Next
प्रवासाचे योग...!
BOI
Sunday, July 28, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

दार्जिलिंगमधून दिसणारा कांचनगंगा पर्वत

पुस्तकी ज्ञानापेक्षा भटकंती आपल्याला खूप शिकवून जाते; पण प्रवासाचेसुद्धा योग असावे लागतात. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत त्यांच्या आयुष्यातील प्रवासाच्या योगांबद्दल...
...........
‘चातुर्य येण्यासाठी माणसाने भरपूर प्रवास करावा,’ असं ‘केल्याने देशाटन’ या काव्यात सांगितलं आहे. यातील ‘चातुर्य’ या शब्दात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. गावोगावचा (देशांचा) निसर्ग, लोकसंग्रह, चालीरीती आणि स्वभाववैशिष्ट्यं, अनेक विषयांचं ज्ञान इत्यादी इत्यादी. खरोखर, पुस्तकी ज्ञानापेक्षा भटकंती आपल्याला खूप शिकवून जाते. स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधींनी देश जाणून घेण्यासाठी संपूर्ण भारताचा प्रवास केला. देहू-आळंदी ते पंढरपूर ही वारी हजारो वारकरी शेकडो वर्षं करत आले आहेत. त्यात तर किती शिक्षण मिळतं! ऊन-पाऊस अंगावर झेलणं, स्वत:च्या देहाचा विसर, खाण्या-पिण्यावर नियंत्रण, नामगजरातली तल्लीनता आणि मनोमन एकाग्रता - एक ना अनेक संयमाचे, अध्यात्माचे धडे. हातात भिक्षापात्र घेऊन जागोजागी हिंडणाऱ्या निःस्वार्थी, प्रामाणिक महंताला अन्नवस्त्राची कधीच कमतरता पडत नाही, असं समर्थ रामदास म्हणतात. लोक त्यांची समर्थपणे काळजी वाहतात.

हे झालं प्रवासाचं माहात्म्य! आमच्या म्हणजे आमच्या पिढीच्या लहानपणी आजोळ, मामा-मावशीच्या घरी जाणं हा नित्यक्रम होता. बदलीच्या सरकारी नोकऱ्या असणारे मामा-काका असल्यास दर वर्षी नवनवीन गावांना जाऊन आपल्या राज्याची चांगली ओळख होत असे. त्या निमित्तानं मी तर जवळजवळ सर्व जिल्हा फिरलो. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, बेताची असली, तरी पिठलं-भाकरी-भात खाऊन फार आनंदात काळ जायचा. यात्रा, देवदर्शनांची गंमत आणखी वेगळी असायची. नवी पिढी त्या प्रेमाला, आनंदाला मुकत आहे. आज सर्वांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारली असली तरीही! कालमहिमा! निरनिराळ्या गटांची, मंडळांची संमेलनं बाहेरगावी भरवून ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न मात्र होताना दिसतो.

श्री साईबाबा समाधी

माझे आई आणि वडील, दोघंही श्री अक्कलकोट स्वामींचे भक्त. त्यामुळे जन्म झाल्यानंतर काही महिन्यांपासून आजतागायत जवळजवळ दर वर्षी अक्कलकोटला जाणं चालू आहे. त्या खालोखाल शिर्डी आणि आळंदी, आळंदीला तर यात्रेच्या काळातही दर्शनासाठी किलोमीटर्सची रांग असताना, वशिल्यानं मागून घुसून, माउलींच्या पादुकांवर डोकं ठेवलेलं आहे. एकदा केदारनाथ, दोनदा बद्रिनाथ, पाच-सहा वेळा हृषीकेश-हरिद्वार, अलाहाबाद-वाराणसी अनेकदा - अगदी कुंभमेळ्याच्या काळातही जाऊन आलो. अष्टविनायक, द्वादश ज्योतिर्लिंग आणि देशभरातल्या अनेक तीर्थयात्रा झाल्या. त्या देव-देवतांच्या आशीर्वादानं अडीअडचणी-संकटांमधूनही जीवन आनंदात आणि सुरळीतपणे सुरू आहे. सद्गुरूंकडेही असाच अचानक जाऊन पोचलो. त्यांच्या अनुग्रहाबरोबरच त्यानंतर लेखनातही विशेष शक्ती प्राप्त झाली, असा मला विश्वास आहे.

