Next
रसिकांना ‘यक्षनगरी’ची सफर
BOI
Thursday, March 16, 2017 | 03:29 PM
15 5 0
Share this story

'यक्षनगरी' आणि 'दहा क्लासिक्स' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करताना मान्यवर.पुणे : ‘समीक्षा व्यवहार कोसळला, की कला प्रांताच्या अधःपतनास सुरुवात होते. म्हणूनच सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षा करणारे श्रीपाद ब्रह्मे व लेखिका अनिता पाध्ये यांच्या नव्या पुस्तकांना विशेष दाद द्यायला हवी. कारण या दोघांनी आपल्या नि:पक्षपाती लेखनाने चित्रपट समीक्षेचा, तसेच कला प्रांताचाही दर्जा राखला,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी केले.

चित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘यक्षनगरी’ व अनिता पाध्ये यांच्या ‘दहा क्लासिक्स’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा शनिवारी (११ मार्च) झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. जोशी बोलत होते. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे श्री. ब्रह्मे यांच्या ‘यक्षनगरी’ या पुस्तकाचे ‘ई-बुक’ही या वेळी प्रकाशित करण्यात आले. ‘आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार, समदा प्रकाशनच्या संचालिका मनस्विनी प्रभुणे, ‘आयाम फिल्म क्लब’चे वीरेंद्र चित्राव, स्वाती जरांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

डॉ. जोशी म्हणाले, ‘उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम दर्जाचे हनन हा समीक्षणाचा धर्म असतो. त्याला अनुसरून चित्रपट समीक्षा हादेखील गंभीरपणे पाहण्याचा एक व्यवहार आहे. श्रीपाद ब्रह्मे यांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून केलेली चित्रपट समीक्षा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी योग्य दिशा दाखवते. अशा वेळेस राजकारण व चित्रपट निर्माता, अभिनेत्यावरील प्रेम याची आडकाठी न घेता ब्रह्मे चित्रपटांचे परीक्षण करतात. त्यामुळेच त्यांची परीक्षणे कायम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘यक्षनगरी’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.’

प्रमुख वर्तमानपत्रांत सातत्याने चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या लेखिका अनिता पाध्ये यांच्या ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकाचीही प्रा. डॉ. जोशी यांनी प्रशंसा केली. ‘आपल्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण लेखनाने अनिता पाध्ये यांनी काळाच्या ओघातही चिरंतन राहिलेल्या दहा उत्कृष्ट कलाकृतींची सफर या पुस्तकाद्वारे घडवली आहे. त्यांना भावलेल्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांचा आणि त्यांच्या निर्मितीमागील इतिहास वाचकांना उलगडून दाखवताना अनिता पाध्ये यांनी आपल्या कष्टाळू संशोधन वृत्तीने त्या काळातील निर्माते, तंत्रज्ञ, अभिनेते यांच्याकडून माहिती व मुलाखती घेण्यासाठी जी धडपड केली आहे, ती अभ्यासपूर्ण मेहनत कौतुकास्पद आहे. त्यामुळेच या ‘क्लासिक’ चित्रपटातील कलाकारांचे मनस्वीपण, निर्मात्यांचा ध्यास, त्या वेळी असलेल्या या मोहमयी चंदेरी दुनियेची कार्यसंस्कृती अशा अनेक पैलूंची ओळख वाचकांना होते,’ अशा शब्दांत प्रा. जोशी यांनी कौतुक केले.

मृणाल कुलकर्णी यांनीही अनिता पाध्येंच्या संशोधनवृत्तीला भरभरून दाद दिली. ‘अनिताने या पुस्तकासाठी केवळ अभ्यासपूर्ण लेखन व संशोधनच केलेले नाही, तर देवप्रिया पब्लिकेशन्स या नावाने स्वतःच पुस्तक छापून अगदी आकर्षक स्वरूपात व कमी किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिले,’ असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ‘अभिजात निर्मितीच्या या टप्प्यांवर ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या माध्यमांद्वारे योगदान देण्यास ‘बुकगंगा’ नेहमीच तत्पर आहे,’ असे ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी सांगितले.

समदा प्रकाशनच्या मनस्विनी प्रभुणे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. ‘समदा प्रकाशनने या पुस्तकासाठी लिहिते केल्याबद्दल, या कार्यक्रमाला आपली आवडती अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित राहिल्याबद्दल आणि कार्यक्रम ‘एनएफएआय’च्या वास्तूत होत असल्याबद्दल ब्रह्मे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, यामुळे आपली तिन्ही स्वप्ने पूर्ण झाल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर स्वाती जरांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


महिलाविषयक चित्रपट
आयाम, आशय फिल्म क्लब आणि नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्षे आठ मार्चच्या सुमारास महिला दिनाला अनुसरून महिलांवर आधारित असलेल्या देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते. महिलांविषयक असलेल्या एखाद्या कल्पनेवर आधारित चित्रपटांचे प्रदर्शन होते, शिवाय त्या अनुषंगाने परिसंवाद, चर्चासत्रेही आयोजित होतात. त्याची माहितीही या वेळी देण्यात आली. 

(प्रतिनिधी)
 
15 5 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link