Next
अनाथांसाठी विदर्भात फुललेले ‘नंदनवन’
BOI
Friday, November 17, 2017 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, तसेच बेघर, निराधार मुलांना सोबत घेऊन विदर्भात ‘नंदनवन’ फुलवण्याचे काम नंदनवन परिवार करत आहे. वंचित चिमुकल्यांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालण्याबरोबरच त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठीही हा परिवार झटत आहे. ‘लेकरांच्या हक्काचं मोकळं आकाश’ असे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या ‘नंदनवन’बद्दल जाणून घेऊ या ‘लेणे समाजाचे’ सदरात...
.......
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहेच. परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न जास्त गंभीर आहे. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि त्यात कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने त्या कुटुंबाची वाताहत होत असल्याची स्थिती अनेकदा समोर येते. त्यामुळे अशा कुटुंबांतील मुलांना बहुतांशी वेळा शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही बाब हेरून २०१४ साली विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील साखळी येथे ‘छत्रछाया ह्युमन डेव्हलपमेंट’द्वारे नंदनवन परिवाराची स्थापना करण्यात आली.

या प्रकल्पाविषयी मिलिंद चिंचोळकर यांनी माहिती दिली. ‘नंदनवन’ हे प्रामुख्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. त्याचप्रमाणे शेतमजुरांची बालके, अनाथ, निराधार, गरजू व होतकरू मुलांना शिक्षण घेण्यास साह्य करणे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, संरक्षण, नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे हा ‘नंदनवन’चा मुख्य उद्देश आहे. सहा ते १८ वयोगटातील मुले येथे शिक्षण घेत आहेत.

सध्या येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यासह मेहकर, देऊळगावराजा हे तालुके, तसेच अकोला येथील मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांबरोबरच जी मुले शाळाबाह्य आहेत, सरकारच्या योजनेपासून वंचित आहेत आणि अनाथ आहेत, ती बालकेही ‘नंदनवन’च्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. या मुलांनाही सर्वसामान्य घरातील मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे यासाठी त्यांना ‘ज्ञानदीप’ या शाळेत दाखल करण्यात आले आहे. ‘ज्ञानदीप’ या शाळेत सर्वसामान्य घरांतील मुले फी भरून शिक्षण घेतात; मात्र ‘नंदनवन’च्या मुलांना मात्र मोफत शिक्षण दिले जाते. शाळेतील शिक्षणाबरोबरच या मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये धनुर्विद्या, चित्रकला, जलतरण, हस्तकला, संगीत आदी कौशल्य कार्यक्रमांचा समावेश आहे.

‘नंदनवन’ मध्ये शिकणाऱ्या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या वर्षी ‘नंदनवन’ येथील दहावीतील सर्व मुले उत्तीर्ण झाली; तसेच बारावीत शिकणारा हृषीकेश नावाचा मुलगाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. एमबीबीएस व्हायचे त्याचे स्वप्न आहे. त्याला आता १८ वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने त्याच्या शिक्षणाची व्यवस्था नंदनवन प्रकल्पाबाहेर म्हणजेच अकोला येथे केली आहे.

हा प्रकल्प पूर्णपणे लोकसहयोगावर आधारित आहे. ‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या  भल्यासाठी ’ हा कार्यक्रम संस्थेमार्फत राबवला जातो. चहाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जातो. यातून जी मदत मिळते ती प्रकल्पातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाते. तसेच शहर आणि परिसरातील लोकांची रद्दी जमा केली जाते आणि त्याच्या विक्रीतून आलेल्या जमा रकमेतून मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची खरेदी केली जाते.

‘येणाऱ्या काळात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. मग ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले असोत, शेतमजुरांची मुले असोत किंवा भीक मागणारी चुणचुणीत मुले असोत. या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते या प्रकल्पाला मदत करावी,’ असे आवाहन मिलिंद चिंचोळकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू, निराधार, मुला-मुलींसाठी आरोग्य सुविधा केंद्र उभारणे, समाजातील वृद्ध, निवृत्त व्यक्ती यांच्यासाठी साधन केंद्राची स्थापना करणे, समाजातील विधवा, परित्यक्ता, निराधार महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी विविध उद्योग व व्यवसायांद्वारे त्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी शिशुगृह व दत्तक विधान केंद्र उभारणे, दहावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सुविधा पुरविणे, श्रमदानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन करणे ही ‘नंदनवन’ची भविष्यातील उद्दिष्टे असल्याचे चिंचोळकर यांनी सांगितले.

‘वाढदिवस, वास्तुशांती, स्मृतिदिन, लग्नाचा वाढदिवस यानिमित्त अर्थदान किंवा अन्नदान करू शकता. स्कूल बॅग, टिफिन, शूज, युनिफॉर्म व इतर साहित्याची किंवा अन्नधान्य, किराणा साहित्याची, बांधकाम साहित्याची, तसेच घरातील वापरात नसलेल्या वस्तू, पेपर रद्दी, फर्निचर आदी वस्तूंची मदत आपण करू शकता,’ असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. ‘एका बालकाचा एका वर्षाचा शैक्षणिक खर्च साडेचार हजार रुपये, तर एका दिवसाच्या अन्नदानाचा खर्च चार हजार रुपये आहे. एका बालकाचा वर्षाचा भोजनखर्च २४ हजार रुपये आहे,’ अशी माहितीही संस्थेतर्फे देण्यात आली.

संपर्क : ९८५०५ २७१८५, ९८२२७ ०१२९६, ८४२२० ३२५२९
ई-मेल : chhatrabuldana@gmail.com


(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेचे विष्णू जाधव यांनी संस्थेबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pravin About
Great initiative. All the stakeholders should support this initiative.. keep up the good work Nandanvan team..
1
0

Select Language
Share Link
 
Search