प्रवासाचा योग असावा लागतो, हे मात्र नक्की. काही जण पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे - माझ्यासारखे - फिरत असतात, तर काहींना प्रवास म्हटलं की अंगावर काटा येतो. बस-रेल्वेची धास्ती, चोरीमारी होईल का, राहण्याची सोय कशी जमेल, गर्दीत अडकून पडू का, असे अनेक संशय त्यांच्या मनात काहूर घालत असतात. समजा, आरक्षण केलंच तर कुठल्याही क्षुल्लक कारणानं ते रद्द कसं करता येईल याच्या विवंचनेत ते असतात. अशा माझ्या एका मित्राबद्दल मी म्हणतो, की तो आधी तिकीट रद्द करण्याचा फॉर्म भरतो आणि मग आरक्षणाचा!

केदारनाथ मंदिर

आता हा अनुभव बघा. माझा एक मित्र त्याच्या एका नाटककार मित्राबरोबर पुण्यात डेक्कनवरील ‘गुड लक’ हॉटेलमध्ये बसला होता. योगायोगानं मीही त्या वेळी हजर होतो. दुसरा मित्र पहिल्याला म्हणाला, ‘मी उद्या शिर्डीला गाडीनं चाललोय. येतोस का?’ पहिल्याला वेळ नव्हता. त्यानं मला विचारलं, ‘तुला जायचंय का?’ मी दोन्ही पायांवर तयार! विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी दसरा होता. शिर्डीला उत्सवासाठी लाखो जण जातात. पहाटे साडेपाचला आम्ही गाडीनं निघालो, दहा वाजता पोहोचलो. नुसता मंदिरात प्रवेश मिळाला असं नाही, तर पूजेतला पाच फुटी चांदीचा दंड हातात घेऊन साईबाबांच्या मूर्तीजवळ उभं राहायला मिळालं. किती भाग्य! प्रवास, चहापाणी, जेवण हे सगळं त्या नव्या मित्रातर्फे. असे माझे कितीतरी दूरदूरचे प्रवास अनपेक्षितपणे झालेले आहेत. (दर वेळी मोफत नव्हे!)

काही महिलांना जशी अनेक जणांना चांगलंचुंगलं खाऊ घालण्याची हौस असते, तसंच काही जणांना - उदाहरणार्थ मी - आपल्याबरोबर खूप लोकांना घेऊन नवनवीन ठिकाणं दाखवावीत अशी इच्छा असते. मी मित्रांच्या मदतीनं १५ ते २० जणांना घेऊन अनेक सहली आयोजित केल्या आहेत. आरक्षणासह सर्व गोष्टी स्वत: करायच्या, खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टी सोबत घेऊन मुक्कामासाठी सवलतीच्या जागा समक्ष बघून ठरवायच्या. थोडक्यात काय, तर शक्य तितक्या कमी खर्चात प्रवास करायचा, हे माझं धोरण असतं. अशा सहलीचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला खूप कसरत करावी लागते. सगळ्यांना सांभाळून नेणं, प्रत्येकाची आवडनिवड आणि राग- लोभ बघणं, कितीही चांगलं नियोजन केलं तरी शिव्या खाण्याची तयारी असणं (हे महत्त्वाचं) आणि हिशोब काटेकोरपणे ठेवणं, अशा अनेक गोष्टी. तरीही लोकांना प्रवास घडवण्याची ‘खोड’ काही सुटत नाही.

