Next
योगाभ्यास व आहार
BOI
Wednesday, June 20, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

          

आजकाल आपण बघतो, की योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या, तसेच योगासन वर्ग यांचे प्रमाण खूप वाढले आहे. ही चांगली गोष्ट आहे; पण त्याच्या जोडीला औषधे घेण्याची वेळ येते. कारण आहार योग्य नसतो. योगशास्त्रात सर्व व्याधींवर उपाय आहेत, ते करतो, पण गुण येतोच, असे नाही. कारण त्यासोबत सांगितलेल्या आहार-विहाराचे आपण पालन करतच नाही... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या योग आणि आहार यांबद्दल...
.................
जुन्या पिढीतील योगशास्त्रात प्रवीण अशी काही मंडळी वयाच्या नव्वदीनंतरही अत्यंत तंदुरुस्त असलेली बघायला मिळतात. नियमित योगासने व उत्तम व मित आहार हेच याचे प्रमुख कारण आहे. योगाभ्यासात घेरंड संहितेत स्पष्टपणे लिहिले आहे, की जो मिताहार न घेता केवळ योगाभ्यास करेल, त्यास निरनिराळे रोग होऊ शकतात, शिवाय योगामध्ये सिद्धीही मिळत नाही. आपण आजकाल आपण बघतो, की योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या, तसेच योगासन वर्ग यांचे प्रमाण खूप वाढले आहे. ही चांगली गोष्ट आहे; पण त्याच्या जोडीला औषधे घेण्याची वेळ येते. कारण आहार योग्य नसतो. योगशास्त्रात सर्व व्याधींवर उपाय आहे, ते करतो; पण गुण येतोच असे नाही. कारण त्यासोबत सांगितलेल्या आहार-विहाराचे आपण पालन करतच नाही. 

योगासने करणाऱ्याने जेवताना आपले पोट ५० टक्के अन्नाने, २५ टक्के पाण्याने व २५ टक्के रिकामे ठेवावे. अन्यथा आपल्या पचनशक्तीवर ताण येतो. आपण जे खातो, त्यापासून आपल्याला उर्जा तर मिळतेच, पण योगाभ्यासातील अनेक महत्त्वाच्या क्रिया, जसे - ध्यान करणे, मनाचा समतोल राखणे, शरीरातील तालबद्ध प्रक्रियांवर लक्ष ठेवणे इत्यादी गोष्टी केवळ उत्तम आहाराच्या मादतीनेच शक्य होतात. 
योगशास्त्रात आहाराचे तीन भागांत वर्गीकरण केले गेले आहे. 

सात्त्विक आहार : हा आहार आपल्याला ऊर्जा तर पुरवतोच, पण शरीराचा हलकेपणा व उत्साह कायम ठेवतो. आपले समोरच्यासोबतचे वागणे प्रेमळ ठेवतो. आपण अत्यंत मृदूभाषी होतो. या आहारात ताजे अन्न खाणे अपेक्षित आहे. शिजल्यावर तीन ते चार तासांत हे अन्न ग्रहण करणे. या आहारात फळे, भाज्या, सुका मेवा, धान्ये असणे अपेक्षित आहे. फळे नैसार्गिकरीत्या पिकवलेली हवीत. 

राजस आहार : चहा, कॉफी, कांदा, लसूण, तळलेले व अतिमसालेदार, तसेच उग्र चवीचे पदार्थ राजस आहारात मोडतात. हा आहार करणारे लोक अतिउत्साही, तापट, कमी झोपणारे, चिडचिडे असतात.

तामसी आहार : शिळे अन्न, सतत थंड - गरम पदार्थ, तळकट, पचायला जड, अनैसर्गिक व कृत्रिम रंग व पदार्थ वापरून बनवलेले पदार्थ, मांसाहार, खूप गोड, तळलेले शिळे पदार्थ, परिरक्षके वापरून जतन केले गेलेले पदार्थ या आहारात मोडतात. असा आहार घेतल्याने माणसाची विचारशक्ती खुंटते. दोलायमान निर्णय घेण्याची परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. 

