Next
शेअर बाजार दोलायमान स्थितीत; सावध गुंतवणूक आवश्यक
फोर्स मोटर्स, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स उत्तम
BOI
Monday, August 26, 2019 | 02:09 PM
15 0 0
Share this article:


माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना झालेली अटक, महाराष्ट्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांचे सावट अशा राजकीय घडामोडींचे पडसाद कमी -अधिक प्रमाणात शेअर बाजारात उमटत आहेत. बाजार सध्या दोलायमान स्थितीत आहे. त्यामुळे सावधपणे गुंतवणूक आवश्यक आहे. अशा स्थितीत काही मोजके शेअर्स घेण्याजोगे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट या सदरात....
......  
गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३६ हजार ७०१ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १० हजार ८२९ अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्सने गेल्या शुक्रवारी (२३ ऑगस्ट) २२८ अंकांची वाढ दाखवली, तर निफ्टी ८८ अंकांनी वाढला.  

भारताचे सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल अशा पी. चिदंबरम यांना चार दिवसांपूर्वी नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. महाराष्ट्रात अजित पवार यांनाही कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. अशा राजकीय अस्थिरतेच्या वातावरणाचे पडसाद शेअर बाजारावर कमी-अधिक प्रमाणात उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार दोलायमान अवस्थेत असताना गुंतवणुकीपासून सध्या चार पावले दूर असणेच बरे. कंपन्यांचे सहा महिन्यांचे विक्री व नफ्याचे आकडे सप्टेंबर २०१९अखेर जाहीर होतील. तेव्हा बाजाराला स्थैर्य मिळेल. 

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन नजीकच्या भविष्यात सर्व बँक प्रमुखांची बैठक घेणार आहेत. बाजारामध्ये द्रवता कशी वाढेल यासाठी काही ठोस पावले उचलली जातील. विशेषतः नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना कशी जास्त कर्जे देता येतील, यावर भर असेल. 

येस बँकेच्या शेअरमधली घसरण चालू राहून तो ६१.२५ रुपयांवर बंद झाला. रोज सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त शेअर्सचा व्यवहार होत आहे. या शेअरचा गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव ५३.२० रुपये होता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरचा भाव शुक्रवारी २७१ रुपये होता, तर कॅनरा बँकेचा शेअर २१७ रुपयांवर स्थिरावला. बंधन बँकेचा शेअर शुक्रवारी ४६० रुपयांवर बंद झाला, तर आरबीएल बँकेचा शेअर ३५४ रुपयांवर स्थिर आहे. 

फिरोदिया समूहातल्या फोर्स मोटर्सच्या शेअरचा भाव सध्या ११९४ रुपये आहे. हा शेअर सध्या घेण्यासारखा आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज ही टायर निर्मिती करणारी कंपनी दुर्गम भागातल्या अवजड वाहनांसाठी दणकट टायर्स बनवत असते. तिच्या शेअरचा भाव सध्या ७४२ रुपये आहे. दीर्घ मुदतीसाठी हा शेअर घेतल्यास त्याला ९५० ते एक हजार रुपयांचा भाव मिळू शकेल. सदाहरित बजाज फायनान्स शेअर सध्याच्या भावालाही घेण्यासारखा आहे. सध्या त्याचा भाव तीन हजार १७५ रुपये आहे. गेल्या शुक्रवारी तो ९७ रुपयांनी वाढला होता. वर्षभरात तो चार हजार रुपयांपर्यंत जाऊ शकेल. या शेअरमधली गुंतवणूक कधीही फायदेशीरच ठरते.

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search