Next
नालासोपारा, विरार आणि परिसर...
BOI
Saturday, August 17, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका क्षेत्रातील दक्षिणेकडील वसई व आसपासचा भाग पाहिला. आजच्या भागात पाहू या उत्तरेकडील वैतरणा नदीपर्यंतचा नालासोपारा व विरार भाग. 
.........
पालघर जिल्ह्यातील सोपारा खाडी, पश्चिमेकडील तुंगारेश्वर पर्वत व पश्चिमेकडील अरबी समुद्र यामुळे हा भाग नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. या भागात पोर्तुगीज काळातील चर्च, तसेच पुरातन मंदिरे आहेत. मौर्य काळापासून हा भाग जगात परिचित होता. 

नालासोपारा : ‘नाला’ आणि ‘सोपारा’ दोन वेगवेगळी खेडी होती. रेल्वेलाइनच्या पूर्व बाजूला ‘नाला’ आहे आणि पश्चिमेकडे ‘सोपारा’ आहे. त्यामुळे नालासोपारा हे जोडनाव या भागाला मिळाले. सोपारा हे पौराणिक, ऐतिहासिक, संदर्भ असलेले पुरातन शहर आहे. याचा सर्वांत प्राचीन संदर्भ महाभारतात शुपरक म्हणून आढळतो. इ. स. पूर्व ३०० ते ४०० वर्षांपूर्वीपासून सोपाराचा उल्लेख दिसून येतो. टॉलेमीने या शहराचा उल्लेख सौपारा म्हणून केला. त्याच्या काळात हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. येथून मेसोपोटेमिया, अरेबिया, आफ्रिका, इजिप्त आणि रोम यांच्याबरोबर व्यापार चालत असे. जैन लेखकांच्या म्हणण्यानुसार श्रीपाल या एका पौराणिक राजाने सोपर्काच्या राजा महासेनाची मुलगी टिळकसुंदरीशी लग्न केले. तसेच सोपाराचा जैन तीर्थ म्हणूनही उल्लेख आहे. बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, की श्रीलंकेचा पहिला राजा विजया हा सुपाराका (सोपारा) येथून श्रीलंकेला गेला. 

सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप

लेबेनॉनचा राजा हिराम याने राजा सॉलोमन याला येथून आणलेली सुगंधी वनस्पती, तसेच मौल्यवान दगड भेट दिले होते. महाभारतातील कथेप्रमाणे श्री परशुराम यांचेही येथे वास्तव्य होते. सोपाराजवळील मेड्स गावाजवळ सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप आहे. हा स्तूप भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित केला आहे. येथे स्तुपाच्या मध्यभागी आठव्या शतकातील मैत्रेय व बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा मिळाल्या. तसेच तांबे, चांदी, सोने, दगड, क्रिस्टल आणि गौतमीपुत्र सातकर्णीची (सातवाहन) चांदीची नाणी सापडली. रामकुंडाजवळील जुन्या मुस्लिम कब्रस्तानमध्ये काही अवशेष सापडले. ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. 

स्वर्गीय डॉ. भगवानलाल इंद्र यांनी मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीला बौद्ध स्तूपाव्यतिरिक्त सोपारा येथील अनेक हिंदू मंदिरांच्या अवशेषांविषयी माहिती दिली होती. अशोकाच्या साम्राज्याच्या सीमांकनासाठी सोपाराचे शिलालेखही खूप उपयुक्त ठरले आहेत. सोपारा येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आढळले आहेत. अशोकाच्या साम्राज्याच्या पश्चिम सीमेवर समुद्र होता हे सोपारा शिलालेखांवरून सिद्ध झाले आहे. नालासोपारा हे गाव सांस्कृतिकदृष्ट्याही प्रसिद्ध आहे. सुरेश मुकुंद आणि पार्थ व्यास यांच्या किंग्ज ग्रुप इंडिया नृत्यमंडळांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे अत्यंत सामान्य घरातील मुलांचा यात सहभाग होता. 

सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायक मंदिर :
विरारमध्ये (पश्चिम) सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या देखण्या मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. 

