Next
‘इंधन दरवाढ नियंत्रणासाठी सरकारचा पर्यायी इंधनवापरावर भर’
BOI
Friday, June 01, 2018 | 11:19 PM
15 0 0
Share this article:

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी
पुणे : ‘पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत; पण आता पर्यायी इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार वीजेवरील, हायब्रीड, तसेच इथेनॉल आणि बायोसीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देत आहे. येत्या सहा महिन्यात अशी वाहने बाजारात येतील त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या दरमहा इंधन खर्चात चार ते पाच हजार रुपयांची बचत होईल,’ असा दिलासा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. 

‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू केल्यास त्याचे दर सात ते आठ रुपयांनी कमी होतील, असेही गडकरी यांनी सांगितले. इंधन दर नियंत्रणात आणण्यासाठी हे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत जीएसटी आयोगाबरोबर चर्चा सुरू आहे,’ असेही ते म्हणाले. केंद्रातील भाजप सरकारला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. त्या कालावधीतील कामगिरीची माहिती देण्यासाठी एक जून रोजी पुण्यात नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी इंधनाच्या भाववाढीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी हे उत्तर दिले. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, ‘इथेनॉल, मिथेनॉल, बायोसीएनजी अशा पर्यायी इंधन निर्मितीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे. लिथियम बॅटरी उत्पादनाचे १३ प्रकल्प सुरू होणार आहेत, तर इथेनॉल निर्मितीचे पाच प्रकल्प सुरू होत आहेत. धान्यापासून इथेनॉल निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. वाहन उत्पादक कंपन्यांना हायब्रिड वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक कार, स्कूटर, बायोफ्युएल वाहनांवर केवळ १२ टक्के जीएसटी आहे. अशा वाहनांना आवश्यक इंधन उपलब्ध झाले, तर त्यांचा वापर वाढेल. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. तसेच पेट्रोल, डिझेल आयातीसाठी करावा लागणारा प्रचंड खर्चही कमी होईल. सार्वजनिक वाहतुकीसाठीही अशी वाहने आणली जात आहेत. नागपूरमध्ये इलेक्ट्रिक बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पुणे महानगरपालिकाही लवकरच इलेक्ट्रिक बस आणणार आहे.’ 

‘गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत, त्याचा सर्वांवर परिणाम होत असला, तरी भाजीपाला, अन्नधान्य, साखर यांचे दर कमी झाले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. २०१४ मध्ये यूपीए सरकारवर टीका करून आम्ही हे दर कमी करू असा दावा केला होता. त्यानुसार, काही महिन्यांसाठी पेट्रोलचे दर ६२ रुपये प्रति लिटर इतके कमीदेखील  झाले. आता गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या इंधनदरावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. आम्हीही सोशल मीडियाचा आधार घेऊन यूपीएवर टीकेची झोड उठवली होती. आता ते हे काम करत आहेत. काँग्रेसकडून भाजपवर घटनेत बदल केल्याची टीका केली जाते; मात्र त्यांची सत्ता असताना ७२ वेळा घटना बदलली आहे,’ अशी टीकाही गडकरी यांनी कॉंग्रेसवर केली. 

महागाई, शेतकरी आंदोलन याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, ‘महागाई कमी करणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे यात समन्वय घालणे आवश्यक आहे. यंदा देशात डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे; पण ती ठेवण्यास जागा नसली तरीही जास्तीत जास्त खरेदी करण्याचे प्रयत्न आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तेलावर आयात शुल्क वाढवले आहे. शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठीच हे प्रयत्न केले जात आहेत. भाव वाढले, तर महागाई झाली म्हणून आरडाओरड होते आणि दर कमी केले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून बोल लावले जातात. दोन्हींचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.’ 

‘भाजप सरकार देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करत असून, तरुणाईसाठी कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, महिला संरक्षण, विकास, कृषी विकास, सर्वच क्षेत्रांत सरकारने आणलेल्या योजनांचा लाभ जनतेला झाला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा याला आळा घालण्यातही सरकारला यश आले आहे. देशाचा विकास करायचा असेल, तर सर्वांनी एका दिशेने प्रयत्न केले पाहिजेत,’ असे आवाहनही त्यांनी केले. 

टोलवसुली बंद कधी होणार, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘राज्यातील अनेक भागांत रस्त्याची कामे चालू आहेत. चांगले रस्ते पाहिजे असतील, तर त्यासाठी टोल देणे आवश्यक आहे. तसेच मी टोल बंद करणार बोललो असे म्हटले जाते; पण मी टोल बंद करणार असे कधीही बोललेलो नाही.’

रस्त्यांच्या कामाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, ‘देशात राष्ट्रीय पातळीवर रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असून, ही कामे वेगाने सुरू आहेत. दिल्ली-मेरठ महामार्गासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून, त्यासाठी भरपूर निधी उपलब्ध आहे. दिल्ली रिंगरोडमुळे वाहतूक कोंडीची समस्या ४१ टक्क्यांनी, तर प्रदूषणाची समस्या २७ टक्क्यांनी कमी झाली आहे. ४० हजार  कोटींची विकासकामे येथे सुरू असून, पर्यावरणरक्षणाचा ही विचार केला जात आहे. महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी अनुदान देण्यास माझे मंत्रालय तयार आहे. प्रति किलोमीटर झाडे लावण्यासाठी १५ लाख  रुपये अनुदान दिले जाईल. महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यक्ती यांनी पुढे यावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. 

‘प्रधानमंत्री सिंचन योजनेसारख्या माध्यमातून २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.  महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून बळीराजा योजनेतील १०८ प्रकल्पांची कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंचनक्षेत्रात अठरा टक्क्यांवरून ४०  टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होणार आहे’, असे  गडकरी म्हणाले.

‘पन्नास  कोटी लोकांना आरोग्य विमा देण्यात आला असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.  त्यापैकी एक कोटी लोकांना आत्तापर्यंत घरे देण्यात आली आहेत.  उज्वला योजनेअंतर्गत तीन कोटी ८०  लाख गरीब महिलांना गॅस जोडण्या देण्यात आल्या असून, त्यासाठी आठ कोटी महिलांना गॅस पुरविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सात कोटी २५ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत.  कौशल्य विकासासाठी तेरा हजार प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत एक कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आहे’, असे गडकरी यांनी नमूद केले.

‘हवाई वाहतूक स्वस्त आणि  छोट्या शहरांमध्येही हवाई वाहतुकीची सुविधा निर्माण झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्रात २७ टक्क्याने वाढला झाली आहे. हे ‘अच्छे दिन’ आल्याचेच लक्षण आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

( नितीन गडकरी यांचे भाषण पाहा सोबतच्या व्हिडिओत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search