Next
वारकऱ्यांच्या क्षुधाशांतीसाठी दोन फूट व्यासाच्या चपात्या
BOI
Sunday, July 22, 2018 | 01:12 PM
15 0 0
Share this storyपंढरपूर :
दिंडीतील वारकऱ्यांची भोजनव्यवस्था करणे, हे खरे तर दिंडीचालकांपुढे मोठे आव्हानच असते; पण ते तसे लीलया पार पडत असते. नांदेड जिल्ह्यातून आलेल्या एका दिंडीत भल्यामोठ्या चपात्या बनवून वारकऱ्यांची भूक भागवली जात आहे. त्यामुळे कष्ट आणि वेळेची बचत होतेच आहे; शिवाय सुमारे दोन फूट व्यासाची असलेली ही एक चपाती तब्बल चार वारकऱ्यांची भूक भागवते. ही एक चपाती बनविण्यासाठी किमान अर्धा किलो कणीक लागते.  अशोक महाराज पुयड यांची दिंडी रविवारी, २२ जुलै रोजी पंढरपुरात दाखल झाली. त्यात दुपारच्या भोजनाची तयारी सुरू असताना अशा भल्यामोठ्या आकाराच्या चपात्या बनवल्या जात होत्या. पुयड त्यांच्या दिंडीत साधारण साडेचारशे लोक आहेत. इतक्या लोकांच्या भोजनासाठी लागणारे कष्ट व वेळ वाचवण्यासाठी मोठ्या चपात्या केल्या जातात. या चपात्या भाजण्यासाठी आचारीकाम करणाऱ्या मंडळींनी दोन फूट बाय अडीच फूट आकाराचा खास लोखंडी तवा बनवून घेतला आहे. या तव्यावर साधारण अर्धा ते पाऊण किलो वजनाच्या कणकेपासून सुमारे दोन फुट व्यासाच्या चपात्या भाजल्या जातात. ही जबाबदारी उमाबाई येमेवार, सत्यभामा कुंपणवार आणि परागबाई कोंडावार या तिघी जणी समर्थपणे पार पाडत आहेत. तिंबलेल्या कणकीपासून एकीने गोळे तयार करायचे, दुसरीने तो गोळा लाटून द्यायचा, तर तिसरीने ही चपाती तव्यावर भाजायची अशी कामांची विभागणी आहे. या चपात्या लाटण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचे लाटणेही बनवले आहे. त्यामुळे ही चपाती अवघ्या काही मिनिटांत तयार होते. ही चपाती जाडजूड असली, तरी तिची चव मात्र अप्रतिम असल्याचे वारकरी सांगतात. ही एक चपाती साधारण चार माणसांची भूक भागवत असल्याचे आचारी प्रल्हाद कोंडवार यांनी सांगितले. ‘आमच्याकडील लोक भात खात नाहीत. त्यामुळे ही चपाती आमच्या चार माणसांची, तर तुमच्याकडील सहा माणसांची भूक भागवते,’ असे त्यांनी सांगितले. 

(या चपात्या किती मोठ्या आहेत, याची कल्पना येण्यासाठी सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
पोपट भोसले, रोपळे बुद्रूक About 214 Days ago
एका चपातीमध्ये चार वारकरी जेवतात म्हणजे कमालच म्हणली पाहिजे . बाईट्स ऑफ इंडियाने ही भलीमोठी चपाती जगाला दाखवली त्याबद्दल टीमचे धन्यवाद !
0
0

Select Language
Share Link