चक्रेश्वर महादेव मंदिर

चक्रेश्वर महादेव मंदिर :
हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर नालासोपारा पश्चिमेतील चक्रेश्वर तलावाच्या एका कोपऱ्यात आहे. बांधकामाचा कालखंड उपलब्ध नाही. मंदिरावर आक्रमणकर्त्यांनी आक्रमण केले, त्या वेळी बऱ्याच मूर्ती जवळच्या चक्रेश्वराच्या तलावात टाकण्यात आल्या. त्यानंतर त्यापैकी काही मूर्ती सापडल्या व या मंदिरात स्थापन करण्यात आल्या. सध्याचे मंदिर नंतर बांधण्यात आले. 

आगाशी कोट : येथे आता कोणताही कोट अथवा किल्ल्याचे अवशेष अस्तित्वात नाहीत. परंतु महिकावती बखरीमध्ये बिंब राजाच्या कारकिर्दीत आगाशी येथे कोट असल्याचे उल्लेख आढळतात. आता असलेले भवानीशंकर मंदिर आणि त्याच्या शेजारील तलाव याच परिसरात हा कोट असावा असे काहींचे म्हणणे आहे. ऐतिहासिक नोंदीप्रमाणे वसई किल्ल्यावरील चिमाजीअप्पांच्या १६ मे १७३९च्या विजयानंतर सन १७३९ ते १७५० या कालखंडात श्री भवानीशंकर मंदिराची निर्मिती करण्यात आली. कोट अथवा किल्ला म्हणून पाहण्यासारखे येथे काहीच नसले, तरी भवानीशंकर मंदिरावरील शिल्पे, या तलावातील शिल्पे व नक्षीकाम आजही गतवैभवाची साक्ष देत आहेत. येथील शिल्पांमधील, खासकरून तेथील मंदिरावर असणारे कामधेनु आणि कल्पवृक्ष हे शिल्प सहजासहजी कुठे आढळत नाही. किल्ला अस्तित्वात नसला तरी एका सुंदर ऐतिहासिक स्थानाला भेट देण्याचा आनंद वेगळाच आहे. 

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे पूर्वज शंकराजी फडकेपंत व इतर मुत्सद्दी शिलेदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समाध्या व स्मृतिस्थळे दुर्लक्षित झाली होती. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राऊत व त्यांचे सहकारी यांनी श्रमदानाने साफसफाई करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. 

सेंट जेम्स चर्च, आगाशी

सेंट जेम्स चर्च, आगाशी :
हे ऐतिहासिक चर्च विरार-अर्नाळा रस्त्यावर असून, ते १५५८मध्ये बांधण्यात आले. पोर्तुगीज हे सर्व युरोपीयन देशांमधील सर्वोत्तम दर्यावर्दी मानले जातात. ते जिथे-जिथे गेले तेथे त्यांनी समुद्राजवळ घरे बांधली. आगाशी हे त्या काळचे लहानसे बंदराचे गाव होते. आगाशीजवळ असलेल्या जंगलांमध्ये पोर्तुगीजांना जहाजबांधणी आणि अन्य बांधकामांसाठी आवश्यक असणारे लाकूडही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे आगाशी हे पोर्तुगीजांचे कायम वास्तव्याचे ठिकाण बनले. सेंट जेम्स चर्च सुरुवातीला दगड आणि विटांनी बांधण्यात आले होते. सन १७३९मध्ये वसई मोहिमेच्या वेळी त्याचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला. परंतु मराठ्यांनी येथील पाद्रींना या भागात धार्मिक उत्सव करण्यास परवानगी दिली होती. सन १७६०मध्ये चर्च पुन्हा बांधण्यात आले आणि सन १९००मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.
 
उमराळे येथील सेंट जोसेफ चर्चउमराळे चर्च : सेंट जोसेफ चर्च असे या चर्चचे नाव आहे. १५७३पासून येथे चर्च होते असे म्हणतात. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. तेथे नव्याने भव्य चर्च उभारण्यात आले आहे. उमराळे गाव सोपाराच्या पश्चिमेला आहे.

