Next
कॉफिन
BOI
Monday, November 26, 2018 | 01:02 PM
15 0 0
Share this article:

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या नवव्या दिवशी (२५ नोव्हेंबर २०१८) ‘कॉफिन’ हे नाटक सादर झालं. चैतन्य सरदेशपांडे यांनी लिहिलेलं हे नाटक रत्नागिरीच्या ‘शिवोली सेवा मंडळ’ या संस्थेनं सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
.........
सामान्य कुटुंबातल्या एका गृहिणीच्या पोटी एक लाकडी पेटी जन्माला येते. आई बाळंतपणातच मरून जाते. तिचा नवरा नि त्याची म्हातारी आई त्या लाकडी पेटीला बाळ म्हणून स्वीकारतात. म्हातारीला शेजारच्या आंटीनं थोडं इंग्रजी शिकवायला सुरुवात केलेली... ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’ वगैरे गाणी ती स्वतःशीच म्हणत असते. नातवाचं नाव ती इंग्रजीत ठेवते - कॉफिन! आपल्या नातवाला भरपूर शिकवून परदेशी पाठवायचं, हे तिच्या नवऱ्याचं स्वप्न असतं. ते पुरं झालं पाहिजे, यासाठी ती स्वतः आणि मुलगा मिळून प्रयत्न करायचे, असं ठरवते.

एका बाईनं चक्क लाकडी पेटीला जन्म दिला, ही बातमी पसरायला वेळ लागत नाही. पत्रकार, टीव्ही चॅनेलवाले येतात. इतकंच काय, हे आक्रीत कसं घडलं, याचा ‘रीसर्च’ करायला अमेरिकेतून ‘नासा’चे दोन शास्त्रज्ञही येतात. त्यांचे आचरटासारखे प्रश्न. ‘नासा’वाले विचारतात, तुमच्या बायकोचे परग्रहावरच्या पुरुषाशी काही संबंध होते का? तिनं थडगी उकरून एखाद्या शवपेटीशी संबंध ठेवले होते का, असं विचारायलाही ‘नासा’चा शास्त्रज्ञ कमी करत नाही. कॉफिनचा बाप वैतागून सर्वांना हाकलून देतो.

खरोखरच शवपेटीसारखा दिसणारा ‘कॉफिन’ इतर सामान्य मुलांसारखा वाढत असतो. रंगमंचावर सुरुवातीला हातावर राहील एवढी पेटी प्रेक्षकांना दिसते. मग ती गुडघ्याच्या वर येण्याइतपत मोठी झालेली दिसते. नंतर कमरेच्या वर आणि शेवटी चांगली माणसाएवढी शवपेटी.. अंहं.. तो कॉफिन असतो, तो मुलगा असतो. त्याची वाढ होत असते, तो बोलत नाही, स्वतः काही करत नाही, एवढंच! त्यानं काय करावं, काय व्हावं, कुठे जावं हे वडील अन् आजी ठरवत असतातच ना!
बाप त्याला शाळेत घालतो, तो ठोकळा बघून टवाळ मुलं त्याला त्रास देतात, पट्टीने मारतात, तर पट्टीच मोडते. एक गुंड मुलगा तर त्याला करवतीनं कापण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात कुणी तरी येतं; पण करवतीच्या करकरीत चराची अर्ध्या वितीएवढी खूण कॉफिनच्या कपाळावर कायम राहते. तो मोठा होतो, तेव्हाही. एखाद्या माणसाच्या शरीरावरच्या जखमेच्या व्रणासारखी!

आजीला त्याला इंग्रजी शिकवायचं असतं. त्याच्यावर इंग्रजी संस्कार व्हायला हवेत! त्याला परदेशी पाठवायचं! पुन्हा एकदा ‘नासा’ची माणसं येतात. रीसर्चसाठी त्याला अमेरिकेला नेऊ म्हणतात. आजी हरखते; पण बाप चिडतो. नेऊ देत नाही.

