Next
‘स्वमग्न मुलांना करून द्यायला हवी त्यांच्या क्षमतेची ओळख’
BOI
Tuesday, April 04, 2017 | 04:40 PM
15 3 0
Share this story

पुणे : ऑटिझम (स्वमग्नता) हा विकार किंवा रोग नाही; त्यामुळे तो बरा करता येत नाही; पण स्वमग्न मुलांना त्यांच्यातील क्षमतेची ओळख करून दिली, तर ती स्वतःला चांगल्या प्रकारे अभिव्यक्त करू शकतात. सोमवारी, तीन एप्रिलला पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन पाहिल्यावर या गोष्टीची प्रचिती आली. 

दोन एप्रिल रोजी जागतिक स्वमग्नता दिन असतो. पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये त्या दिवसाच्या औचित्याने दर वर्षी या मुलांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात ऑटिस्टिक मुलांच्या कलागुणांचे प्रदर्शन घडते. यंदा हे प्रदर्शन तीन एप्रिलला आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले आणि संचालक सुभाष केसकर यांनी स्वमग्न मुलांबद्दल आणि या सेंटरमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. या केंद्रात सध्या ३५ मुले असून, त्यांच्यासाठी शिक्षक, सहायक वगैरे मिळून २२ जण कार्यरत आहेत.

‘आमच्याकडे असलेल्या प्रत्येक मुलाची एक स्वतंत्र गोष्ट आहे. अशा मुलांना बाकी कशाचीही नाही, तर समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्याकडे लक्ष दिले आणि त्यांच्यासाठी वेळ दिला, तर ती नक्कीच काही तरी करून दाखवू शकतात,’असे साधना गोडबोले यांनी सांगितले.

परदेशात ऑटिस्टिक मुलांसाठी नोकरीत आरक्षणही असते, अशी माहिती सुभाष केसकर यांनी दिली. ‘या मुलांना नेमून दिलेले, तसेच तेच तेच काम परत करण्याचा कंटाळा येत नाही. त्यांची सर्व ज्ञानेंद्रिये कार्यरत असतात; मात्र त्यांचा समतोल नसतो. त्यामुळे अनेक अडचणी उद्भवतात; मात्र त्यांचे वेळापत्रक बसवले तर त्या त्या वेळेत बरोबर ती कामे केली जातात. परदेशात हॉटेलमध्ये रूम दाखवणारे बेल बॉय किंवा अशा काही ‘रूटीन ठरलेल्या’ कामांसाठी ऑटिस्टिक मुलांकरिता आरक्षण ठेवलेले असते. त्यामुळे ही मुले स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात,’ असे केसकर यांनी सांगितले. अशा प्रकारे सामाजिक गरजेच्या आधारे आरक्षण असण्याची गरज आपल्या देशातही आहे; मात्र त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

पद्मजा गोडबोले यांनी १७ वर्षांपूर्वी प्रसन्न ऑटिझम सेंटरची स्थापना केली. कोणत्याही सरकारी मदतीविना आजही हे केंद्र चांगल्या प्रकारे सुरू आहे. स्वमग्न मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रयत्नांना समाजाने हातभार लावण्याची गरज आहे. केवळ एक दिवस साजरा करून परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. 

प्रदर्शनात काय काय?
  • ‘चिमण्यांना वाचवा’ असा संदेश देणारे एक छोटे झाड तेथे होते. त्याला कागदापासून बनवलेली पाने-फुले लावण्यात होती आणि त्यावर चिमणीचे घरटेही होते.
  • पेन्सिलीला टोक काढल्यानंतर येणाऱ्या लाकडाच्या नक्षीदार ‘स्लाइस’पासून बनवलेली कलाकृती
  • बटाटे आणि हाताचे अंगठे रंगांत बुडवून त्याचे ठसे उमटवून तयार केलेली छान चित्रे
  • सुतळ, डाळी, कागदाचे कपटे, पुठ्ठे, रंग आदींचा कल्पक, कलात्मक वापर करून साकारलेली चित्रे, ढोल, टोप्या, कॅलेंडर, इत्यादी
  • ऑटिस्टिक मुलांना कसे समजून घेतले पाहिजे, त्यांना कसे शिकवले पाहिजे याची माहिती देणारे तक्ते
  • न्यूटन, आइन्स्टाइन, व्हॅन गॉग यांसारखी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नाव कमावलेली मंडळीही ऑटिस्टिक होती, याची माहिती देणारा चार्ट
 
15 3 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sagar bairagi About 21 Days ago
My chaild is autistic please provide me some information
0
0
vasantbv55 vartak About
Very nice information
0
0
Bharati Gopichand patil About
Grate work
0
0

Select Language
Share Link