गोंझालो गार्सिया चर्च : इंद्राणी तीर्थाजवळ गस गावामध्ये हे चर्च आहे. गोंझालो गार्सिया यांचे वडील पोर्तुगीज होते, तर आई वसईची, भारतीय वंशाची होती. त्यांचा जन्म १५५७मध्ये झाला, तर मृत्यू जपानमध्ये १५९७ साली, वयाच्या चाळिसाव्या वर्षी झाला. त्यांच्या समरणार्थ उभारलेले हे चर्च १९५८मध्ये बांधण्यास सुरुवात झाली व १९६२मध्ये ते पूर्ण झाले. 

सेंट पीटर्स चर्च : १९१९मध्ये फादर इस्माइल दा कोस्टां यांनी अर्नाळा किनाऱ्याजवळ अगोदर एक छोटे प्रार्थनास्थळ बांधले उभारले. नंतर स्थानिकांच्या साह्याने त्यांनी सेंट पीटर्स चर्च बांधले. जवळच चर्च ऑफ होली स्पिरिट (नंदाखल) आहे. 

कळंब बीच

सागरकिनारे :
नालासोपाराच्या पश्चिमेला निर्मल गावाजवळ कळंब बीच, राजोडी बीच, तसेच तुलसी, अर्नाळा, नवापूर, बीच असे सुंदर, स्वच्छ व गर्दी नसलेले शांत सागरकिनारे आहेत. या बीचेसवर जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा होणे गरजेचे आहे. तसेच, वाळूउपश्यामुळे होणाऱ्या हानीकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सागरकिनारे हे पर्यटनाचा मोठा महत्त्वाचा आधार आहेत. 

चिंचोटी धबधबा : वसईजवळच्या तुंगारेश्वर पर्वतावर हा धबधबा आहे. चिंचोटी हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यास योग्य आहे. लोक या ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात भेट देतात. धबधबा पूर्णपणे कार्यरत नसतानाही लोक पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. कुटुंब आणि मित्रांसह सहलीचा आनंद घेण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. 

तुंगारेश्वर अभयारण्य (फोटो : दिनेश वाळके, विकिपीडिया)

तुंगारेश्वर धबधबा व शिवमंदिर :
तुंगारेश्वरचे शिवमंदिर प्राचीन असून, डोंगररांगेत झाडांच्या गर्द हिरवाईत लपून बसलेले आहे. मंदिर नेहमी शिवभक्तांनी गजबजलेले असते. मंदिराभोवती असलेली झाडांची गर्दी पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते. मुख्य रस्त्यावरून तुंगारेश्वर परिसरात प्रवेस करताच धबधब्याच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झालेले असते. शहरातील सिमेंटच्या जंगलातून येथे आल्यावर मनाला नक्कीच शांतता मिळते. चालताना त्रास होईलही; पण हिरवीगार वनश्री, पक्ष्यांचा गुंजारव तुमचा उत्साह वाढवतो. 

तुंगारेश्वर अभयारण्य (फोटो : दिनेश वाळके, विकिपीडिया)

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य :
वसई-विरारच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर २१२७ फूट उंचीवर हे ८५.५ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील अभयारण्य असून, तीन वेगवेगळ्या प्रकारची जंगले येथे आहेत. हा प्रदेश जैवविविधतेने समृद्ध आहे. बिबटे, रानडुक्कर, भुंकणारे हरीण, लंगूर हे प्राणी, तसेच पावशा, सर्पगरुड, महाभृंगराज, श्याम, पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी, हळद्या हे पक्षी येथे पाहायला मिळतात. येथून पेल्हार धरणाचे विहंगम दृश्यही दिसते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे छान ठिकाण आहे. या डोंगरात अनेक जलप्रपात आहेत. सन २००३मध्ये या ठिकाणाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या उत्तरेस आत्मलिंगेश्वर मंदिर आहे. या छोट्या मंदिरासाठी सुरेख पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहे. सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. 

