Next
लहान मुलांच्या लठ्ठपणावर उपचारासाठी संकेतस्थळ
शस्त्रक्रियेसाठी शासन मदत करणार
BOI
Tuesday, January 08, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:

लहान मुलांच्या लठ्ठपणाबाबत माहिती देणाऱ्या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, अभिनेता आमिरखान, डॉ. संजय बोरुडे.

मुंबई : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही लहान मुलांच्या लठ्ठपणाची समस्या गंभीर होत असून, वेळीच उपचार मिळावेत आणि प्रबोधन व्हावे या उद्देशाने शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने www.childobesity.in संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. नुकतेच याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. 

या कार्यक्रमाला अभिनेते अमिर खान उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे, डॉ. संजय बोरुडे आदी मान्यवर देखील या वेळी उपस्थित होते. 

‘ज्या बाल रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना आवश्यकता भासल्यास शासनातर्फे सामाजिक दायित्वनिधी अंतर्गत मदत मिळवून देण्यात येईल’,असे महाजन यांनी या वेळी सांगितले.

राज्य शासनामार्फत ‘फाईट ओबेसिटी’ या उपक्रमांतर्गत लठ्ठपणाच्या समस्येवर सातत्याने काम करण्यात येत आहे. चाईल्ड ओबेसिटी सपोर्ट टीम (COST) तयार करण्यात आली आहे.या अंतर्गतच लहानमुलांच्या लठ्ठपणावर लक्ष केंद्रीत करून काम करण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.  


या वेळी बोलताना महाजन म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सुमारे २२ टक्के लहान मुले ही लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या पद्धती, बदललेली जीवन शैली आणि काही वेळा परिवारातील जीन्स यामुळे लठ्ठपणा संभवतो. त्याच्या दुष्परिणामाने हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार बळावतात. दिवसेंदिवस मोबाईलच्या वाढलेल्या वापरामुळे मुले मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. शारीरिक व्यायाम न मिळाल्याने लठ्ठपणा वाढतो आहे. डॉ.बोरुडे यांच्या उपक्रमामुळे देशातीलच नव्हे तर जगातील मुलांच्या आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध झाली आहे.’

अभिनेते आमिर खान म्हणाले, ‘आपल्या देशात एकीकडे लहान मुलांच्या कुपोषणाची समस्या वाढलेली आहे, तर त्याचवेळी लहान मुलांमधील चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढलेली लठ्ठपणाची समस्या आहे. डॉ. बोरुडे यांनी सुरू केलेल्या उपक्रमातून या समस्येवर उपचार करता येणार आहेत. लहान मुलांवर उपचार करणे अवघड आहे, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया करून वजन कमी करणे हा शेवटचा उपाय ठरतो.’ 

‘मनाशी निश्चय केला तर कोणालाही वजन कमी करणे शक्य आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मी स्वतः पाच महिन्यात फॅट लॉस केला आहे,’ असे आमिरखान यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

‘लठ्ठपणाच्या समस्येला समूळ नष्ट करायचे असल्यास लहान मुलांच्या लठ्ठपणावर काम करणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या लठ्ठपणावर काम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वेबसाईट व इतर उपक्रमांतर्गत जनजागृती, तसेच तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत,’ असे डॉ. संजय बोरुडे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search