Next
‘पानिपत युध्दस्मारका’साठी महाराष्ट्र शासनाकडून दोन कोटी ५८ लाखांचा निधी
BOI
Tuesday, January 15, 2019 | 03:15 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने हरियाणा राज्यात स्थित ‘पानिपत युध्द स्मारका’च्या विकासासाठी दोन कोटी ५८ लाखांचा निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी, १५ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ‘पानिपत शौर्यदिन’ कार्यक्रमात ही घोषणा केली.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईला या वर्षी २५८ वर्ष पूर्ण होत आहेत. या युध्दात अतुल्य शौर्य गाजविणाऱ्या मराठा सैन्याच्या कामगिरीची आठवण म्हणून पुणे येथील हिंदवी स्वराज्य समितीच्या वतीने नवी दिल्लीत ‘पानिपत शौर्यदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याचे माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, तंजावर येथील छत्रपती शिवाजीराजे भोसले, पेशव्यांचे वंशज महेंद्र सिंह पेशवे, अवैश बहादूर आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी ‘पानिपत युध्द स्मारका’च्या विकासासाठी दोन कोटी ५८ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. या वेळी तंजावर येथील छत्रपती शिवाजीराजे भोसले, पेशव्यांचे वंशज महेंद्र सिंह पेशवे, अवैश बहादूर, संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवर.

या वेळी जयकुमार रावल म्हणाले, ‘पानिपत युध्दभूमीवर मराठा सैन्याने अतुल्य शौर्य दाखवले. युध्दात पराभव झाला, तरी अहमदशहा अब्दालीच्या सैन्यासोबत निकराचा लढा देणाऱ्या मराठा सैन्याचे योगदान भारतीय इतिहासात मोलाचे ठरले आहे. ज्या भूमीवर हे युध्द लढले गेले त्या हरियाणा राज्यातील पानिपत येथील कालाआम परिसरातील पानिपत युध्दभूमीच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्यावतीने दोन कोटी ५८ लाखांचा निधी देण्यात येत आहे.’ 

‘महाराष्ट्र शासन व हरियाणा शासनाच्यावतीने पानिपत युध्द स्मारकाचा ऐतिहासिक तीर्थस्थळ म्हणून विकास करण्यासाठी विविध कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल,’ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

या वेळी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अन्य मान्यवर वक्त्यांची भाषणे झाली. 

असा पार पडला दिमाखदार सोहळा

सर्वप्रथम येथील कालाआम परिसरातील युध्दस्मारकावर तंजावरचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी पुष्पचक्र वाहिले. यानंतर महेंद्र सिंह पेशवे आणि अवैश बहादूर यांनी पुष्पचक्र वाहिले. महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून युध्दातील शहिदांना आदरांजली वाहिली.

पानिपत शौर्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पानिपतच्या तिसऱ्या युध्दात भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याचे प्रतिक म्हणून पेशव्यांच्या वंशजांकडून छत्रपतींना जरी पटका देऊन सन्मानित करण्यात आले,तर अतुल्य शौर्याकरिता छत्रपतींकडून पेशव्यांना युध्द सन्मान प्रदान करण्यात आला. सरदार घराण्यातील वंशजांना छत्रपतींच्या हस्ते पदक व जरीपटका देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदेमातरम’ या गीताने, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search