार यांनी संत एकनाथांचे आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘माझे माहेर पंढरी’ हे भजनदेखील सनईवादनातून सादर केले. त्यांना माऊली टाकळकर यांनी (टाळ) साथ केली.

रवींद्र परचुरे

त्यानंतर सिंगापूरस्थित ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे युवा कलाकार रवींद्र परचुरे यांचे गायन झाले. त्यांनी राग भीमपलासने आपल्या गायनास सुरूवात केली. त्यांच्या श्री रागातील बहारदार बंदिशींना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना प्रवीण करकरे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शिवदीप गरूड व सुकृत गोंधळेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. मुळचे उज्जैन येथील असलेल्या रवींद्र परचुरे यांनी पंडित अरुण कशाळकर यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेतले असून, सवाई गंधर्व महोत्सवात गायन सादर करणारे ते पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे आठवे विद्यार्थी आहेत. 

ज्येष्ठ सरोद वादक पंडित वसंत काबरा

त्यांनतर ज्येष्ठ सरोद वादक पंडित वसंत काबरा यांनी सरोद वादन सादर केले. त्यांनी त्यांचे सादरीकरण त्यांच्या गुरू आणि ज्येष्ठ सतारवदक अन्नपूर्णा देवी यांना समर्पित केले. त्यांनी सरोदवर राग पुरिया धनश्री सादर केला. त्यांच्या प्रभावी वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. टाळ्यांच्या गजरात श्रोत्यांनी पंडित काबरा यांना दाद दिली. त्यांना सुधीर पांडे (तबला), अखिलेश गुंदेचा (पखावज) आणि पर्व तपोधन (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

प्रसाद खापर्डे
त्यांनतर शास्त्रीय गायक प्रसाद खापर्डे यांचे गायन झाले. राग केदारने त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या ‘राम भजो भाई’ या भजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), ह्रषिकेश शेलार, शिवाजी चामनर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

सनईचे सूर, युवा कलाकारांच्या गायनाचे सूर आणि ज्येष्ठ वादक पंडित वसंत काबरा यांच्या सरोद वादनाचे गारुड श्रोत्यांच्या मनावर असताना पहिल्या दिवसाचा समारोप करण्यासाठी मंचावर आगमन झाले ते ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांचे. 

बेगम परवीन सुलताना
त्यांनी आपल्या दमदार गायकीने श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांनी आपल्या गायनाची सुरूवात राग ‘जोग’ने केली. जोग रागाचे सौंदर्य उलगडून दाखवत त्यांनी सादर केलेल्या बडा ख्याल व छोटा ख्यालला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. 

आपल्याला मोठ्या भावासारखा जीव लावणारे आणि तानपुरा मिळवून देण्यापासून कायम मदतीसाठी पुढे होणारे पं. भीमसेन जोशी यांचे स्मरण करत बेगम परवीन सुलताना यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. पुण्यासारखा जाणकार श्रोता दुर्मिळच, असे म्हणत त्यांनी पुणेकर रसिकांचे कौतुकही केले. 

त्यांना पं. मुकुंदराज देव (तबला), पं. श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), विद्या जाईल, शादाब सुलताना खान आणि सचिन शेटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
 
प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी केलेल्या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन गायक श्रीनिवास जोशी, शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि उदय भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले

या दरम्यान, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी केलेल्या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन गायक श्रीनिवास जोशी, शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि उदय भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले;तसेच डॉ. नागराज राव हवालदार यांनी लिहिलेल्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी-द व्हॉईस ऑफ द पीपल’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने भीमसेन स्टुडिओज या नावाने एक यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त मुकुंद संगोराम यांनी बुधवारी महोत्सवाच्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमात दिली. या खास यू-ट्यूब चॅनलवर कलाकारांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार असून, कलाकार कसा घडतो हे त्यातून रसिकांसमोर उलगडणार आहे.

 (सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पं. वसंत काबरा यांनी केलेल्या सरोदवादनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)  

  
(सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बेगम परवीन सुलताना यांनी सादर केलेल्या गायनाची  झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

   
  
(सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रसाद खापर्डे  यांनी सादर केलेल्या गायनाची  झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

   

(सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कल्याण अपार यांच्या सनई वादनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
M D Lele About 103 Days ago
Dhanyawad BOI team!!👍
0
0

Select Language
Share Link