कामनदुर्ग

कामनदुर्ग पायऱ्याकामनदुर्ग : पूर्वीच्या काळी पाश्चिमात्य देशांतून वसईमार्गे कल्याणला उल्हास नदीतून व्यापार चालत असे. त्यामुळे वसई येथून अनेक जहाजांची कल्याणकडे ये-जा होत असे. या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरात टेहळणी करण्यासाठी पोर्तुगीजांनी कामनदुर्गाची निर्मिती केली. वसई-भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या किल्ल्याच्या निर्मितीमागे इतिहास आहे. संभाजी महाराजांनी १६८३मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पोर्तुगीजांनी पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला; पण किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने त्यांनी त्याचा ताबा सोडला होता. त्यानंतर किल्ला ओस पडला. दगडात कोरलेल्या पायऱ्या, भग्नावस्थेतील प्रवेशद्वार व पाण्याचे टाके याखेरीज येथे कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्यावरून या परिसराचे विहंगम दृश्य खूपच मनमोहक दिसते. 

अर्नाळा जलदुर्ग : इ. स. १५१६मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा जलदुर्ग बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. १७३७मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी करवून घेतली. शेवटी १८१७मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लादेखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. विरार या रेल्वे स्टेशनपासून १० किलोमीटरवर अर्नाळा गाव आहे. तेथून अर्नाळा बंदरातून छोट्या होडक्यातून अर्नाळा किल्ल्यावर जाता येते. होड्या सकाळी सहा ते दुपारी साडेबारा व सायंकाळी चार ते सात या वेळेतच उपलब्ध असतात. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. वैतरणा नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडील बेटावर हा किल्ला आहे. त्यामुळे वैतरणा नदीतून जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली. हा या भागातील दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा किल्ला होता. 

अर्नाळा किल्ला

या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे चार हेक्टर असून, तटबंदीमध्ये एकूण दहा गोल बुरूज असून एक चौकोनी आहे. त्यामध्ये खोल्या, तसेच पायऱ्यांचे जिनेही आहेत. यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज, वेताळ बुरुज अशी बुरुजांची नावे असून, गणेश बुरुज हा किल्ल्यातील महत्त्वाचा बुरुज आहे. किल्ल्यापासून स्वतंत्र असा भक्कम हनुमंत बुरुज आहे. 

अर्नाळा किल्ल्यावरील स्वतंत्र बुरुज

किल्ल्याबाहेर एकाकी किंवा नुसता बुरुज बांधण्याची पोर्तुगीजांची पद्धत होती. त्याचा उपयोग एखाद्या छोट्या किल्ल्यासारखा होत असे. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असून, उत्तरेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर फुलांच्या वेलबुट्टीचे अत्यंत सुंदर नक्षीकाम असून, दोन्ही बाजूला सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती व व्याल पशूची प्रतिमा कोरलेली आहे. मूळ किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असला, तरी मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यामुळे मराठा शैलीची छाप त्याच्यावर आहे. येथे असलेल्या शिलालेखावरील ओळी – ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमति आज्ञापिले शंकरा पाश्चात्यासी वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा’ देवनागरी लिपीतील या ओळींतून बाजीराव पेशव्यांनीच किल्ल्याचे बांधकाम करण्याचे आदेश आगाशी या ठिकाणचे सुभेदार शंकराजी केशव फडके यांना दिल्याचे स्पष्ट होते. तसेच या शिलालेखात बाजी तुळाजी या किल्ल्याच्या स्थापत्य विशारदाच्या नावाचा उल्लेख मिळतो. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. 

शनिवारवाड्याचे बांधकाम ज्या माणकोजी पाथरवट याने केले, त्याचाही या किल्ल्याच्या बांधणीत सहभाग असल्याने किल्ल्याची बांधणी काहीशी शनिवारवाड्यासारखी झाली, असे काही अभ्यासकांचे मत आहे. किल्ल्याचे स्थापत्य पूर्णत: मराठा शैलीचे दिसते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच तटावर जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत आणि एक चोरवाट आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणाऱ्या उंचवट्यावरून संपूर्ण किल्ल्याचा आतील भाग नजरेस पडतो. हा उंचवटा हीच किल्ल्याची ढालकाठीची म्हणजेच झेंड्याची जागा आहे. किल्ल्यात व त्याच्या बाहेरही आंबा, ताड, माड व चिंचेची झाडे लावलेली दिसतात. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरून किल्ला फिरताना दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो.

