Next
राजेंद्रकुमार, नसिरुद्दीन शाह
BOI
Friday, July 20 | 03:45 AM
15 0 0
Share this story

हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘ओरिजिनल ज्युबिलीकुमार’ म्हणून गाजलेला राजेंद्रकुमार आणि आपल्या सशक्त आणि सहजसुंदर अभिनयाने दर्शकांवर गारूड करणारा नसिरुद्दीन शाह यांचा २० जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.... 
राजेंद्रकुमार

२० जुलै १९२७ रोजी सियालकोटमध्ये जन्मलेला राजेंद्रकुमार तुली हा हिंदी सिनेजगताचा ‘ओरिजिनल ज्युबिलीस्टार’ म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या काळी अवघा रूपेरी पडदा दिलीप-राज-देव या त्रिकुटाने व्यापून टाकला होता, त्याच काळात म्हणजे ५०च्या दशकात या रुबाबदार हिरोने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि पाहतापाहता त्याच्या इतक्या सिनेमांनी एकामागोमाग रौप्यमहोत्सवी घोडदौड केली, की आपसूकच त्याला ‘ज्युबिलीस्टार’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या काळी त्याचे सात-सात सिनेमे एकाच वेळी बाजूबाजूच्या थिएटर्समध्ये रौप्यमहोत्सव साजरा करत असत. अर्थातच त्याच्या सिनेमांच्या उत्तुंग यशात उत्तमोत्तम गाण्यांचा आणि सहनायिकांचाही वाटा होता. नौशाद, रवी, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, सचिनदा, एन. दत्ता अशा सर्वच संगीतकारांची रफीसाहेबांच्या आवाजातली कर्णमधुर गाणी त्याच्यावर चित्रित झाली होती. त्याचा अभिनय किंचित मेलोड्रामाकडे झुकणारा असला, तरी प्रामाणिक असायचा. दिल एक मंदिर, संगम, आयी मिलन की बेला, आरजू - अशा चार सिनेमांतल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं. वचन, गूंज उठी शहनाई, धूल का फूल, चिराग कहाँ रोशनी कहाँ, कानून, जिंदगी और ख्वाब, ससुराल, घराना, आस का पंछी, तलाश, शतरंज, अंजाना, गीत, धरती, आप आए बहार आयी, गोरा और काला, जिंदगी  - असे त्याचे इतर सिनेमे चांगलेच गाजले. प्रौढ वयातही त्याने साजन बिना सुहागन, बिन फेरे हम तेरे, साजन की सहेली, लव्ह स्टोरी - अशा सिनेमांतून दर्शन दिलं होतं. १२ जुलै १९९९ रोजी त्याचा मुंबईत मृत्यू झाला. 

(राजेंद्रकुमार यांच्यावर चित्रित झालेल्या ‘याद न जाए बीते दिनों की’ या गीताचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
......  

नसिरुद्दीन शाह 

२० जुलै १९५० रोजी बाराबंकीमध्ये (उत्तर प्रदेश) जन्मलेला नसिरुद्दीन शाह हा समांतर सिनेमांतला दादा माणूस! अत्यंत प्रतिभाशाली आणि आघाडीचा अभिनेता असणाऱ्या नासिरने व्यावसायिक सिनेमांतही आपली जबरदस्त छाप सोडली आहे; पण त्याचं मुख्य प्रेम आहे ते नाटकांवर! हिंदी आणि इंग्लिश रंगभूमी त्याने आपल्या सशक्त अभिनयाने समृद्ध केली आहे. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्याने अभिनयाची पदवी घेतली आणि नाटकं करता करता तो हळूहळू चित्रपटसृष्टीकडे ओढला गेला. उत्कृष्ट अभिनयासाठीचे तीन राष्ट्रीय पुरस्कार, आणि १८ वेळा फिल्मफेअर नामांकन मिळून त्यांपैकी तीन वेळा पुरस्कार, तसंच व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि आयफा पुरस्कारही त्याला मिळालेले आहेत. निशांत, आक्रोश, भूमिका, स्पर्श, मिर्च मसाला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है, भवानी भवाई, जुनून, मंडी, बाजार, जाने भी दो यारों, अर्धसत्य, कथा - या समांतर सिनेमांत त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली; तर जलवा, सुनयना, मासूम, कर्मा, इजाजत, त्रिदेव, मोहरा, चमत्कार, ए वेन्सडे, इश्कियां, दी डर्टी पिक्चर, देढ इश्कियां, सरफरोश यांसारख्या व्यावसायिक सिनेमांतही त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळाली. टॉम अल्टर आणि बेन्जामिन गिलानी या आपल्या सहकलाकारांबरोबर त्याने मोटले प्रॉडक्शन ही नाट्यसंस्था काढून ‘वेटिंग फॉर गोदो’सारखी वैचारिक नाटकं केली. गुलजारजींच्या टीव्ही सीरियलमध्ये त्याने रंगवलेला मिर्झा गालिब कोण विसरेल?

(नसिरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेल्या ‘गधा और गड्ढा’ या नाटकाचं रसग्रहण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........
 
यांचाही आज जन्मदिन :

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक रंगनाथ पठारे (जन्म : २० जुलै १९५०) 
सिनेतारका ग्रेसी सिंह (जन्म : १९ जुलै १९८०)
तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सुरेंद्र बारलिंगे (जन्म : २० जुलै १९२०, मृत्यू : १९ डिसेंबर १९९७) (यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link