Next
मालिका, चित्रपटांचा आत्मा - पटकथा लेखन
BOI
Sunday, December 16, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. एखादी कथा पडद्यावर आणताना त्याची पटकथा आणि संवाद लिहिणे हे कौशल्याचे, तसेच तांत्रिक काम आहे. प्रेक्षकांना त्याबद्दल काहीच माहिती नसते. प्रत्येक दृश्य पडद्यावर कसे दिसावे, याचा पटकथा हा सूक्ष्म आराखडा असतो. या पटकथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र’ यांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
............
लेखनाची आवड असलेल्या लोकांसाठी आज अनेक प्रकारची माध्यमे उपलब्ध आहेत. नियतकालिके, रेडिओ, दूरदर्शन, मालिका, नाटक, चित्रपट इत्यादी इत्यादी. त्या प्रत्येक माध्यमासाठी स्वतंत्र अशी लेखनशैली आणि पथ्ये आवश्यक असतात. उदाहरणार्थ, वृत्तपत्रात लिहिताना कुठे, कसे, कधी, का, काय, कोणी (Five W & One H) हा तपशील द्यावा लागतो. रेडिओ हे ऐकण्याचे माध्यम आहे. त्यामुळे संवाद/मजकूर लिहिताना ‘दृश्य’ गोष्टींचे अपेक्षित वर्णन स्पष्ट द्यावे लागते. चित्रपट हे तर अत्यंत प्रभावी माध्यम. एखादी कथा पडद्यावर आणताना त्याची पटकथा आणि संवाद लिहिणे हे कौशल्याचे, तसेच तांत्रिक काम आहे. प्रेक्षकांना त्याबद्दल काहीच माहिती नसते. प्रत्येक दृश्य पडद्यावर कसे दिसावे, याचा पटकथा हा सूक्ष्म आराखडा असतो. या पटकथा लेखनाचे ‘तंत्र आणि मंत्र’ आपण या लेखात बघणार आहोत. मराठी-इंग्रजीत पटकथा या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. काही गाजलेल्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या (उदा. महाभारत) पटकथा पुस्तक रूपाने छापलेल्या आहेत. तथापि तज्ज्ञ व्यक्तींकडून शिक्षण/मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभव हे केव्हाही अधिक उपयुक्त ठरतात. 

सत्यजित रेचित्रपट ही दृश्यकला आहे. अनुभव आणि कल्पना यांची सांगड त्यात घातलेली असते. मूळ कथाबीजापासून तिथे विस्तार करायचा असतो. चित्रीकरण घरात आहे की बाहेर, दिवसाचा काळ, शॉट कुठल्या प्रकारे घ्यायचा आहे, प्रसंगाचा क्रम, पार्श्वसंगीत, अपेक्षित पात्रे, त्यांची स्थाने अशा अनेक गोष्टींचे भान पटकथा लिहिताना ठेवावे लागते. तशा स्पष्ट नोंदी असाव्या लागतात. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार यांच्यासाठी त्याचे महत्त्व आहे. सत्यजित रे, व्ही. शांताराम यांच्यासारख्या मोजक्या व्यक्ती कथा-पटकथा-संवाद या तीनही गोष्टी समर्थपणे लिहू आणि सांभाळू शकतात. मोठ्या चित्रपटातसुद्धा ९० टक्के कामासाठी एकच कॅमेरा वापरला जातो. त्याच्या कक्षेत १८० अंशांचा विस्तार बसू शकतो. लेखकाने कथेचा आशय आणि त्याचा संकल्पित विस्तार सदैव डोक्यात ठेवला पाहिजे. मूळ कल्पना ते अंतिम पटकथा ही त्याची प्रक्रिया आहे. जागा, सर्व आवश्यक सामान (प्रॉपर्टी), काळ जुना आहे का वर्तमान, प्रसंग मांडणी, कुठल्याही प्रकारे तर्काला धक्का न बसता एकामागून एक येणारे प्रसंग सहजगत्या चित्रित व्हावे लागतात. 

