Next
समांतर चित्रपट चळवळीचे पुरस्कर्ते : मृणाल सेन
BOI
Thursday, January 03, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this story

मृणाल सेननिरनिराळे प्रयोग करून भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव जागतिक पटलावर आणणारे बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांचे नुकतेच (३० डिसेंबर २०१८) निधन झाले. चित्रसृष्टीतील त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे दादासाहेब फाळके, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...
..............................
मृणाल सेन यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी बांगलादेशमधील फरीदपूरमध्ये झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात जायचे ठरवले आणि १९५५मध्ये त्यांनी ‘रातभोर’ या आपल्या पहिल्या बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर सुरुवातीच्या काळात ‘नील आकाषेर नीचे’, ‘बाईशे श्रावण’, ‘आकाश कुसुम’ अशा काही चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. काल्पनिक कथानकांमध्ये रमणारे मृणाल सेन हळूहळू वास्तविकतेकडे वळत गेले आणि पुढील काही काळात वास्तविकतेवर आधारित काही चित्रपट त्यांनी तयार केले. त्यापैकी १९६९मध्ये आलेल्या त्यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटाने इतिहास रचला. हा चित्रपट खूप गाजला आणि यानंतर त्यांना एक नवी दिशा मिळाली. 

मृणाल सेन आणि सत्यजित रेस्वातंत्र्यानंतर विसाव्या शतकात भारतीय चित्रपटसृष्टीत हळूहळू नवीन प्रयोग होऊ लागले. त्या काळात विशेषतः सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या तीन बंगाली दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने नवीन दिशा, नवीन आकार दिला. या तिघांनी अनेक प्रादेशिक सिनेमांची निर्मिती केली. वेगवेगळे विषय घेऊन नवीन पायंडे पाडले. प्रादेशिक दिग्दर्शकांना प्रेरणा देण्याचे काम केले. रे यांच्या वास्तववादी शैलीला छेद देऊन सेन यांनी अनेक नवीन धाटणीचे चित्रपट निर्माण केले. या तिघांच्याही सिनेमांच्या विषयांचा आवाका कोणत्याही एका विशिष्ट भागापुरता मर्यादित नव्हता. तो वैश्विक होता. त्यामुळे या तिघांचेही चित्रपट केवळ बंगालीपुरते मर्यादित न राहता ते चित्रपटाच्या जागतिक पटलावर झळकले. भारतापेक्षाही भारताबाहेर जास्त प्रेक्षक मिळवण्यात या तिघांनाही यश मिळाले. त्यांचा प्रेक्षक जागतिक होता. 

मृणाल सेन म्हटले, की पांढरा सदरा-लेंगा, जाड भिंगांचा चष्मा आणि बोटांमध्ये अडकवलेली सिगारेट अशी छबी आजही डोळ्यांसमोर येते. ‘माझे प्रयोग कधीही संपणार नाहीत,’ असे नेहमी म्हणणारे सेन हे पुढे एक बंडखोर दिग्दर्शक म्हणून समोर आले. सुरुवातीपासूनच डाव्या आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेल्या सेन यांच्यावरचा हा प्रभाव त्यांच्या अनेक चित्रपटांमधूनही दिसून येतो. ते अनेक चळवळींविषयीचे भान ठेवून वावरणारे होते. आपल्या चित्रपटांमधून ते राजकीय भूमिका थेटपणे मांडत. याच प्रभावाखाली असताना आपल्यातील बंडखोर तरुणाची भूमिका मांडण्याच्या उद्देशाने त्यांनी १९७०च्या काळात ‘इंटरव्ह्यू’, ‘कलकत्ता-७१’ आणि ‘पदातिक’ अशा राजकीय चित्रपटांची श्रृंखला आणली. आयुष्याच्या शेवटपर्यंत सेन हे एक सामान्य आयुष्य जगले आणि हेच सामान्य आयुष्य त्यांनी आपल्या चित्रपटांमधूनही मांडण्याचा प्रयत्नही केला. 

यानंतरच्या काळात मात्र त्यांनी मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव काहीसा बाजूला सारून ‘भुवन शोम’, ‘माटिर मानिश’, ‘एकदिन प्रतिदिन’, ‘ओघ ओरी कथा’, ‘एक दिन अचानक’, ‘अकालेर संधाने’, ‘खंडहर’ अशा काही चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांमधून त्यांनी सामाजिक आशय मांडले, मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या. या व्यतिरिक्त ‘महापृथ्वी’, ‘अंतरिन’, ‘जेनेसिस’, ‘आमार भूवन’, ‘पुनश्च’, ‘अबाशेशे’, ‘प्रतिनिधी’, ‘कोरस’, ‘परशूराम’, ‘चलचित्र’, ‘मतिरा मनीषा’ अशा त्यांच्या चित्रपटांचा उल्लेख आजही होताना दिसतो. 

ऋत्विक घटकसतत नावीन्याची कास धरलेल्या सेन यांनी आपल्या कारकिर्दीत २८ चित्रपट, १४ लघुपट आणि पाच डॉक्युमेंटरी केल्या आहेत. दादासाहेब फाळके आणि पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसहित २० राष्ट्रीय आणि १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. २००२मध्ये आलेला ‘आमार भुवन’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला. सत्यजित रे आणि ऋत्विक घटक या दिग्गज दिग्दर्शकांच्या पंगतीत बसणारे मृणाल सेन हे अखेरचे दिग्दर्शक होते. या तिघांनी भारतीय चित्रपटात नवचित्रपटास समांतर ओळख मिळवून देणारे एक युग निर्माण केले. मृणाल सेन यांच्या जाण्याने या युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link