Next
आचऱ्यात माधवराव गावकर यांना स्वरसाधना पुरस्कार प्रदान
जागतिक कुटुंब दिनानिमित्त लक्ष्मणराव आचरेकरांचाही गौरव
BOI
Monday, May 20, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this article:आचरा (मालवण) :
जागतिक कुटुंब दिनाचे औचित्य साधून आचरे येथील लक्ष्मण भिवा आचरेकर फॅमिली ट्रस्टच्या वतीने अजगणी गावचे सुपुत्र माधवराव गावकर यांना ‘स्वरसाधना’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आचरे बौद्धवाडी येथे लक्ष्मणराव आचरेकर यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या भव्य गौतम सभामंडपात हा सोहळा झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत सांबरी (अध्यक्ष, रामेश्वर वाचन मंदिर, आचरे) होते. बाबाजी भिसळे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे), सुरेश ठाकूर (अध्यक्ष, कोकण साहित्य मराठी परिषद, मालवण), आत्माराम नाटेकर (प्रतिनिधी, मुंबई मराठी पत्रकार संघ), धर्मपाल कदम (ट्रस्टी, आचरेकर फॅमिली ट्रस्ट), प्रकाश जाधव (संयोजक, आचरेकर फॅमिली ट्रस्ट) आणि कार्यक्रमप्रमुख लक्ष्मणराव भिवा आचरेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

लक्ष्मणराव आचरेकर यांच्या ८०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जागतिक कुटुंब दिनाच्या (१५ मे) निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते माधवराव गावकर यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

‘ज्या आचरे गावात अनेक थोर गायक येऊन गाऊन गेलेले आहेत, ज्या रामेश्वराच्या भूमीने भार्गवराम आचरेकर, वसंतराव आचरेकर, भार्गवराम पांगे, आदी थोर नटवर्यांना जन्म दिलेला आहे, त्या सुरांच्या आणि तालाच्या रामेश्वरनगरीत माझा सन्मान होत आहे, त्याबद्दल मला स्वर्गीय समाधान लाभत आहे,’ असे उद्गार सत्कारमूर्ती माधवराव गावकर यांनी काढले. तत्पूर्वी श्रीकांत सांबारी, बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर, आत्माराम नाटेकर, धर्मपाल कदम, प्रकाश जाधव, लक्ष्मणराव आचरेकर आदींनी माधवराव गावकर यांचा गौरव करणारी भाषणे केली. मोठ्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख
लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या शंभरहून अधिक आहे. अशा मोठ्या कुटुंबाकडून आचऱ्यात हा सोहळा पार पडला. सर्व कुटुंबीयांनी लक्ष्मणराव आचरेकर यांनाही मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. अनेक मान्यवरांसोबत रामेश्वर वाचनमंदिर, वैभवशाली पतसंस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, साने गुरुजी कथामाला, आचरे बौद्ध विकास सोसायटी, रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटी आदी अनेक संस्था आणि व्यक्ती या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. आचरेकर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘माझे जीवनगाणे’ 
जागतिक कुटुंब दिनाचे औचित्य साधून सुरेश ठाकूर यांनी लक्ष्मणराव आचरेकर यांची ‘माझे जीवनगाणे’ या सदरात मुलाखत घेतली. आपले कुटुंब, मित्र आणि अनेक संस्थांमध्ये काम करीत असताना, तसेच कार्यालय आणि विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना एकत्र कुटुंबपद्धतीप्रमाणे आपण सर्वांना न्याय कसा दिला, याचे अनेक पदर लक्ष्मणरावांनी आपल्या मुलाखतीत उलगडले.सुरुवातीला स्वरा आणि आर्या या लक्ष्मणरावांच्या नातींनी कुटुंबगीत सादर केले. अनिरुद्ध आचरेकर आणि पंकज परब यांनी संगीतसाथ केली. 
    
नाट्यसंगीत रजनी 
या वेळी स्वरसाधक पुरस्कार विजेते माधवराव गावकर यांचा नाट्यसंगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. हर्षवर्धन गावकर यांनी त्यांना तबलासाथ केली. या सोहळ्यात आचरेकर कुटुंबीयांसमवेत सदानंद कांबळी, अशोक कांबळी, अरुण पारकर, सुरेश गावकर, दौलत राणे, नीलेश ढोके, विजया मयेकर, चंद्रकांत कुबल, सुनील दुखंडे, फकीर लक्ष्मण पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल आणि पांडुरंग कोचरेकर यांनी केले, तर प्रकाश जाधव यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search