Next
असाही एक सिद्धार्थ!
BOI
Thursday, April 26, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सिद्धार्थ प्रभुणेही गोष्ट आहे अशा एका तरुणाची, की ज्यानं आपलं आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलंय. प्राणिप्रेमी असलेला, भौतिकशास्त्र विशेष आवडणारा, उत्तम फोटोग्राफी करणारा, पुढे-मागे न पाहता गरजूंच्या सेवेसाठी धावून जाणारा, अंगी स्वाभिमान असलेला, अन्यायाची चीड असलेला आणि संघर्षासाठी रस्त्यावर उतरणारा हा मुलगा म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जाणून घेऊ या सिद्धार्थ प्रभुणेची गोष्ट...
............
काही वेळा काही माणसं आकस्मिकपणे भेटतात आणि आपल्या इतकी जवळची होतात, की त्यांची वेगळी अशी आठवण करावीच लागत नाही. ती आपल्यात सामावून गेलेली असतात. अशा व्यक्तींमधली एक व्यक्ती म्हणजे शास्त्री! आपण अनवट वाटेवरून चालणार आहोत, हे त्यालाही माहीत नव्हतं आणि या मुलामध्ये इतकं धैर्य आणि इतकी चिकाटी असेल, हे मलाही ठाऊक नव्हतं. 

एका शिबिरात हा मुलगा मला भेटला आणि आम्ही सगळे त्याच्याकडे बघतच राहिलो. कानात बाळी, अंगानं धट्टाकट्टा आणि अंगातला उत्साह ‘दे धडक बेधडक’ असं सांगणारा! शिबिरामध्ये एक खेळ सुरू होता आणि त्यात काही कोडी होती. ती कोडी सोडवत, शोधत पुढचा प्रवास करत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं होतं. सगळ्या मुलांबरोबर सिद्धार्थही सुसाट धावत ही कोडी सोडवत होता. धावत तो जेव्हा समोर आला, तेव्हा घामानं निथळत होता; पण आपण काहीतरी शोधलंय याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. त्याच्याकडे बघून माझा मित्र दत्ता म्हणाला, ‘अरे याचं नाव काही का असेना; पण मला मात्र याचं नाव शास्त्रीच आहे असं वाटतंय.’ आणि त्याच क्षणापासून तो सगळ्यांचा शास्त्री झाला. 

रामशास्त्री प्रभुणेंप्रमाणे अंगी स्वाभिमान असलेला, अन्यायाची चीड असलेला आणि संघर्षासाठी रस्त्यावर उतरणारा शास्त्री नंतरच्या दिवसांमध्ये बघायला मिळाला. शास्त्रीचं खरं नाव सिद्धार्थ प्रभुणे! पुण्यातल्या एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातला हा एकुलता एक मुलगा! आई-वडील दोघंही पुरोगामी विचारांचे आणि आपल्या मुलाला समजून घेत त्याच्याबरोबर मित्र होऊन वाटचाल करणारे! लहानपणी सिद्धार्थ अतिशय खोडकर, दंगेखोर आणि उनाड मुलगा म्हणूनच प्रसिद्ध होता. अभ्यासापेक्षा खेळणं आणि भटकणं या दोन गोष्टी त्याला खूप आवडायच्या. बाहेर गेल्यावर वेगवेगळे प्राणी पकडून आणणं आणि त्यांना पाळणं हे तर आवडतं काम. कुत्रा, मांजर आणि पक्षी कायम घरात असलेच पाहिजेत, असा सिद्धार्थचा जणू काही नियमच बनला होता. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह सिद्धार्थ प्रभुणेत्याचं प्राण्यांवरचं प्रेम पुढे इतकं वाढलं, की बारावीनंतर प्राण्यांचा डॉक्टरच व्हायचं सिद्धार्थनं ठरवलं; पण मग जीवशास्त्र विषय आवडत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यानं इंजिनीअर व्हायचं ठरवलं. इंजिनीअरिंगला अॅडमिशन मिळूनही घरापासून दूर जायचं नाही म्हणून पुण्यातल्या एमआयटी कॉलेजमध्ये ई अँड टीसी डिप्लोमाला त्यानं प्रवेश घेतला. आपला कल इंजिनीअरिंगमध्येही नाही ही गोष्ट दोन वर्षांचा डिप्लोमा झाल्यानंतर त्याच्या लक्षात आली; मात्र भौतिकशास्त्र हा विषय खूप आवडता असल्यानं त्यानं पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएस्सी फिजिक्स आणि फोटोग्राफी या व्होकेशनल कोर्ससाठी प्रवेश घेतला. 

