Next
‘पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये बेली ब्रिज उभारणार’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोलीत घोषणा
प्रेस रिलीज
Tuesday, February 19, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this storyगडचिरोली : ‘गेल्या चार वर्षांत स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. मी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संधी मिळेल तेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी हे शासन कटिबद्ध असून, पावसाळ्यात जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या ८२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे १०० बेली ब्रिज उभारले जातील,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

गडचिरोलीमधील सोनापूर येथे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण, प्रमुख पुलांचे उद्घाटन, महामार्गांचे ई-भुमिपूजन व लाभार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम स्थानिक कृषी  महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. या वेळी राज्याचे वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीशराव अत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.  

या वेळी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आमदार कीर्तीकुमार भांग‍डिया, नगराध्यक्ष योगिता पिपरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, ‘भाजप’चे अल्पसंख्यक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, तसेच बाबूराव कोहळे आदींची उपस्थिती होती.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांचे स्वागत अगदी साधेपणाने करण्यात आले. मुख्य समारंभ सुरू होण्यापूर्वी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपुल वनसंपदा असल्यामुळे मुबलक पाणी असतानाही मोठे सिंचन प्रकल्प उभे करता येत नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत केंद्रीत सिंचनाकडे लक्ष देतांना ११ हजार विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आल्या. विहिरी, शेततळे, छोटे पूल कम बंधारे या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे.  विहिरीसोबतच मोटर पंप, वीज जोडणी नियमित मिळेल याकडे लक्ष वेधले आहे. कृषी विद्यापीठाच्या या ठिकाणच्या महाविद्यालयातून जिल्ह्याला पूरक ठरेल अशा मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.’

‘पावसाळ्यात या जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावांना बेली-ब्रिजद्वारे जोडण्यात येईल. या गावांचा विकास थांबता कामा नये. तसेच जिल्ह्यातील गोदावरीसोबतच आता प्राणहिता, इंद्रावती या नदींवरील पुलांचे काम लवकरच पुर्णत्वास येईल,’ असे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी मांडलेल्या ‘मेक इन गडचिरोली’ संकल्पनेला राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाईल असे सांगताना फडणवीस म्हणाले, ‘या भागात मोठे उद्योग उभे राहिले की, रोजगाराला निश्चितच चालना मिळणार आहे. त्यामुळे ‘मेक इन गडचिरोली’ मोहिमेचे आपण स्वागत करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, असंघटीत कामगारांना तीन हजार निवृत्तीवेतन देणारी योजना, किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार देण्यासाठी देश पातळीवर ७५ हजार कोटींची केलेली तरतूद, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला गॅस जोडणी, घराघरात वीज, आदी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.  आवास योजनेच्या माध्यमातून २०२२पर्यंत देशात सर्वांना घरे देण्याचा त्यांचा उद्देश आहे. तथापि, महाराष्ट्रात २०२०पर्यंत सर्वांनाच घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

‘गडचिरोली जिल्ह्यातील पेसा गावामध्ये आदीवासींसोबतच ओबीसींनादेखील सवलती मिळण्याबाबत ट्रायबल ॲडव्हसरी कमिटीने काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीच्या माध्यमातून ओबीसींनाही आरक्षण दिले जाईल. ओबीसींच्या न्याय्य हक्काचे रक्षण केले जाईल,’ असे त्यांनी शेवटी सांगितले.  

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, ‘गडचिरोली जिल्ह्यातील विपुल वनसंपदा, मुबलक पाणी, खनिज संपदा बघता हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत प्रगत जिल्हा असायला पाहिजे होता; मात्र दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिला. म्हणून गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण स्वत: या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष वेधत आहे.’

‘कृषी विद्यापीठाच्या चार भिंतीतले संशोधन थेट शेतकऱ्यांच्या शिवारात बरकत आणण्यासाठी कामी आले पाहिजे. ज्या गोष्टींमुळे आयात कमी होऊ शकते, मुबलक पैसा मिळू शकते, सामान्यांच्या आयुष्यात समाधान येऊ शकते त्या पिकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य द्यावे. सोबतच जिल्ह्यात कोणते प्रयोग केल्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होईल या संदर्भातील योजना जिल्हा नियोजनातून तयार करण्यात यावी,’ असेही गडकरींनी या वेळी सुचविले.फडणवीस व गडकरी यांनी कृषी महाविद्यालयाची इमारत,  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कठाणी नदीवरील पूलाचे लोकार्पण केले. यासोबतच आमगाव ते आलापल्ली, ब्रम्हपूरी ते धानोरा महामार्गाचे भुमिपूजन केले. जिल्ह्यातील गती- दोन योजनेअंतर्गत युवकांना ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर स्टँडअप इंडियाअंतर्गत २० लाभार्थ्यांना टाटा ट्रक ४० टक्के सबसिडीवर देण्यात आला. लॉयडस् स्टील तथा खनिकर्म निधीतून ही मोहीम राबविण्यात येत आहे.  या प्रसंगी ‘लॉयडस्’चे अतुल खाडिलकर उपस्थित होते.

‘शासनाने गडचिरोलीतील विकास हा प्राधान्याचा विषय मानल्यामुळे चार वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. केंद्रातील योजनांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पुढाकार घेतल्यामुळे विकासाचा वेग वाढला आहे. या बद्दल मी दोघांचेही आभार याप्रसंगी मानतो,’ या पालकमंत्री अत्राम यांनी सांगितले.

‘गडचिरोली जिल्ह्यात १२ हजार कोटींचे रस्ते होत आहेत. हे प्रथमच घडत आहे. गेल्या २० वर्षांत बांधलेच गेले नाहीत अशा भागात रस्ते होत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हजार कोटी मंजूर करून रस्त्यांची कामे होत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावात वीज पुरवठा गेल्या तीन वर्षांत झाला. सोबतच पाणी पुरवठा व इतर कामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवे तंत्र व शेतीची माहिती होऊन उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे.’ या वेळी अहेरी येथील रुग्णालय उभारणीच्या निर्णयाबद्दल पालकमंत्र्यांनी आभार मानले.

खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link