नेपाळचे पशुपतिनाथ शिवलिंग

आमच्या दोन सहली विशेष चांगल्या ठरल्या. एक म्हणजे ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, दार्जिलिंग, नेपाळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशी १७ जणांची १७ दिवसांची सफर. त्यात वय वर्षे पाच ते ६५ वर्षांच्या आजी असं मंडळ होतं. सन १९९२ची गोष्ट आहे. (मी तेव्हा ४६ वर्षांचा होतो). बायको आणि आमच्या दोन मुलीसुद्धा (वय १२ आणि १० वर्षं) सोबत होत्या. बायको बरोबर असणे म्हणजे कुरबुरी आल्याच! ‘एवढ्या लोकांना बरोबर घेऊन मिरवण्याची काय गरज आहे!’ हे प्रमुख पालुपद. खाण्यापिण्याच्या बाबतही गमती घडतात. सामायिक खर्च असेल, म्हणजे एकानेच सर्व खर्च करायचा आणि प्रत्येकाकडून काही रक्कम घ्यायची, तर हिशेब ठेवणं कठीण जातं. कुणी डोसा खाल्ला, कुणी इडली, तर एकानं पुरीभाजी; तसंच चहा, कॉफी, दूध, थंड पेय. आता प्रत्येकाचा स्वतंत्र हिशेब ठेवणं शक्य नसतं. सरासरी काढावीच लागते. मग कटकटी होतात; पण त्यातून मार्ग काढावा लागतो. आम्ही सोबत लाडू-चिवडा, कांदे, टोमॅटो, काकडी, चहा-दूध पावडर विपुल प्रमाणात ठेवल्यामुळे नाश्त्याचा खर्च खूप वाचला. रेल्वेत पाणी गरम करून घेऊन चहा-कॉफीसुद्धा पीत होतो. भरपूर फिरलो, खूप फोटो काढले, कुठेही अनावश्यक काटकसर केली नाही. त्यामुळे सगळे जण खूष होते. पुन्हा तशीच सहल काढण्याचा निश्चय केला; पण तो प्रत्यक्षात आला नाही. प्रवासाचेसुद्धा योग असावे लागतात.

अशीच दुसरी सहल २००० साली घडली. आचार्य किशोरजी व्यास यांचा बद्रिनाथला ‘भागवत सप्ताह’ होता. निरनिराळ्या प्रकृतीच्या १७-१८ जणांना घेऊन आम्ही तो प्रवास आनंदात पार पाडला. आग्रा, मथुरा-वृंदावन, दिल्ली, हृषीकेश, हरिद्वार आणि बद्रिनाथमुळे हिमालयदर्शन घडलं. बद्रिनाथला राहण्याची व्यवस्था आम्ही केली. बाकी चहापाणी, जेवणखाण संयोजकांनी सांभाळलं होतं. कथा-श्रवणाला आम्ही नियमितपणे हजर राहत होतो. (जेवणाची सोय त्यासाठीच केलेली होती.) एकूण सहल खूप संस्मरणीय ठरली. पु. ल. देशपांडे जेव्हा गेले (१२ जून २०००) त्या दिवशी आम्ही वृंदावनात होतो. खूप वाईट वाटलं. सहलीचे सगळे तपशील इथे देणं शक्य नाही; पण सगळा प्रवास सुखाचा ठरला.

अशा लहान-मोठ्या सहली खूप झाल्या. २०१६मध्ये महिनाभराचा युरोप दौराही सहजगत्या झाला. प्रवासाची आवड असल्यास वयाचा अडसर येत नाही. अजूनही फिरण्याची ‘ओढ’ संपलेली नाही. तसे कार्यक्रम आखले जातात. अमुक एका दिवशी कोणाचं ‘दानापानी’ कुठे असेल, ते सांगताच येत नाही. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आपण हजर असतोच, असा माझा अनुभव आहे. भारतभर फिरून झालं, तरी अद्याप बरीच ठिकाणं राहिलेली आहेत. तिथून आज ना उद्या बोलावणं येईलच. यंदा, वारीच्या दिवसांत ऐन आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी अचानक पंढरपूरची यात्रा झाली.

इंग्लंड-अमेरिका, चीन-जपान अजून झालेलं नाही. त्यासाठी अट्टाहास करायचा नाही. सहज जमलं तर जायचं. चंद्र-मंगळावर जाणं काही शक्य नाही; पण पृथ्वीतलावर कुठल्याही नव्या जागी जाण्याचा योग कधीही येऊ शकतो. आमच्या बॅगा नेहमी तयारच असतात - मग अगदी कुठेही जायचं असो!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search