एकीकडे कॉलेजचं शिक्षण सुरू आणि दुसरीकडे त्याच्या मूळच्या स्वभावाचे अनेक पैलू आमच्या नजरेला पडत होते. सिद्धार्थच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे ओळख असो वा नसो, गरजू व्यक्ती दिसली की याचा मदतीचा हात कायम तयारच दिसायचा. मी पुण्यात नुकतीच आले होते आणि त्या वेळी पुण्यात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू होती. माझ्याच मुलाला म्हणजे अपूर्वला डेंग्यू झाला. त्याला ससूनमधून दीनानाथ हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्या वेळी कुठूनतरी बातमी कळल्यानं माझ्या मदतीच्या हाकेची वाटही न बघता शास्त्रीबुवा (याने के सिद्धार्थ) दीनानाथच्या प्रवेशद्वाराजवळ वाट बघत उभे होते. खिशात १५ हजार रुपये आणि हातात कॉफीचा थर्मास! अपूर्वला अॅडमिट केलं, त्या दिवसापासून त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत सिद्धार्थ त्याच्या घरातलं कोणी अॅडमिट असावं अशी काळजी घेत राहिला. अपूर्वची औषधं आणणं, कॉफी आणि बिस्किटं घेऊन येणं, मला जबरदस्तीनं जेवायला लावणं आणि स्वतः त्याच्याजवळ थांबून काही वेळ मला घरी जायला भाग पाडणं ही सगळी कामं तो करत राहिला. या काळात तो माझ्याबरोबर नसता तर, या गोष्टीची मी आज कल्पनाही करू शकत नाही. 

त्यानंतर सिद्धार्थच्या या स्वभावाचं प्रत्यंतर अनेक वेळा येत राहिलं. एकदा आमचं भेटायचं ठरलं; मात्र ठरलेली वेळ उलटून गेली तरी तो न आल्यानं मी फोन केला. तेव्हा मला कळलं, की कोणीतरी कॉलेजच्या मित्रानं त्याला फोन केला होता, की लकडी पुलावर कोणी तरी सायकलवरून चक्कर येऊन पडलं आहे. ही बातमी कळताच सिद्धार्थ महोदय माझ्याकडे येण्याऐवजी लकडी पुलाकडे धावले. बघ्यांची गर्दी नुसतीच गोलाकार जमून चर्चा करत उभी होती. सिद्धार्थ तिथं पोहोचताच त्यानं आधी सायकल बाजूला उभी केली. त्या तरुण मुलाला रिक्षात घातलं आणि आधी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर प्रथमोचार करवले. तो मुलगा जरा शुद्धीवर येताच त्याची नीट विचारपूस करून त्याला घरी सोडलं. त्या मुलाचं हे सगळं करताना तो मुलगा आपल्या ओळखीचा आहे का, तो आपला नातेवाईक आहे का, वगैरे गोष्टींशी सिद्धार्थला काहीही देणंघेणं नव्हतं. अडचणीत, संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केली पाहिजे एवढंच त्याला कळलं होतं. 

एके रात्री उशिरा सिद्धार्थ रस्त्यावरून घराच्या दिशेनं जात असताना एका चोरानं सिद्धार्थचं पाकिट मारलं. त्या वेळी त्याला जाणीव झाली, की काही तरी गडबड झालीय. त्यानं लगेच सावध होऊन त्या चोराच्या नावानं आरडाओरडा सुरू केला. चोर पळायला लागला तसा सिद्धार्थही त्याच्या मागे धावायला लागला. रात्रीच्या त्या निर्मनुष्य वेळी तो चोर आणि त्याचे साथीदार यांनी सिद्धार्थला जिवानिशी मारलं असतं आणि वाचवायलाही कोणी आलं नसतं. एखाद्या चित्रपटात घडावा तसा तो थरार होता; मात्र सिद्धार्थच्या शब्दकोषात भीती हा शब्दच नसल्यानं त्यानं वेगानं धावून चोराला पकडलं आणि आपलं पाकीट ताब्यात घेऊन त्याला चांगलाच चोप दिला. कसाबसा जीव वाचवून चोर सिद्धार्थच्या तावडीतून सुटून पळाला. 