अर्नाळा किल्ल्यावरील अष्टकोनी तळे

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर, श्रीदत्त व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच दगडी पायऱ्या असलेले सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले, तरी तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. या मंदिराजवळच पूर्वेकडील तटात एक छोटे मंदिर असून, त्यात नित्यानंद महाराजांच्या पादुका आहेत. तसेच किल्ल्यात एक दर्गा आणि दोन कबरीही आहेत. किल्ल्यात सदर, वाडे, कोठारे अशा बांधकामांचे अवशेषही ठिकठिकाणी दिसून येतात. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. 

जीवदानी मंदिर, विरार

जीवदानी मंदिर, विरार :
विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी मंदिर आहे. श्री जीवदानी ही विरारची ग्रामदेवता असली, तरी या मंदिराची ख्याती सर्वदूर झाली आहे. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता; मात्र काळाच्या ओघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. त्याच्या काही खुणा अजूनही शिल्लक आहेत. याच किल्ल्यावरील हे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. १९५६मध्ये या मंदिरात देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर प्रसिद्ध झाले. सुमारे १४०० पायऱ्या चालून येथे जावे लागते. भक्तांचे दुःख निवारण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असा काहींचा समज आहे. 

२३ फेब्रुवारी १९५६ रोजी जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली आणि हळूहळू परिसराचे रूप बदलत गेले. भक्तांच्या देणगीतून डोंगराच्या कुशीत सात मजली इमारत बांधली असून, ती बांधण्यास अनेक वर्षे लागली. ही इमारत लांबवरूनच लक्ष वेधून घेते. पाच हजारांहून अधिक भाविक बसू शकतील असा भव्य सभामंडप देवीच्या मूर्तीसमोर बांधला आहे. भक्तांच्या मते हे एक शक्तिपीठच आहे. 

मंदिरात देवीची मनमोहक मूर्ती आहे, मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे, तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. मंदिराच्या गर्भागृहाला लागून श्रीकृष्ण गुहा आहे. शिवाय काळभैरव, महाकाली, बारोंडा मंदिरेही आहेत. तसेच गायगोठा व वाघोबा मंदिरे असून, ती छोट्या गुंफेत आहेत. विशेष करून नवरात्रीत येथे लाखो भाविकांची गर्दी होते. शिवाय चैत्री नवरात्रही साजरे होते. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून भक्त सतत येथे येत असतात. 

कसे जाल नालासोपारा व विरारला?
नालासोपारा व विरार ही पश्चिम रेल्वेमार्गावरील स्टेशन्स आहेत आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ठिकाणे आहे. येथून रेल्वेने कल्याण-दिवा-पनवेलमार्गे कोकणात, तसेच पुणे-बेंगळुरूकडे जाता येते. जवळचा विमानतळ मुंबई. राहण्यासाठी भरपूर हॉटेल्स व रिसॉर्टस् उपलब्ध आहेत. हे ठिकाण अतिपावसाचे दिवस सोडून कधीही जाण्यासारखे आहे. 

(या भागातील माहितीसाठी सोपारा येथील प्राचार्य सोनार यांचे सहकार्य मिळाले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vijaya About 55 Days ago
Good
0
0
K.S. Moholkar About 58 Days ago
मी पालघर येथे चार वर्षे नोकरीनमित्ताने होतो. त्यावेळी वसई विरार डहाणू वाडा या भागामध्ये नेहमी पाणीपुरवठा योजना कामी जात होतो. यामध्ये उल्लेखलेली सर्व ठिकाणे अनेक वेळा गेलेलो आहे. माहिती वाचून ते दिवस आठवले. धन्यवाद.
0
0
Sameer About 58 Days ago
मस्त
0
0

Select Language
Share Link
 
Search