Next
‘श्वानांच्या शर्यतींवर तात्काळ बंदी घालावी’
डॉ. कल्याण गंगवाल यांची पत्रकार परिषदेत मागणी
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘प्राण्यांनाही सुखाने जगण्याचा अधिकार आहे; मात्र मनोरंजन आणि आर्थिक दृष्टीकोनातून प्राण्यांच्या शर्यती लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. नुकत्याच सणसर येथे श्वानांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये कोंबड्या आणि श्वानांना अतिशय क्रूरतेने हाताळले गेले. त्यामुळे श्वानांच्या शर्यतींवर केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ बंदी घालावी; तसेच हौस म्हणून अशा शर्यती भरविणाऱ्या शौकिनांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

नवी पेठेतील पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मनोरंजन आणि स्पर्धांसाठी प्राण्यांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. काही वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यती भरविल्या जात होत्या. त्यावर आवाज उठवत बंदी घालण्याची याचिका दाखल करून त्या थांबविल्या आहेत. पुणे फेस्टिवलमध्ये होणाऱ्या बैलगाडा शर्यती थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्यानंतर आता श्वानांच्या शर्यती भरविण्याचे प्रकार घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या इचलकरंजीत सायको रेसिंग क्लबने अशाच प्रकारे श्वानांच्या स्पर्धा भरविल्या होत्या. तिथेही माझ्यासह ब्युटी विदाउट क्रुएल्टीच्या अध्यक्षा डायना रत्नागर यांच्या मदतीने या शर्यती थांबविण्यात आल्या. आता पुणे जिल्ह्यातील सणसरमध्येही अशा शर्यती भरविण्यात आल्या होत्या. या शर्यती बेकायदेशीर आणि श्वानांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या आहेत.’

‘प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० (प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अनिमल्स ऍक्ट १९६०) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (महाराष्ट्र स्टेट प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट) या कायद्यानुसार या शर्यती बेकायदेशीर आहेत. श्वानांच्या शर्यती भरविण्यावर या दोन्ही कायद्यांप्रमाणे कारवाई केली जावी. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्राण्यांनाही माणसांप्रमाणे जगण्याचे कायदेशीर हक्क असून, मानवाने त्याचे उल्लंघन करू नये, असा निर्वाळा दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने या शर्यतीवरील निर्बंध कडक करावेत व या शर्यतीचे लोण पसरणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असे आवाहनही डॉ. गंगवाल यांनी केले आहे.

‘या श्वानांना शर्यतीसाठी तयार करताना ससे, उंदीर, कोंबड्या, जंगली डुक्कर अशा इतर जिवंत प्राण्यांचाही बळी दिला जातो. त्यांना उपाशी ठेवून सावजांचा पाठलाग करत त्यांना मारून खाण्यासाठी प्रवृत्त केले जाते. ही शर्यत म्हणजे एक प्रकारचा जुगार असून, अशा गोष्टींना आपण प्रोत्साहन देता कामा नये,’ असे त्यांनी नमूद करतानाच याबाबतची याचिकाही आपण दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search