त्यानंतर एकदा सिद्धार्थचा मला फोन आला. ‘दीपाताई, माझ्या मित्राचा एक मित्र आहे. इंजिनीअर होईल आता. त्याची आई नुकतीच वारली आहे आणि त्याच्या आयुष्यात फक्त आईच होती. आता तीही गेल्यानं तो प्रचंड नैराश्यात गेला आहे. त्यानं दोन-तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला सावरणं आणि समजावणं मला जमत नाहीये. प्लीज तू बघ ना.’ मी होकार कळवताच, सायंकाळी सिद्धार्थ त्या तरुणाला घेऊन माझ्या घरीच हजर झाला. मी हळुवारपणे त्या तरुणाला बोलतं केलं. त्याला जगण्याचे अनेक आल्हाददायक, आश्वासक आणि बळ देणारे मार्ग दाखवले. तोही एकदम खूश झाला आणि त्यानंतर सिद्धार्थबुवा आनंदाचा निश्वास सोडत चालते झाले. बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला असताना सिद्धार्थनं पुणे महानगरपालिका कामगार युनियन निर्मित ‘कचराकोंडी’ हा माहितीपट बघितला. तो पाहिल्यावर सिद्धार्थ हादरून गेला. सफाई कामगारांचं जगणं त्याला विसरता येईना. आपल्याला या लोकांना भेटायचंय, यांच्यासाठी काम करायचंय, असं त्याला तीव्रतेनं वाटायला लागलं आणि त्यानं माझ्यामागे भुणभुण लावली. पुणे कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी असलेल्या मुक्ता मनोहर या माझ्या मैत्रिणीशी मी त्याची ओळख करून दिली. हा साधासुधा, कामगारांविषयी आंतरिक तळमळ असलेला मुलगा तिला पहिल्याच भेटीत आवडला. ती म्हणाली, ‘आधी तुझं शिक्षण पूर्ण कर आणि मग आपण ठरवू.’

याच वेळी त्याला आपल्याला काय करायचंय याची दिशा ठरवायची होती. सिद्धार्थच्या जागी दुसरा कोणी असता, तर ही गोष्ट विसरूनही गेला असता; पण सिद्धार्थ मात्र कधी एकदा अंतिम वर्षाची परीक्षा होतेय याची प्रतीक्षा करत होता. परीक्षेचा शेवटचा पेपर संपताच त्यानं मुक्ता मनोहर यांची भेट घेतली आणि २०११च्या जुलै महिन्यात युनियनचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. हे काम त्याला खूपच आवडायला लागलं. कंत्राटी कामगारांचे प्रश्न जास्त जटिल असल्याचं त्याच्या लक्षात आलं. 

खरं तर शिक्षण पूर्ण झाल्यानं कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करण्याच्या अनेक संधी समोर येत होत्या. असं असतानाही सिद्धार्थला एसीमध्ये आरामात बसून गरिबांबद्दलची केवळ कळकळ दाखवण्यात रस नव्हता. मुक्ताच्या भेटीनं त्याला आपल्य जगण्याची दिशा सापडली. हाच आपला मार्ग आहे हे त्याला समजलं आणि मुक्ताचं मार्गदर्शन घेऊन सफाई कामगारांचे प्रश्न समजून घेऊन त्यानं आपलं काम सुरू केलं. 

सफाई कामगारांचं जगणं, त्यांचे प्रश्न, त्यांची व्यसनं, लोकांची उपेक्षा अशा अनेक गोष्टी त्यानं जवळून बघितल्या. त्यांच्यावर होणाऱ्या‍ अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी मुक्ता मनोहर यांच्याबरोबर तो रस्त्यावर उतरू लागला. सफाई कामगारांना काम करताना हातमोजे, बूट, आणि आवश्यक ती साधनं मिळवण्यासाठी त्यानं प्रयत्न केले. त्यांचं मानधन, पगार वेळेत मिळण्यासाठी त्यानं महापालिकेत चकरा मारायला सुरुवात केली. सफाई कामगारांशी मैत्री झाल्यानं त्याला त्यांची सुखदुःखं खूप चांगल्या तऱ्हेनं समजून घेता आली. 

असंघटित, अशिक्षित आणि त्यामुळे सगळ्यात जास्त अन्यायग्रस्त असे हे कामगार होते. त्यांना कायद्यानुसार एका दिवसाचं किमान वेतन २८० रुपये मिळायला हवं होतं; पण प्रत्यक्षात मात्र त्यांना १८० रुपये दिले जात होते. पाच ते सहा महिन्यांत सिद्धार्थने काम करून, वारंवार पाठपुरावा करून आणि माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत अर्ज करून कामगारांना त्यांच्या वेतनाची आणि अधिकाराची जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांच्या हक्काप्रमाणे २८० रुपये त्यांना रीतसर मिळायला सुरुवात झाली. 

