Next
पुणे-दौंड मार्गावर ‘डेमू’
BOI
Friday, March 24, 2017 | 12:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कामानिमित्त अथवा शिक्षणानिमित्त दौंडवरून पुण्याला नियमितपणे येणाऱ्या प्रवाशांचे कष्ट ‘पुणे-दौंड’ उपनगरीय प्रवासी वाहतूक सेवेमुळे कमी होणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पुणे-दौंड मार्गावरील ‘डेमू’च्या (डिझेल मल्टिपल युनिट) बहुप्रतीक्षित सेवेला उद्या, शनिवारी (२५ मार्च) हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. ही सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या चाळीस वर्षांपासून होत होती.

कोल्हापूर स्टेशन येथे पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण, पुणे स्टेशनवरील सौर ऊर्जा प्रकल्प, वाय-फाय सुविधा, पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण, पाण्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आदींचे उद्घाटन आणि लोकार्पणही प्रभू यांच्या हस्ते केले जाणार आहे. याच वेळी सुरेश प्रभू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘पुणे-दौंड’ गाडीला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ही गाडी पुण्याहून आपल्या पहिल्या फेरीसाठी दौंडकडे रवाना होईल. 

पुणे-लोणावळा मार्गावर ११ मार्च १९७७ रोजी लोकल (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट - इमू) सेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्या मार्गावरील लोकांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान झाला. पुणे-लोणावळा सेवा सुरू करण्यात आली, त्याच वेळी पुणे-दौंड आणि पुणे-सातारा या मार्गांवरही उपनगरीय सेवा सुरू करण्याची चर्चा होती. तेव्हापासून दौंडला लोकल सुरू होण्याची प्रतीक्षा होती. दौंडवरून पुण्याला नोकरी किंवा शिक्षणानिमित्त येणाऱ्यांची संख्या ५० ते ६० हजार इतकी आहे. दिवसभराच्या कामानंतर परतताना होणारे प्रवाशांचे हाल या उपनगरीय सेवेमुळे नक्कीच कमी होणार आहेत.

२००७-०८ साली या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू झाले. सप्टेंबर २०१६ मध्ये ते पूर्ण झाले; मात्र या मार्गावरील काही स्टेशनवर आवश्यक सोयीसुविधा नसल्याने ‘इमू’द्वारे लोकल सेवा सुरू करणे त्या वेळी शक्य नव्हते. त्यामुळे ‘डेमू’चा पर्याय समोर आला. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पुणे विभागात ‘डेमू’चे तीन ‘रेक’ दाखल झाले असल्याने याद्वारे उपनगरीय सेवा सुरू करण्यात येत आहे.

बारामतीला कमी फेऱ्या
पुणे विभागाला ‘डेमू’चे १० डब्यांचे तीन रेक (गाड्या) उपलब्ध झाले आहेत. त्याचे १५ डब्यांचे दोन रेक केले असून, त्याद्वारे या मार्गावर सेवा दिली जाणार आहे. पुण्याहून दौंडला जाणारी गाडी बारामतीपर्यंत धावणार आहे; मात्र ‘पुणे-दौंड’च्या तुलनेत ‘पुणे-बारामती’ या फेऱ्यांची संख्या अत्यंत कमी असेल. या गाडीचे वेळापत्रक बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. वेळापत्रक निश्चित करताना प्रवासी संघटनांना विश्वासात घेण्यात यावे आणि प्रशासनाने मांजरी, कडेठाण आणि खुटबाव स्टेशन वगळता ‘इमू’ सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांतर्फे होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search