Next
‘‘बालगंधर्व’शी माझं भावनिक नातं’
BOI
Tuesday, June 27, 2017 | 09:53 AM
15 0 0
Share this article:

‘रंगमंदिराच्या बोटाला धरूनच कलावंत मोठा होत असतो. तसंच माझं आहे. मी ‘बालगंधर्व’मध्ये भरपूर नाटकं बघितली. मी केलेल्या बहुतांश नाटकांचे प्रयोगही ‘बालगंधर्व’मध्ये झाले आहेत. ‘बालगंधर्व’मध्ये प्रयोग झाल्याशिवाय नाटक केल्यासारखंच वाटत नाही....’ ही भावना आहे ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांची... बालगंधर्व रंगमंदिराबद्दल त्यांनी खुली केलेली ही आठवांची पोतडी... 
............
‘बालगंधर्व’ला ५० वर्षं होत आहेत. त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. या सुंदर नाट्यगृहाच्या वास्तूशी, जागेशी माझं जिव्हाळ्याचं आणि भावनिक नातं आहे. ही वास्तू नाटकवाल्यांसाठी सोयीची, चांगली, आणि विचारपूर्वक बांधलीय. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या मान्यवरांचा त्या नियोजनात सहभाग होता. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

नाट्यगृह नाटकवाल्यांना सोयीचं आहे की नाही याचा फारसा विचार केला जाताना दिसत नाही. त्याची उंची, लांबी, रुंदी, खोली किती असावी, मेकअपरूम कुठे असावी, विंगेत जागा किती हवी, अशा गोष्टींचा विचार नाट्यगृह बांधलं जाताना केला जायला हवा. अनेक थिएटर्स बांधकामापासूनच दोषपूर्ण असतात. पुढे त्यांची दुरवस्था होते, ते आणखी वेगळंच; पण या सगळ्या बाबतीत बालगंधर्व रंगमंदिर अत्यंत आदर्श ठरतं. ही वास्तू उभारताना कलावंतांचा विचार केलेला आहे. काही शहरांमधली नाट्यगृहं ‘बालगंधर्व’चा आदर्श घेऊन बांधण्यात आली आहेत. 

आज मी ५३ वर्षांचा आहे. साधारणतः कळत्या वयापासून म्हणजे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून मी ‘बालगंधर्व’मध्ये नाटकं पाहतो आहे. मी इथं पाहिलेलं पहिलं नाटक मला आठवतं ते म्हणजे नानासाहेब शिरगोपीकरांचं ‘शाबास बिरबल शाबास.’ त्या नाटकात एक छोटा हत्ती रंगमंचावर आणण्यात आला होता. मी इथं प्रसाद सावकारांचं गाणं ऐकलेलं आहे, वसंतराव देशपांडेंचं गाणं ऐकलं आहे. प्रभाकर पणशीकर, निळू फुले, लालन सारंग, भक्ती बर्वे यांसारख्या उत्तमोत्तम कलावंतांची नाटकं पाहिलेली आहेत. रतन थिय्यामची, तसंच ‘घाशीराम कोतवाल’सारखी उत्तम नाटकं ‘बालगंधर्व’मध्ये मी पाहिलेली आहेत. ‘पुलं’सारख्या अनेकांच्या सभाही मी तिथं ऐकलेल्या आहेत. या सगळ्यामुळे या नाट्यगृहाच्या आठवणी माझ्या स्मृतीमध्ये खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे ‘बालगंधर्व’शी माझं भावनिक नातं आहे.

या नाट्यगृहाच्या अवतीभवतीचा जो अवकाश आहे, तोही मला आवडायचा. त्यातून अतिशय आनंद मिळायचा. मी शनिवार पेठेत राहायचो, तिथून येणं ‘बालगंधर्व’ला येणं हा अत्यंत आनंदाचा भाग होता. याचं आवार खूप मोठं होतं. आत्ता झाशीच्या राणीचा जो पुतळा रस्त्यावर आहे, तो त्या वेळी ‘बालगंधर्व’च्या आवारात होता. नंतर मधून रस्ता काढल्यामुळे तो बाहेर गेला; पण आजूबाजूचं संभाजी उद्यान किंवा एकंदरच हा सगळा परिसर छान आणि शांततापूर्ण होता. रंगमंदिराच्या बोटाला धरूनच कलावंत मोठा होत असतो. तसंच माझं आहे. मी ‘बालगंधर्व’मध्ये भरपूर नाटकं बघितली. मी केलेल्या साधारण २०० म्हणजे बहुतांश नाटकांचे प्रयोग ‘बालगंधर्व’मध्ये झाले आहेत. ‘बालगंधर्व’मध्ये प्रयोग झाल्याशिवाय नाटक केल्यासारखंच वाटत नाही. 

एवढा सगळा छान वारसा असलेलं हे रंगमंदिर जोपासण्यासाठी महापालिकेनं कसोशीनं प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी नाट्यप्रेमी व्यवस्थापक तिथं असले पाहिजेत. नोकरी करणं आणि अशा ठिकाणी नोकरी करणं यात फरक आहे. नाट्यगृह म्हणजे केवळ दगडविटांची वास्तू नसते. तिथलं वातावरणही सांस्कृतिक हवं. तिथं वाचनासाठी छोटे कट्टे असले पाहिजेत, मैफली असल्या पाहिजेत. ज्यांना पैसे देता येतात, तीच लोकं सध्या तिथं जाऊ शकतात; पण तरुण कलाकार किंवा प्रायोगिक रंगभूमीवरचे कलाकार तिथं जात नाहीत. कारण त्यांना ते परवडत नाही. तसं होता कामा नये. गायन, नर्तन, तमाशावाले अशा सगळ्या प्रकारच्या कलावंतांना तिथं व्यासपीठ मिळायला हवं; कलाकारांवर कोणतं बंधन नको; पण शिस्तही पाळली जायला हवी.

पहिली काही वर्षं अत्यंत चांगल्या असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाची आताची अवस्था वाईट आहे. अजूनही ती सुधारली जाऊ शकते; पण त्यासाठी आवश्यकता आहे ती व्यवस्थापनाचा दृष्टिकोन बदलण्याची. नाट्यगृहाची दुरवस्था होऊ नये, तिथं शिस्त पाळली जावी, यासाठी नागरिक, कलावंत आणि सरकार/प्रशासन या तिघांनीही प्रयत्न करायला हवेत. शिस्त म्हणजे जरब नव्हे, तर प्रेमाचा, नैतिक धाक असला पाहिजे. त्यासाठी कलेविषयी प्रेम असणाऱ्यांनी व्यवस्थापन करायला हवं. हे थिएटर आपलं आहे, असं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण व्हायला हवं, असं वाटतं.

(शब्दांकन : अनिकेत कोनकर)

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search