अनेकदा कामगार संघटित नसल्यानं त्यांना कधीही कामावरून कमी केलं जात असे. आपलं काम जाईल, या भीतीनं कामगार आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध बोलायलाही घाबरायचे; मात्र संघटनाची ताकद त्यांना समजली आणि दीड ते दोन हजार कामगार एकत्र आल्यावर कंत्राटदार असो वा महापालिकेचे अधिकारी.... त्यांच्यावर दबाव पडतो ही गोष्ट कामगारांच्या लक्षात आली. कामगारांसोबत राहिल्यानं सिद्धार्थवरचा कामगारांचा विश्वास वाढला. युनियनमध्येही त्याच्याविषयी आदराची भावना वाढली आणि युनियनची सदस्यसंख्या वाढीला लागली. ३५०० कामगारांना वेतनवाढीचा फायदा मिळाला. सगळ्या कामगारांना मिळून दर महिन्याला ९० लाखांपेक्षा जास्त रुपये मिळू लागले. ही प्रक्रिया इतकी सोपी नव्हती. काम करताना अनेक अडथळे आणले गेले. राजकारण करण्यात आलं. धमक्या देण्यात आल्या. आरोप करण्यात आले; पण सिद्धार्थ डगमगला नाही. युनियनमधले सहकारी, मुक्ता मनोहर आणि सफाई कामगार पाठीशी असल्यानं त्याला कधीही नैराश्य आलं नाही. 

याचदरम्यान कर्वे इन्स्टिट्यूटमधून ‘एमएसडब्ल्यू’चा (मास्टर इन सोशल वर्क) कोर्स करत असताना, अनेक गरीब मुलामुलींना केवळ फी न भरता आल्यानं शिक्षणाला मुकावं लागतं हे सिद्धार्थनं बघितलं. माझ्याजवळ त्यानं ही खंत व्यक्त केली. एवढ्यावरच गप्प न बसता त्यानं काही दानशूर लोकांना भेटून त्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च उचलण्यासाठी विनंती केली. अशा मुलांचं शिक्षण केवळ सिद्धार्थमुळे पूर्ण होऊ शकलं. एमएसडब्ल्यू करत असताना कॉलेजमधलं जातीवरून चाललेलं राजकारण नजरेला पडताच सिद्धार्थनं बंडाचं निशाण हाती घेतलं आणि ते राजकारण हाणून पाडलं. एमएसडब्ल्यू केल्यामुळे सिद्धार्थच्या कामाच्या पद्धतीत एक शिस्त आली. काम अधिक अभ्यासपूर्ण रीतीनं करण्यावर भर दिला जाऊ लागला. प्रत्येक प्रश्नाकडे तो डोळसपणे बघायला शिकला. 

दिवस भराभर पुढे सरकत असतानाच सिद्धार्थ एका मुलीच्या प्रेमात पडला. जात-धर्म मानत नसल्यामुळे लग्न आंतरजातीयच असणार होतं. मुलगी डॉक्टर आणि हे महाशय लौकिकार्थानं काहीही करत नव्हते. म्हणजे लोकांच्या दृष्टीनं तो चाकोरीबद्ध जीवन जगत नव्हता. गलेलठ्ठ पगार मिळवत नव्हता. सुटाबुटात वावरत नव्हता. अशा वेळी त्या मुलीला मात्र सिद्धार्थ जीवनसाथी म्हणून आवडला होता; पण अशा मुलाला जावई करून घेण्यात मुलीच्या आई-वडिलांना भविष्य दिसत नव्हतं; मात्र मुलीच्या आई-वडिलांना सिद्धार्थनं ठामपणे सांगितलं, की तो आयुष्यभर समाजकार्यच करणार आहे. त्याची ही वाट ठरलेली आहे; मात्र आपल्याबरोबर असणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला उपाशी झोपण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यानं दिली. काहीच दिवसांत मुलीच्या आई-वडिलांचा विरोध मावळला. तृप्ती आणि सिद्धार्थ यांचं लग्न साधेपणानं पार पडलं. (लग्नातली उधळमाधळ कदापि पसंत नसल्यानं त्याचं लग्न साधेपणानं होणार हे उघडच होतं.) 

