Next
मराठा चेंबरतर्फे महिला उद्योजिकांच्या वस्तूंचे प्रदर्शन
BOI
Saturday, March 02, 2019 | 01:02 PM
15 0 0
Share this story

मराठा चेंबरतर्फे आयोजित महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना सुनंदा पवार. या वेळी गायिका वैशाली सामंत,सोनाली शिंदे, मानसी बिडकर, ऋतुजा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.पुणे : येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) आठ मार्च रोजी असणाऱ्या आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, एक मार्च २०१९ रोजी पुण्यात महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. गायिका वैशाली सामंत, ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय संचालक सोनाली शिंदे, मानसी बिडकर, ऋतुजा जगताप, ‘एमसीसीआयए’चे प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, ‘महिला उद्योजिकांनी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यांची उत्पादने विकण्यासाठी नवनवीन मार्गांचा वापर केला पाहिजे. एकमेकांचे अनुकरण करण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवनवीन माहिती घेणे, नवीन पद्धती जाणून घेणे उपयुक्त ठरेल.’ 

मार्गदर्शन करताना सुनंदा पवार


‘आजही अनेक होतकरू महिला उद्योजिका घरातून पाठींबा मिळत नसल्याने पुढे येऊ शकत नाहीत. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होणेही आवश्यक आहे,’ असेही पवार यांनी सांगितले.

गायिका वैशाली सामंत यांनी आपला गायिका आणि उद्योजिका होण्याचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘तीन भागीदारांसह मी पिझ्झा बॉक्स या उद्योगात प्रवेश केला;पण आम्हाला हा छंद म्हणून करायचा नव्हता त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच अत्यंत व्यावसायिक पातळीवर त्याची आखणी केली. आंतरराष्ट्रीय मानांकने त्यात आणली. एखादा ब्रँड विकसित करायचा असेल, तर त्यासाठी अथक प्रयत्न करावेच लागतात. कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड मेहनत आणि सहनशक्तीची गरज असते.’

या वेळी डॉ. सोनाली शिंदे यांनी उत्तम आरोग्यदायी आयुष्यासाठी व्यायामाची गरज स्पष्ट केली. ‘सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा आपल्या जीवनशैलीत अवलंब करणे आवश्यक आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मानसी बिडकर यांनी मराठा चेंबर महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योजक महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ऋतुजा जगताप यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link