Next
अपंग भावासाठी बहिणीने साकारली अनोखी सायकल
प्राची गावस्कर
Saturday, April 27, 2019 | 02:30 PM
15 0 0
Share this article:

मयुरी यादव तिचा भाऊ निखिल आणि आईसह

पुणे : बहीण-भावाच्या नात्याची गोष्टच काही निराळी असते. ‘भरजरी ग पीतांबर दिला फाडून...’ या गीतात सांगितल्याप्रमाणे बहीण आपल्या भावासाठी काहीही करू शकते. अशीच एक बहीण आहे मयुरी यादव. तिने आपल्या अपंग भावासाठी सायकलला जोडलेली व्हीलचेअर विकसित केली आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातदेखील तिच्या या प्रयोगाची निवड झाली आहे. 

बारामती तालुक्यातील सदोबाची वाडी गावात राहणाऱ्या मयुरी यादव हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. सहावीतून आता सातवीत गेलेला तिचा भाऊ निखिल पायाने अपंग आहे. दोघेही होळमधील आनंद विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांच्या घरापासून शाळा अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर आहे. निखिलला शाळेत ने–आण करण्याचे काम त्याचे वडील करत. शेती आणि छोट्या-मोठ्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 

त्यामुळे वडील कधी घरी नसले, तर तो शाळेत जाऊ शकत नसे. त्याला शाळेत जायला खूप आवडते. त्यामुळे शाळेत जाता आले नाही, की तो हिरमुसून जायचा. त्याचा अभ्यास बुडतो म्हणून नाराज व्हायचा. अत्यंत हुशार असूनही, वारंवार शाळा चुकल्यामुळे त्याचा अभ्यास मागे पडायचा. मयुरीलाही कधी कधी त्याच्यासोबत घरी थांबावे लागायचे. त्यामुळे तिचीही शाळा चुकायची. निखिलला गाडीवर उचलून बसवणे, उतरवणे, शाळेत नेणे हे वडिलांनाही दिवसेंदिवस अवघड होत होते. हे सगळे बघून मयुरी काळजीत पडायची. काय केले म्हणजे हा प्रश्न कायमचा सुटेल, असा विचार ती करायची. 

अचानक एक दिवस तिला कल्पना सुचली, की आपल्या सायकलला व्हीलचेअर जोडता आली, तर निखिलला आपण सहज शाळेत घेऊन जाऊ शकतो. तिच्या डोक्यात आलेली ही कल्पना तिने आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक ए. एस. आतार यांच्या कानावर घातली. सगळ्यांना ही कल्पना आवडली; पण ती प्रत्यक्षात कशी साकार होणार असा प्रश्न पडला. 

त्या वेळी शाळेतील शिक्षिका कांतिका वसेकर आणि विज्ञानाचे शिक्षक जयराम पवार यांनी मात्र ते शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी शाळेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षक, सहायक यांच्याशी चर्चा करून ही अनोखी सायकल साकारायचा निर्णय घेतला. त्यानंतर व्हीलचेअरमध्ये बसणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा, ब्रेक सिस्टीम यांचा अभ्यास करून योग्य ते तांत्रिक बदल करून सायकल आणि व्हीलचेअर वेल्डिंग करून जोडण्यात आली. हे सर्व काम करण्यास एक आठवडा लागला. दोन्ही सायकली व्यवस्थित तोल सांभाळतील आणि ब्रेक व्यवस्थित काम करील, याची पूर्ण काळजी यात घेण्यात आली आहे. 

दिल्लीतील प्रदर्शनात मयुरीच्या सायकलीला बक्षीस मिळाले. या वेळी शिक्षक आणि पालकांसह मयुरी यादव

नसरापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ही सायकल शाळेतर्फे ठेवण्यात आली होती. तिची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली. तसेच दिल्लीत झालेल्या ‘इन्स्पायर अॅवॉर्डस् प्रदर्शनातही मयुरीच्या सायकलला बक्षीस मिळाले. तिच्या या अनोख्या कल्पकतेसाठी तिचा पुण्यातील मुख्याध्यापक संघाने तिचा सत्कारही केला आहे. या अनोख्या सायकलबद्दल माहिती मिळाल्यानंतर अनेक जण मयुरीची सायकल बघायला येतात. अपंग मुलांच्या पालकांना या माध्यमातून एक चांगला उपाय दिसला आहे. त्यामुळे अनेकांनी अशी सायकल बनवून घेण्यासाठी मयुरीच्या घरी भेट दिली आहे.  

पुण्यातील मुख्याध्यापक संघाने मयुरीचा सत्कारही केला.

आता मयुरी रोज निखिलला शाळेत घेऊन जाते आणि परत आणते. शाळा चुकत नसल्याने निखिल अत्यंत आनंदित आहे. आपल्या बहिणीबद्दल त्याला प्रचंड अभिमान आणि प्रेम वाटते.  मयुरीने आता दहावीची परीक्षा दिली असून, पुढे तिला विज्ञान शाखेत शिक्षण घ्यायचे आहे. समाजाला उपयोगी ठरणारे काम करण्याची तिची इच्छा आहे. 

तिचे वडील पोपट यादव आणि काका विजय यादव यांनाही तिच्या धडपडीचे आणि भावाबद्दल असलेल्या काळजीचे, प्रेमाचे कौतुक आणि अभिमान वाटतो. निखिलला दररोज शाळेत नेणे-आणणे तिच्या वडिलांना कामामुळे शक्य व्हायचे नाही. त्या वेळी त्याची दिसणारी नाराजी, अभ्यास करायची त्याची धडपड हे सगळे बघून त्यांना अपराधी वाटायचे; पण त्यांचाही नाईलाज होत असे. ही सगळी समस्या मयुरीच्या धडपडीमुळे, कल्पकतेमुळे दूर झाली. याबद्दल त्यांना तिचा खूप अभिमान वाटतो. 

मयुरीने भावावरील प्रेमातून साकारलेल्या या अनोख्या सायकलीची चर्चा सर्वत्र होत असून, सर्वत्र मयुरीच्या धडपडीचे कौतुक होते. आपल्या भावासाठी आपण काही तरी करू शकलो याचा मयुरीलाही प्रचंड आनंद आहे. जिद्द असेल, मनापासूनची इच्छा असेल, तर लहान मुलेही जगावेगळे काम करू शकतात, याचे मयुरी यादव हे उत्तम उदाहरण आहे. तसेच, तिची कल्पना उचलून धरून तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक करण्यासारखे आहे. 

(मयुरी यादवच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search