Next
‘पर्यावरण संवर्धनाची चळवळ विद्यार्थिदशेतच रुजावी’
पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, November 27, 2018 | 12:18 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘विज्ञान-तंत्रज्ञान, नागरिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परिणामी आपली वसुंधरा मानवाला राहण्यासाठी प्रतिकूल होत चालली आहे. पाणी टंचाई, जागतिक तापमान वाढ असे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वृक्षलागवड करून ते जतन करणे गरजेचे आहे. या कामात शालेयस्तरावर मोठे काम उभारले जाऊ शकते. त्यासाठी पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ विद्यार्थिदशेतच रुजवायला हवी,’ असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान येथे भरलेल्या या संमेलनात राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे, स्वागताध्यक्ष कवयित्री मंदा नाईक, कार्याध्यक्ष चंद्रकांत शहासने, सुभेदार मेजर व्यंकटेश जाधव, माजी सैनिक महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना गर्गे, संमेलन दिंडी प्रमुख उर्मिला कराड, साहित्य व संस्कृती मंडळाचे ज्योतिराम कदम, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंजिरी शहासने, अॅड. नंदिनी शहासने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी, सकाळी वनविभागाच्या कार्यालयापासून वृक्ष व ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ह.भ.प. मणिलालजी नाईकडे यांच्या हस्ते दिंडीची सुरुवात झाली. विविध शाळांतील विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. संमेलनस्थळी अजानवृक्षाचे पूजन, ग्रंथ प्रदर्शन, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रदर्शन व देशभक्तांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रसंगी ‘निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली, शाकाहार’, ‘वन्यप्राण्यांच्या जगातील गंमती जमती’, ‘माझी लाडकी भारतमाता (कीर्तन)’, ‘विज्ञानाचे नाव चांगदेव पासष्टी’, ‘सलाम मृत्यूंजयाना भाग एक’, ‘सलाम मृत्यंजयाना भाग दोन’, ‘सलाम मृत्यंजयाना भाग तीन’, ‘ओळखा कोण?’, ‘धाडसी गिरीजा’, ‘स्मरणिका’, ‘गाऊ शौर्य गाथा’ आणि ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ या बारा पुस्तकांचे प्रकाशन प्रकाशन करण्यात आले.

डॉ. भटकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती अतिशय महान आहे. संत विचार आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाने प्रेरित असलेल्या भारतभूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तो इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. स्वामी विवेकानंदानी वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे आपण एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा समृद्धतेकडे वाटचाल करीत आहोत. यामध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जोपासायला हवी. त्यासाठी शालेयस्तरावर प्रयत्न व्हावेत.’

नाईकडे म्हणाले, ‘रात्रभक्तीची भावनाच मुळात प्रेरणादायी गोष्ट आहे. या भावनेने काम केले, तर भारतमाता हिरवीगार व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्राला समृद्ध भाषांचा आणि संत विचारांचा वारसा आहे. त्यातूनच मराठी बोलीभाषा जतन करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर निरोगी जीवन जगायचे असेल, तर जास्तीत जास्त वृक्षलागवड होणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीत वृक्षाला देव मानले असून, संतांनीही आपल्या वाणीतून व लेखणीतून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाचा विचार पेरला आहे. आपण त्याचे अनुकरून करून पर्यावरण संवर्धनासाठी झटायला हवे.’

चंद्रकांत शहासने म्हणाले, ‘भारतीय क्रांतीकारकांनी पेटवलेली क्रांतीची ज्योत आणि संत विचार यातून हे संमेलन घडत आहे. देशाला स्वातंत्र्याकडून सुराज्याकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. झाडे लावणे, जगवणे आणि पर्यावरण रक्षण ही राष्ट्रभक्ती समजून आपण काम करावे.’

संत अचलस्वामी म्हणाले, ‘इतिहास मार्गदर्शक असतो.  त्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीसाठी आपण योगदान द्यावे. अशा संमेलनामुळे राष्ट्रभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत होईल.’

ज्योतीराम कदम यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. अॅड. नंदिनी शहासने यांनी मनोगत व्यक्त केले. संजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी शहासने यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search