आपण काय खातो, त्यानुसार आपल्याला आहाराचा प्रकार ठरवता येईल. योगाभ्यास करणाऱ्यांनी आहाराची पुढील पथ्ये पाळणे अपेक्षित आहे. 
- ॠतूप्रमाणे भोजन करा.
- आपली प्रकृती (वात, पित्त किंवा कफ) जाणून त्याप्रमाणे भोजन करा.
- स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने आनंदी असावे. कारण अन्नच आपले शरीर निर्माण करते व त्याचा मनावरही पूर्ण प्रभाव पडतो.
- दुध खूप वेळा उकळू नये.
- योगशास्त्रात फलाहार सर्वोत्तम मानला गेला आहे. 
- गहू, बाजरी, दूध तूप, मध हे घटक आपले आयुष्य वाढवतातच; पण शक्ती व क्षमताही वाढवतात.
- ताक, भिजवलेले बदाम, साखर कॅन्डी आपल्या शरीरास थंड ठेवतात.
- हर्बल चहा / लिंबू पाणी शरीरासाठी उत्तम असते
- गोडसर मसाले. उदा. दालचिनी, वेलदोडा, पुदिना तुळस. इत्यादी शरीरास उत्तम.
- नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे खावीत.
- सर्व भाज्या चांगल्याच; पण खारवलेल्या नसाव्यात. 
- तेलबियांपासून काढलेले तेल असावे. 

अन्नाचेही चार प्रकार आहेत. 
- पातळ पदार्थ, जे फक्त प्यावे लागतात. 
- घन पदार्थ, जे दातांनी चावावे लागतात 
- निम घन (सेमी सॉलिड), जे थोडे चावावे व बाकी गिळावे लागतात.
- मऊ पदार्थ, जे न चावता गिळले तरी चालतात.

या वेगवेगळ्या प्रकारांचे योगाशात्रासात खूप महत्त्व आहे. ॠतूनुसार आहार घेतल्यास रोग आपल्या जवळपासही फिरकत नाही. आपल्या प्रकृतीप्रमाणे आहार घेणे, वयोमानानुसार त्याचे प्रमाण व वर दिलेल्या अन्नाच्या प्रकारांपैकी आपणासाठी काय उत्तम आहे, हे आपण प्रामाणिकपणे ठरवले पाहिजे.

योगाभ्यासासाठी अर्थातच सात्त्विक आहार अपेक्षित आहे.  रात्रीचे जेवण हलके व आठ वाजेपर्यंत घ्यावे. फार उशीर करू नये. प्रत्येक घास कमीत कमी २० व जास्तीत जास्त ३२ वेळा चावून मग गिळावा. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे टाळावे. संस्कृतमधील एका श्लोकाचा अर्थ आहे, ‘जो सकाळी उठून पाणी पितो, दुपारी जेवण झाल्यावर ताक पितो व रात्री जेवण झाल्यावर दूध पितो, त्याला डॉक्टरांची गरज पडत नाही.’ म्हणजेच आपण निरोगी, निरामय जीवन जगू शकतो. ज्या शरीराने आपण रोजची कामे करणार, ध्यान धारणा, योगासने, पारमार्थिक साधना करणार, ते शरीर उत्तम असल्यास सर्व गोष्टी सुलभ होतील. अन्यथा अनेक अडथळे पार करावे लागतील.  त्यामुळे शरीर ही देवाची देणगी आहे व त्याची काळजी घेणे आपले परम कर्तव्य आहे.

असे असले, तरी आजकाल योगासन क्लासला जाणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली दिसते. ज्यामुळे थोडा वेळ का होईना लोकांना बरे वाटते. याबरोबरच जर आहाराचीसुद्धा पथ्ये पाळली, तर आपला देह व पर्यायाने मनही शुद्ध होते. ज्ञानेश्वरीमध्येही आहाराचे खूप मोठे महत्त्व सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अन्न हे संपूर्ण, मधूर, पूर्ण शिजलेले, नुकतेच बनवलेले, दिसण्यास व रुचीस स्नेहपूर्ण, पचनसुलभ, बेताच्या आकाराचे व परिपक्व असावे. त्यामुळे सात्त्विक श्रद्धा वाढते, शरीर व मन शुद्ध होते व आपली मोक्षाकडे वाटचाल सुलभ होते. 

- आश्लेषा भागवत
मोबाईल : ९४२३० ०८८६८
ई-मेल :  ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link