मध्येच आजी एका बुवाकडे भदनाला जाते. बुवाचं आख्यानही फॉरेनवरच असतं. ‘या मातीत काही पेरलं तरी उगवायचं नाही. तुम्ही उठा आणि फॉरेनला जा,’ असंच बुवा भजनात म्हणतो.

२५ वर्षं हे असंच चाललेलं. मध्येच केव्हा तरी कॉफिनचं शरीर वाढायचं थांबतं. आता तो काहीच करत नाही. त्याला काही करता येत नाही. त्याला परदेशी धाडण्याचं स्वप्न पाहणारी म्हातारी आजीही मरून जाते. ‘आता याचं काय करायचं,’ असं म्हणून बाप त्याला तिरडीवर बांधतो आणि स्मशानात नेतो. तिथला चौकीदार मृताच्या नावाची नोंद करू लागतो. कॉफिन हे नाव त्याला चमत्कारिक वाटतं. म्हणून बाप त्याला ही सगळी हकीकत सांगतो.

हकीकतीचा फ्लॅशबॅक संपल्यावर चौकीदाराच्या समोर बाप ती शवपेटी उघडतो. त्याच क्षणी स्वप्नं बघणारी आजी, शेजारी-पाजारी, पत्रकार, बुवा, ‘नासा’वाले, विद्यार्थी असे सगळे भोवती प्रकट होतात. आपापल्या मताची कावकाल करू लागतात. चक्रावून गेलेला बाप शेवटी स्वतःच त्या पेटीत बसतो आणि पेटी बंद करून घेतो.

मुलांची क्षमता, बुद्धी, इच्छा-आकांक्षा, अपेक्षा, हौस-मौज यांपैकी कशा-कशाचा विचार न करता स्वतःच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्नं मुलांवर लादण्याचा काळ आता सोकावलाय. मुलांनी हे करावं, मुलांनी ते करावं, त्यांनी इंग्रजी बोलावं, इथं राहण्यापेक्षा परदेशात डॉलरमध्ये पगार घेऊन - चुकलो - सॅलरी घेऊन तिकडेच सेटल व्हावं, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या आई-बापांनी मुलांना व्यक्त होण्याची संधीच नाकारलीय. मग त्या सगळ्या मुलांचे कॉफिन - शवपेट्या होतात...!

रत्नागिरीच्या शिवोली सेवा मंडळानं ‘कॉफिन’ नावाचं हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर केलं. लेखक होते चैतन्य सरदेशपांडे आणि दिग्दर्शक ओंकार पाटील. यातल्या सगळ्याच पात्रांचा अभिनय कसदार होता. एक जिव्हाळ्याचा विषय शवपेटीसारख्या अशुभाशी संबंधित प्रतीकाचा मध्यवर्ती वापर करून अत्यंत कलात्मक रीतीनं सादर केलाय. आईच्या आकांक्षेपुढे न जाणारा, पदरी पडलेलं कॉफिनरूप मूल मुकाट्यानं स्वीकारणारा आणि तरीही त्याच्यावर प्रेम करणारा बाप ओंकार पाटीलनं प्रत्ययकारी रंगवलाय. ‘विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ...’ अशा चालीवर ‘फॉरेनऽऽ फॉरेनऽऽ’ असं भजन गात तल्लीन होऊन नाचणारा बुवा निशांत जाधवनं हुबेहूब साकारलाय. तब्बल ५५ स्पॉट असणारी प्रकाशयोजना साई शिरसेकरनं प्रभावी आणि अचूकपणे सांभाळलीय. 

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(‘जीना इसी का नाम है’ हे या स्पर्धेतलं अखेरचं नाटक २७ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सात वाजता रत्नागिरीतील श्रीरंग ही संस्था सादर करणार आहे.  या स्पर्धेतील सर्व नाटकांचे परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search