Next
चिं. त्र्यं. खानोलकर, ह. ना. आपटे
BOI
Thursday, March 08, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘इथे भोळ्या कळ्यांनाही, आसवांचा येतो वास – कसे? कसे हसायचे?’ असं काळजाला थेट भिडणारं काव्य करणारे कवी आरती प्रभू ऊर्फ लेखक आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खानोलकर आणि आपल्या प्रचंड साहित्यनिर्मितीने ‘हरिभाऊयुग’ म्हणूनच आपला कालखंड गाजवणारे हरी नारायण आपटे यांचा आठ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...............
चिंतामण त्र्यंबक खानोलकर

आठ मार्च १९३० रोजी वेंगुर्ल्यात जन्मलेले चिंतामण त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू हे अत्यंत प्रतिभासंपन्न कवी, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्त्व! अस्सल कोकणी बाजाच्या कथा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं! विश्वाच्या अथांग पसाऱ्यात माणसाचं अस्तित्व ते काय, माणूस आणि निसर्ग, माणसांमध्ये दडलेले विविध विकार आणि वृत्ति यांवर त्यांनी लेखन केलं. त्यांच्या कवितांमध्ये आणि कथांमध्ये वाचकांना भुरळ पाडणाऱ्या विलक्षण प्रतिमा असत. 

शाळेच्या मासिकात कविता देताना त्यांनी ‘पुष्पकुमार’ हे टोपण नाव घेतलं होतं; पण पुढे मात्र आरती प्रभू या नावानेच त्यांनी कविता लिहिल्या. या नावाच्या उपपत्तीविषयी त्यांना कुणी छेडलं तर ते ‘प्राणिनाम् आर्ति नाशनम्’ या ओळीवरून, तर कधी आपल्या रघुनाथ या घरगुती नावाचं आद्याक्षर ‘आर’ आणि त्र्यंबकमधलं ‘टी’ आणि ‘प्रभू’ हे अर्धं आडनाव यावरून ‘आर. टी. प्रभू’ आणि त्यावरून ‘आरती प्रभू’ सुचलं असं सांगत!

साठोत्तरी लेखकांच्या नव्या पिढीतले खानोलकर आपलं एक वेगळेपण घेऊन आले होते. ६० आणि ७०च्या दशकात त्यांच्या ‘रात्र काळी घागर काळी’ आणि ‘अजगर’ यांसारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचं नाव साहित्यविश्वात तळपू लागलं. त्याच सुमारास ‘एक शून्य बाजीराव’, ‘सागेसोयरे’ आणि ‘कालाय तस्मै नमः’ यांसारखी नाटकं लिहून त्यांनी नाटककार म्हणूनही लौकिक मिळवला. ‘कशासाठी उतरावे तंबू ठोकून? कोण मेले कुणासाठी रक्त ओकून? जगतात येथे कुणी मनांत कुजून! तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ असा आर्त सवाल आपल्या काव्यातून करणाऱ्या खानोलकरांनी लिहिलेल्या एकाहून एक सरस आणि विलक्षण कविता त्यांचं शब्दांवरचं निर्विवाद प्रभुत्व दाखवून देतात.

आपल्याच कवितेविषयी त्यांनी लिहिलेल्या या ओळी खूप काही सांगून जाणाऱ्या –

‘या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो – कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?
माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश .
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत’..

दिवेलागण, जोगवा, गोपाळगाणी, नक्षत्रांचें देणें, अजगर, अवध्य, एक लघुकादंबरी आणि काही कविता, एक शून्य बाजीराव, गणुराया आणि चानी, कोंडुरा, त्रिशंकू, दुष्टचक्र, राखी पाखरू, सनई, वारा वाजे रुणझुणा, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२६ एप्रिल १९७६ रोजी वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

(चिं. त्र्यं खानोलकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........................

हरी नारायण आपटे

आठ मार्च १८६४ रोजी खानदेशमध्ये जन्मलेले ह. ना. आपटे हे कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून प्रसिद्ध होते. करमणूक, ज्ञानप्रकाश यांसारख्या मासिकांचं त्यांनी संपादन केलं होतं. त्यांना अर्वाचीन मराठी कादंबरीचं जनक मानण्यात येतं. ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही त्यांची कादंबरी मराठी साहित्यातली एक अजरामर साहित्यकृती मानली जाते. 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडापर्यंत त्यांनी तब्बल २३ कादंबऱ्या लिहिल्या. दोन स्वतंत्र नाटकं आणि तीन रूपांतरित नाटकं लिहिली. ‘शिष्यजनविलाप’ ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. त्यामुळे तो कालखंड ‘हरिभाऊयुग’ म्हणूनच ओळखला जातो. 

उषःकाल, चंद्रगुप्त, म्हैसूरचा वाघ, रूपनगरची राजकन्या, गड आला पण सिंह गेला, केवळ स्वराज्यासाठी, चाणाक्षपणाचा कळस, जग हें असें आहे..., तारा, धूर्त विलसत, भयंकर दिव्य, मधली स्थिति (आजकालच्या गोष्टी), माध्यान्ह, मायेचा बाजार, मी, विदग्धवाङ्‌मय, संत सखू, सती पिंगळा, सूर्योदय, स्फुट गोष्टी (भाग १ ते ४), अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

तीन मार्च १९१९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

 (ह. ना. आपटे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link