
सांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि मणेराजुरी भागात द्राक्ष उत्पादन सुरू झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पसरली होती. थंडी आणि दाट धुक्याचा द्राक्षोत्पादनावर विपरीत परिणाम झाला. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर मात करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेण्यात सातत्य राखले आहे. सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव आणि करकंब आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव व मणेराजुरी हा भाग द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी द्राक्षांचे बेदाणे करतात. सांगली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल आता थेट द्राक्षोत्पादनाकडे आहे. बेदाण्यापेक्षा द्राक्षातच जास्त उत्पन्न मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
तासगाव भागातील शेतकऱ्यांचा माल स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. मणेराजुरी भागातील शेतकरी दुबईसारख्या देशात आपला माल निर्यात करतात. शेतकरी आपला माल थेट निर्यात करत नसले, तरी निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला माल देऊन नफा मिळवत आहेत.
यंदा द्राक्षबागा जगवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पैसा पाण्यावरच जास्त खर्च झाला आहे. तरीही दर्जेदार उत्पादन घेतल्यामुळे त्यांना जास्त दर मिळत आहे. सध्याचा दर गत वर्षीपेक्षा कमीच आहे. कडाक्याची थंडी हे याचे महत्त्वाचे कारण. थंडीमध्ये द्राक्षांना मागणी कमी असल्यामुळे व्यापारी माल खरेदी करत नव्हते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी थंडी कमी होण्याची वाट पाहत होते.

गेल्या दोन दिवसांत अचानक हवामानात बदल होऊन थंडी कमी झाली. त्यामुळे द्राक्षांना मागणी वाढली आहे. त्यामुळे द्राक्षांना आता चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा मणेराजुरीतील काही शेतकऱ्यांनी ‘बाइट्स आफ इंडिया’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
वेलअॅग्रो कंपनीचे टेक्निकल व सेल्स मॅनेजर अमोल मुंढे म्हणाले, ‘थंडी व पाण्याचा वेलींवर ताण न येण्यासाठी या वेळी बहुतांश द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काही औषधे वापरली.’ त्यामुळे उत्पादन प्रतिकूल परिस्थितीतही चांगले आले, असे रावसाहेब पवार या शेतकऱ्याने नमूद केले.
‘थंडी कमी झाल्यामुळे द्राक्षांना मागणी वाढल्यामुळेच दरातही वाढ झाली,’ असे वेळावी (जि. सांगली) येथील शेतकरी अमर पाटील यांनी सांगितले. एकूणच थंडी कमी झाल्यामुळे द्राक्ष पट्ट्यातील शेतकरी आनंद व्यक्त करू लागले आहेत.