व्ही. शांतारामचित्रपट कलात्मक व व्यावसायिक असे दोन प्रकारचे असतात. लघुपट, लघुचित्र, वेबसीरिज असे नवे प्रकार उदयाला आलेले आहेत. अॅमेझॉन, नेटफ्लिक्सवरून ४०-५० मिनिटांचा एक भाग अशा दहा-दहा भागांचे तीन सीझन पाहायला मिळतात. त्यातील विषयांना कसलेच बंधन नाही. तसेच अजून तरी ‘सेन्सॉर’चे भय नाही. मुक्त धिंगाणा! कथा-पटकथाकारांना कामासाठी आता किती संधी उपलब्ध आहेत, हे आपल्या लक्षात येईल. चित्रपट चालावा आणि त्यातून खर्च तर निघावाच; पण चांगला फायदाही व्हावा, ही प्रत्येक निर्माता - दिग्दर्शकाची अपेक्षा असते. म्हणूनच या उद्योगाकडे गंभीरपणे पाहावे लागते. सर्वच बाबतींत निर्मिती निर्दोष हवी. त्यानंतर चित्रपट चालतो का नाही, हे ज्याचे त्याचे नशीब! भल्याभल्यांना ते गणित पूर्णपणे सुटलेले नाही. विस्तारभयास्तव उदाहरणे देण्याचा मोह टाळत आहे. परंतु अशा अनेक कथा माध्यमांमधून समोर येत असतात. 

चित्रपट हे दृक्-श्राव्य माध्यम आहे. चांगल्या कलाकृतींसाठी पैसा नेहमीच उभा राहू शकतो. कितीतरी तरुण आणि नव्या कलाकारांनी (यात लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार हे सर्वच आहेत) आपल्या पहिल्याच निर्मितीमध्ये मोठे यश मिळवलेले आहे. पडद्यामागे काय काय आणि कसे घडते, याचा बारकाईने अभ्यास लेखकाला करावा लागतो. १०० ते १८० मिनिटांच्या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर स्पष्ट दिसावा लागतो. हॉलिवूड त्या बाबतीत दीर्घ काळ अग्रेसर आहे; पण भारतही अनेक भाषांमधील निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. निर्मिती हे अनेक जणांनी एकत्रितपणे करावयाचे कार्य आहे. दर्जा (कला) आणि व्यवसाय यांचा समन्वय राखता आला पाहिजे. प्रेक्षकांची करमणूक हा सगळ्याचा मध्यवर्ती भाग आहे. माहिती आणि ज्ञान आपोआप जोडीला होत असते. 

‘प्रभात’चे सर्वेसर्वा : बापूराव पेंटर, धायबर, फत्तेलाल, दामले, व्ही. शांतारामआपला प्रेक्षक कोण आहे, हे ठाऊक असले पाहिजे. लेखकांना आज भरपूर संधी उपलब्ध आहेत. मराठी-हिंदी-प्रादेशिक भाषांत ७०० वाहिन्या उपलब्ध आहेत. काही काळानंतर मोबाइल, अँड्रॉइड हीच माध्यमे असणार आहेत. सध्या चित्रपटगृहात हजर असलेल्या प्रेक्षकांची स्थिती काय असते, हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून आपली ‘कलाकृती’ उत्कृष्ट दर्जाचीच असली पाहिजे. ‘मागणी तसा पुरवठा’प्रमाणे ‘मार्केट तशी निर्मिती’ हेच गणित आहे. जाहिरातींचे उत्पन्न हा एक कळीचा मुद्दा आहे. कित्येक मालिका कंटाळवाण्या, निष्कारण लांबवलेल्या, टुकार असतात. परंतु त्यांचा टीआरपी चांगला असतो. त्यामुळे जाहिराती मिळतात. उत्पन्न वाढते. लेखक-कलाकार संपन्न होतात. या सर्व गोष्टी ज्ञात असल्या पाहिजेत. समाजमाध्यमांवरून नव्या कलाकृतींना त्वरित प्रतिसाद मिळत असतो, तिकडे लक्ष हवे. प्रेक्षकांना करमणुकीबरोबरच काहीतरी वेगळे पाहिल्याचा आनंद, अनुभव मिळालाच पाहिजे. सगळेच चित्रपट सगळ्यांसाठी नसतात. विशिष्ट प्रेक्षकांसाठी, कलात्मक निर्मितीसाठी तशी खास कलाकृती बनवावी लागते. त्याला तुलनेने खर्च कमी येतो, आणि उत्पन्नही कमीच असते. 

