पुणे : ‘चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रुग्णाचे दस्तावेज आणि सर्व आवश्यक कागदपत्राच्या नोंदी असतील, तर पोलिसांपासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते आणि तुम्ही अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरवू शकता,’ असे प्रतिपादन मुंबई येथील सामाजिक व पोलीस कार्यकर्ते आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपीन चेकर यांनी केले.
लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे (एलसीसीआयए) पुण्यातील हॉटेल जेडब्ल्यू मेरियट येथे आयोजित ‘हेल्थकेअर’वरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘पोलिसांच्या फोननंतर पुढे काय?’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी डॉ. विश्वनाथ कोल्हे, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. उल्हास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘एलसीसीआयए’चे अध्यक्ष रवींद्र चौधरी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, वासू पाटील, गौरव अतरदे, प्रशांत चौधरी, डॉ. पवन भोळे, ‘एलसीसीआयए हेल्थकेअर’चे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पाटील, सहअध्यक्ष डॉ. संदीप भिरूड, सचिव डॉ. राहुल चौधरी, सहसचिव डॉ. विवेक नेमाडे, कोषाध्यक्ष डॉ. भूषण जावळे, सहकोषाध्यक्ष स्वप्नील भोळे, आयोजन प्रमुख डॉ. रत्नप्रभा चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जीआरडी इन्फ्रा संस्थेने प्रायोजित केलेल्या या परिषदेमध्ये हेल्थकेअर, मेडिको लीगल, मार्केटिंग इन हेल्थकेअर, आरोग्यसेवेत आयटीची भूमिका आदी विषयांवर परिसंवाद झाले. या वेळी डॉ. विश्वनाथ कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार (लाईफटाईम अचिव्हमेंट) देऊन सन्मानित करण्यात आले, तर डॉ. सुभाष चौधरी यांना हेल्थकेअर आयकॉन आणि डॉ. उल्हास पाटील यांना व्हर्सटाईल पर्सोनेलिटी ऑफ हेल्थकेअर प्रदान करण्यात आला.
डॉ. चेकर म्हणाले, ‘एखाद्या प्रकरणात पोलिसांचा फोन आल्यास आपण घाबरून जातो; मात्र आपले स्थानिक पोलिसांशी चांगले संबंध असतील आणि कागदपत्रे व्यवस्थित असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. वकिलामार्फत जामीन मिळवण्याचा प्रयत्न करावा. कठिण प्रसंग उद्भवला, तर कुटुंबीयांना माहिती असावी. पोलिसांच्या फोननंतर न घाबरता धैर्याने सामोरे जावे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावेत. सुरक्षेची काळजी घ्यावी.’

सीड इन्फोटेकचे संचालक नरेंद्र बऱ्हाटे म्हणाले, ‘रुग्णालय व्यवस्थापन, डॉक्टर आणि रुग्ण या तीनही घटकांसाठी माहिती तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. आरोग्यसेवा क्षेत्र वाढीबरोबरच अलीकडे स्वयंचलन (अॅटोमेशन) महत्त्वाचे ठरते. वेगवेगळी अॅप्लिकेशन्स, वेअरेबल डिव्हाईस आणि तंत्रज्ञान यामुळे उपचार पद्धती अधिक सोप्या होत आहेत. औषधांच्या वेळा, व्यायाम, ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा याची माहिती पुरविण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येत्या काळात आरोग्य क्षेत्र आणखी अत्याधुनिक होईल.’
डॉ. कोल्हे यांनी सत्काराला उत्तर दिले. डॉ. सुधीर राय यांनी अर्थकारण, आनंद माहूरकर यांनी ब्रँड विकसन यावर मार्गदर्शन केले. चेअरमन चौधरी यांनी ‘एलसीसीआय’बद्दल माहिती दिली. सचिव डॉ. राहुल चौधरी यांनी ‘एलसीसीआयए’च्या भविष्यकालीन योजनांबद्दल माहिती दिली.
डॉ. सुरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रत्नप्रभा चौधरी, पूनम यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेंद्र ठोंबरे यांनी आभार मानले.