Next
‘इंधन अवलंबित्व संपविण्यासाठी जैवऊर्जा हाच शाश्वत पर्याय’
संतोष गोंधळेकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Friday, June 28, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘भारताकडे स्वतःचा इंधनाचा साठा फक्त चार वर्षे टिकणारा आहे. ८४ टक्के इंधन आयात करावे लागते. जगातील इंधनाचा साठा संपत चालला आहे. इंधनाचे भाव कितीही वाढले, तरी मागणी वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजीवरील आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. हे अवलंबित्व संपवायचे असेल, तर जैवऊर्जा हाच एकमेव पर्याय आहे,’ असे ठाम प्रतिपादन संतोष गोंधळेकर यांनी केले.

मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जून २०१९ रोजी ‘जैवऊर्जा’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ही व्याख्यान मयूर कॉलनीतील शिक्षणशास्त्र संस्था सभागृहात झाले. विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विनय र. र. यांनी प्रास्ताविक केले.

गोंधळेकर म्हणाले, ‘पेट्रोल, डिझेलच्या वापरामुळे जगाचे तापमान वाढत चालले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत पर्यायी जैवऊर्जा शोधताना अन्न सुरक्षा, चारा सुरक्षा धोक्यात येता कामा नये, ही नवी ऊर्जा परवडणारी असली पाहिजे, पर्यावरणपूरक आणि शाश्वत असावे, हा संशोधनाचा विषय आम्ही हाती घेतला होता. १६ वर्षांनी हे संशोधन यशस्वी झाले आहे.’

बायोमास वापरून पाणी, शेती आणि ऊर्जेची साखळी निर्माण करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हत्ती गवत आणि बांबू हे बायोमास वापरून इंधन तयार करण्याचा उपाय आम्हाला संशोधनाद्वारे सापडला. बांबू हा कोळशापेक्षा स्वस्त असल्याने इंधन निर्मिती स्वस्त झाली. या इंधनावर गाडया चालू शकतात, हे संशोधनात सिद्ध झाल्याचे गोंधळेकर यांनी सांगितले.

‘बॅक्टेरिया वापरून बांबू, हत्ती गवत अशा बायोमासवर प्रक्रिया करून वाहनांना वापरता येणारे मिथेन वायुचे सीएनजी इंधन पिरंगुट येथे गेली तीन वर्षे तयार केले जात आहे. खनिजाधारीत सीएनजीपेक्षा हा सीएनजी अधिक शुद्ध आहे आणि प्रचलित सीएनजी इतकीच या बायोमास सीएनजीची किंमत ठेवण्यात आली आहे. सीएनजी केल्यावर उरणाऱ्या बायोमासपासून खत, जाळण्यासाठी ब्रिकेट विटा तयार करता येतात. स्वयंपाकाचा गॅस ही यातून करता येते. तुराटया, झावळ्या, गवत असे कोणतेही बायोमास सीएनजी इंधन करण्यासाठी वापरता येते. पेट्रोलच्या निम्म्या भावात हे सीएनजी इंधन उपलब्ध होते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही त्याचा फायदा होणार आहे,’ अशी माहिती गोंधळेकर यांनी दिली. 

‘नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत या संशोधनाला प्रोत्साहन दिले. नितीन गडकरी यांनी त्यासाठी आवश्यक कायदा करण्याचा पाठपुरावा केला. आता सर्व कायदेशीर मान्यता या सीएनजीला मिळाली आहे. २० कोटी खर्चाचा हा प्लांट आता बँकेबल आहे. सरकारी अनुदानास पात्र आहे. भावी वर्षांमध्ये जागोजागी हे पंप दिसतील. एकरी १० हजार खर्च केला, तर एकरी एक लाख रुपये उत्पन्न दर वर्षी शेतकऱ्याला मिळू शकते. भारत आयात इंधनासाठी सहा लाख कोटी खर्च करतो, हे पैसे शेतकऱ्याला मिळू शकतात. त्यातून देश आर्थिक सक्षम होणे शक्य आहे,’ असे गोंधळेकर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search