ही सगळी कामं करत असताना मुक्ता मनोहर यांनी त्याला ‘आता तू स्वतंत्रपणे काम सुरू कर,’ असं सांगून नागपूरला जायला सांगितलं. नागपूरला पोहोचताच तिथल्या सफाई कामगारांची परिस्थिती सिद्धार्थनं समजून घेतली. त्यांचं वेतन अडकून पडलेलं होतं. सगळे सफाई कामगार हवालदिल झाले होते. या परिस्थितीत सिद्धार्थनं त्यांच्याबरोबर उभं राहून शासकीय यंत्रणेसमोर आपलं म्हणणं मांडलं, सातत्यानं पाठपुरावा केला आणि वेळ आली तर संघर्षाचा पवित्रा घेऊ हेही स्पष्टपणे सांगितलं. नागपुरात आधी अकुशल कामगारांना सात हजार आणि कुशल कामगारांना आठ हजार रुपये पगार मिळत होता. सिद्धार्थच्या प्रयत्नांमुळे एक मे २०१६पासून अकुशल कामगारांना १५ हजार आणि कुशल कामगारांना १७ हजार रुपये मिळायला सुरुवात झाली. याचा फायदा सुमारे नऊ हजार कामगारांना मिळाला, हे विशेष. 

सिद्धार्थनं नागपूरमधल्या सफाई कामगारांना न्याय मिळवून दिला; मात्र अमरावती, गडचिरोली आणि अशा अनेक ठिकाणच्या सफाई कामगारांचे प्रश्न आता त्याला खुणावताहेत. तो तिकडेही जाऊन त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय तो अपंग व्यक्तींसाठीही काम करतोय. महानगरपालिका, नगरपरिषदा आदी ठिकाणी कायद्यानुसार अपंगांकरिता तीन टक्के निधी ठेवला जावा याकरिता तो काम करतो. नागपूर महानगरपालिकेत सिद्धार्थच्या प्रयत्नांमुळे १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. खरं तर कायद्याप्रमाणे ती ४० कोटींची असायला हवी. यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 

या अनवट वाटेवरून चालताना सिद्धार्थची आर्थिक प्राप्ती शून्य आहे; मात्र तृप्तीचं त्याच्या वाटचालीतलं योगदान खूप मोठं आहे. समता मानणारा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जपणारा आणि अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा आपला नवरा इतरांपेक्षा वेगळा आहे, याची जाणीव तृप्तीला आहे. तसंच मित्रांनाही आपल्या या ‘सर्किट सिद्धार्थ’चा अभिमानच वाटतो. त्याच्यात एक उत्कृष्ट कुशल फोटोग्राफर दडलेला असल्यानं काम करत असताना अनेक बोलके फोटो त्याच्या कॅमेऱ्यात बंदिस्त होतात आणि योग्य वेळी बाहेरही येतात. वन्य प्राणी-पक्षी आणि सामाजिक प्रश्न यांच्याशी निगडित फोटो त्यानं काढले आहेत. तसंच ‘किमान वेतन हक्काचे’ या कामगार कायदेविषयक माहितीपुस्तिकेचं संपादन त्यानं केलं आहे. 

ओरिगामीसिद्धार्थला ओरिगामीची कला उत्तमरीत्या अवगत असल्यानं तो लहान मुलांपासून कुठल्याही वयोगटात सहजपणे मिसळतो आणि आपली कला त्यांनाही शिकवतो. त्याला आदरातिथ्य करण्याची प्रचंड आवड असून, अनेक पदार्थ बनवता येत असल्यानं सतत मित्र-मैत्रिणींना जमवून त्यांना वेगवेगळे चविष्ट पदार्थ करून खाऊ घालण्यात त्याला खूपच आनंद मिळतो.

आपलं संपूर्ण आयुष्य ठरवून कष्टकरी लोकांसाठी घालवणाऱ्या, भौतिक सुखसोयींचा त्याग करणाऱ्या, आपल्या गरजा मर्यादित ठेवणाऱ्या, सतत आनंदी राहणाऱ्या आणि इतरांना आनंद वाटत राहणाऱ्या सिद्धार्थ प्रभुणे ऊर्फ शास्त्री याला पुढल्या वाटचालीसाठी आणि त्याच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

संपर्क : 
ई-मेल : meetsmp007@gmail.com
सिद्धार्थचा ब्लॉग : http://sprabhune.blogspot.in

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राजन किसन भातंब्रेकर About
सिद्धार्थ तुमच्या या कार्याला माझा विनम्र नमस्कार, पुढील आयुष्यात आपल्याला खूप खूप शुभेच्छा
0
0
सुनील पाटील About
सिद्धार्थ च्या कामास सलाम
0
0
प्रा.सुरेश खेडकर (वाडी ,नागपूर) About
खूप छान लेख. आवडला. धन्यवाद.
0
0
श्रीकांत About
शास्त्री चे कार्य खूप ग्रेट आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search