मालिका बघणे म्हणजे दुसऱ्याच्या घरात डोकावणे. आपण स्वतःशी त्यांची तुलना करत असतो. त्यात काय काय हवे? भव्यता संघर्ष, लोकांना रुची असलेल्या गोष्टी, कुतूहल, ठसठशीतपणा, मोठमोठे आवाज, परिणामकारक पार्श्वसंगीत, इत्यादी इत्यादी. प्रामुख्याने महिला प्रेक्षक असल्यामुळे कौटुंबिक नाट्य रंगवावे लागते. आकर्षक सुरुवात, पुढे काय ही उत्कंठा, आणि प्रत्येक भागाचा अनपेक्षित, ‘आता उद्या काय होणार’ याची वाट बघायला लावणारा शेवट, ही लेखनाची वैशिष्ट्ये असावी लागतात. त्यासाठी भरपूर वाचन, ग्रंथालयीन संदर्भ बघणे आणि मालिका व चित्रपट भरपूर बघणे आवश्यक आहे, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी! लेखनाचा भरपूर सराव असला पाहिजे. सहकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे त्यात बदल करण्याची तयारी हवी. चित्रपट किंवा मालिकेच्या यशावर लाखो रुपयांची उलाढाल अवलंबून असते. मेलेली व्यक्ती जिवंत होणे, एखादी महत्त्वाची भूमिका बजावणारा कलाकारच बदलणे, हे प्रकार आपण बघतो आणि ते समजूनही घेतो. कथानक आयत्या वेळी बदलले जाते. ‘पटकथा-संवाद’वाले सेटवर सदैव हजर असतात. त्यांना मिळणाऱ्या सूचनेप्रमाणे लिहून द्यावे लागते. या सगळ्यांना जो पुरा पडतो तो यशस्वी लेखक!

पटकथाकार मूळ कथेवर योग्य ते संस्कार करून ती विकसित करतो. काही वेळा कथानकात गरजेनुसार बदलही करावे लागतात. सुरुवातीला कथेची प्राथमिक मांडणी, मग तिचा विस्तार करताना काही संघर्ष, मतभेद, गैरसमज इत्यादी नाट्य, नंतर ते वाढवत नेत अखेर उत्कर्षबिंदूला त्याचे उत्तर (गोड किंवा कडू शेवट) ही पटकथेची ढोबळ रूपरेषा असते. कोणत्याही विषयावरचा चित्रपट असला, तरी थोड्याफार फरकाने हेच सूत्र आढळते. आधी लिहिल्याप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन हाच त्यामागचा उद्देश असतो. प्रेक्षक ताणतणावाखाली असतात, त्यांच्या दबलेल्या भावना असतात, त्यांचे विरेचन चित्रपट बघताना होते. ताण वाढवणे आणि तो हलका करणे, स्वतःला विसरणे, नायक-नायिकांच्या भूमिकेत स्वतःला बघणे हीच करमणूक होय. प्रेक्षक समोरची कहाणी जगत असतो. 

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. तो ‘रिंगमास्टर’प्रमाणे सगळ्यांकडून कामे करवून घेतो. बाजारात काय चालते, पैसे कसे उभे करायचे, आपल्या क्षेत्रातील उत्तम कलाकारांना (यात कथा-पटकथा- संवादकार आलेच) एकत्र आणणे हे त्याचे कौशल्य असते. बजेट हे नेहमी पटकथेवर अवलंबून असते. ऐतिहासिक आणि युद्धकथांना प्रचंड खर्च येतो. दिग्दर्शकाला हा सगळा विचार करून हिशेबी आर्थिक धोका पत्करावा लागतो. १०० कोटी, २००-५०० कोटींच्या ‘क्लब’मध्ये सहजासहजी प्रवेश नसतो. मराठीच्या भाग्यात तर तेवढे यश दुर्मीळच!

पटकथाकार म्हणून एकदा तुमचे नाव गाजले, की नवीन कामे धावतच येतात. ‘मला काही तरी चांगलं, वेगळं सांगायचं आहे,’ या पोटातिडकीने लेखन झाले पाहिजे. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन हवेच. पैशापेक्षा आपल्या कामामुळे मानसिक समाधान मिळाले पाहिले. पैसा आपोआप मागाहून येतो. ‘पटकथालेखन या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. आपण त्याची फक्त तोंडओळख करून घेतली. 

आपल्याकडे खरोखर काही सांगण्यासारखे असेल, तर कागद आणि पेन उचला - विनाविलंब कामाला लागा. चांगल्या कथा-पटकथेची निर्माता/दिग्दर्शक वाट पाहत आहेत. 

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search