Next
‘तीन दशकांचं, दृढ होत जाणारं नातं’
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Monday, June 26, 2017 | 02:00 PM
15 0 0
Share this story

‘‘गंधर्व’ला नाटक करणं हे जणू एक स्टेटस सिम्बॉल असल्यासारखं असायचं!....’ ही भावना आहे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची. ‘बालगंधर्व’च्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्यानं त्यांची भेट घेतली असता, त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला, या नाट्यगृहाची वैशिष्ट्यंही सांगितली आणि तीन दशकांहून अधिक काळ या नाट्यगृहाशी असलेलं आपलं नातं आता अधिकच दृढ होत असल्याची भावनाही व्यक्त केली. 
...........................

आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत ११ हजार ४००पेक्षाही जास्त प्रयोग करणारा आणि प्रेक्षकांची नस अचूक ओळखणारा मराठी रंगभूमीवरचा सर्वांचा लाडका सुपरस्टार अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. बालगंधर्व रंगमंदिराशी आपलं जवळपास तीन दशकांहून जुनं नातं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

ते म्हणाले, ‘बालगंधर्व रंगमंदिराशी माझा १९८४पासून संबंध आहे. त्या वेळी मी ‘टूरटूर’ हे नाटक करत होतो. तेव्हा आम्हा कलाकारांची राहण्याची सोय ‘बालगंधर्व’मध्ये वरच्या खोल्यांत होत असे. इथली व्यवस्था उत्तम असे. ‘गंधर्व’ हे सर्वार्थाने उत्कृष्ट डिझाइन असलेलं नाट्यगृह आहे. आपण ‘पुलं’च्या दूरदृष्टीचं कौतुक केलं पाहिजे. बघा ना, त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी हे बांधून घेतलं ज्यात उत्तम रंगमंच, सेटचा ट्रक थेट रंगमंचापर्यंत नेण्यासाठी धक्का, उत्तम ध्वनिव्यवस्था, बाहेर अतिशय सोयीचं पार्किंग, गाड्या पार्क करून आल्यावर समोरच तिकिटांची खिडकी, खिडकीच्या बाजूलाच प्रेक्षकांसाठी मुख्य प्रवेशद्वार, म्हाताऱ्या माणसांचाही विचार केलेला, केवळ पाच पायऱ्या चढल्या की आपण प्रेक्षागृहात प्रवेशतो, लहान बाळ रडल्यास इतर प्रेक्षकांचा रसभंग न होता, पालकांना ‘क्राय रूम’मध्ये बाळाला घेऊन तिथल्या काचेतून नाटक बघण्याची आणि ऐकण्याची सोय, मध्यंतरात प्रेक्षकांसाठी प्रेक्षागृहालगतच उत्तम कँटीन, नाटक संपल्यावर कलाकारांसाठी श्री. जोशी यांच्यातर्फे जेवणाची उत्तम सोय, सोयीची रिहर्सल रूम, याशिवाय नाट्यगृहाला लागूनच उत्तम कलादालन या इतक्या बारीकसारीक गोष्टींचा विचार केला होता. खरं तर अशा प्रकारची नाट्यगृहे सर्वत्र असायला हवीत. ‘गंधर्व’ला नाटक करणं हे जणू एक स्टेटस सिम्बॉल असल्यासारखं असायचं!’

एकीकडे हे सांगत असताना प्रशांत दामले यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली. ती म्हणजे, ते स्वतः नाटकांकडे ‘सर्व्हिस इंडस्ट्री’ म्हणून पाहतात. ही सेवा अशी विशेष आहे, की जी पुरवण्याआधीच ग्राहकाकडून पैसे घेतले जातात. त्यामुळे उत्तम प्रकारे नाटक सादर करणं, याकडे ते स्वतः अतिशय गांभीर्याने पाहतात. आपल्या कारकिर्दीतला एक अद्भुत विक्रम त्यांनी १८ जानेवारी २००१ या दिवशी बालगंधर्व रंगमंदिरात केला, तो आपल्याच तीन नाटकांचे एकापाठोपाठ एक सलग पाच प्रयोग करून! सकाळी साडेसात वाजता त्यांनी पहिला प्रयोग सुरू केला आणि रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पाचवा प्रयोग संपला. यात त्यांनी ‘गेला माधव कुणीकडे’चे दोन, ‘एका लग्नाची गोष्ट’चा एक आणि ‘चार दिवस प्रेमाचे’चे दोन प्रयोग केले होते. त्यांच्या कारकिर्दीतला ‘सात हजार सातशे ७७वा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरातच होता. त्याच सुमारास लातूरला भूकंप झाला होता आणि त्या वेळी दामले यांनी, त्या प्रयोगाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री विलासराव देशमुखांकडे ‘७७ हजार सातशे ७७’ रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला होता. 

प्रशांत दामले यांचा आणखीही एक विक्रम म्हणजे त्यांनी याच नाट्यगृहात आयोजित केलेला सलग १२ तासांचा सांगीतिक कार्यक्रम. त्यात महाराष्ट्रातले संगीताचे सर्व प्रकार सलग १२ तास सादर करण्यात आले होते. आजही प्रशांत दामले यांची तीन नाटकं ‘बालगंधर्व’मध्ये हाऊसफुल गर्दीत चालू असतात आणि त्यांचे या नाट्यगृहाशी ३४ वर्षांपासून असलेलं नातं अधिकच दृढ होत आहे. 

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link