Next
मराठीला भाषेचे डॉक्टर कधी मिळणार?
BOI
Monday, September 10, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

ब्रिटनमधील वैद्यकीय क्षेत्राची नियंत्रक संस्था असलेल्या ‘अॅकॅडमी ऑफ मेडिकल रॉयल कॉलेज’ या संस्थेने डॉक्टरांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘आपल्या रुग्णांसाठी तुम्ही जो पत्रव्यवहार कराल, तो सोप्या इंग्रजीत करा,’ असा सल्ला संस्थेने दिला आहे. ‘प्लीज, राइट टू मी,’ नावाची मोहीम यासाठी संस्थेने सुरू केली आहे. ‘डॉक्टर मंडळींनी लॅटिन शब्द आणि क्लिष्ट वैद्यकीय पारिभाषिक शब्द टाळावेत,’ असे त्यांना सांगण्यात आले आहे. इंग्रजी भाषक सुदैवी म्हणायला हवेत. त्यांच्याकडे केवळ रुग्णांच्या नव्हे, तर भाषेच्या प्रकृतीकडे लक्ष देणारेही डॉक्टर आहेत. त्यामुळे सरळ, साध्या भाषेत संवाद कसा साधावा याची काळजी करणारे लोक तिकडे आहेत. त्या अनुषंगाने चर्चा करणारा लेख...
...........
‘व्यावसायिक लेखनामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती समोरच्याला आपला संदेश देण्याची. परंतु बहुतांश व्यावसायिक लेखन साहित्यात प्रत्येक बाब अत्यंत क्लिष्ट करून सांगितलेली असते. समोरच्या वाचकाला गोंधळात पाडण्यासाठीच जणू हे लेखन केलेले असते. त्यामुळे सर्वांत प्रथम व्यावसायिक लेखनाचा दर्जा सुधारण्याची आणि त्यात सोपेपणा आणण्याची गरज आहे...’

हा उतारा आहे ‘ऑन रायटिंग वेल’ या जगप्रसिद्ध पुस्तकातील. विल्यम झिन्सर या प्राध्यापकाने लिहिलेले हे पुस्तक गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळ होतकरू इंग्रजी लेखकांसाठी दीपस्तंभाचे काम करत आहे. झिन्सर यांनी पुस्तक लिहिले, तेव्हा टाइपरायटिंगचा (टंकलेखन) जमाना होता. त्यानंतर रिमच्या रिम कागद खर्ची पडले आणि टनावारी साहित्य जन्माला आले. टाइपरायटर मागे पडून संगणक आले व आता संगणकही वृद्धत्वाकडे वाटचाल करत आहेत. लोक (सर्वच, केवळ तरुण पिढी नाही!) मोबाइलवर टंकायला (टाइप करायला) सरावले आहेत. तंत्र बदलले; पण मंत्र कायम राहिला. सोपी व सरळ भाषा हाच तो मूलमंत्र आणि कोणत्याही भाषेत तो कायम राहिला. अन् म्हणूनच आजही ‘बेस्ट सेलर’मध्ये या पुस्तकाने आपली जागा टिकवून धरली आहे.

‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांसी सांगावे,’ हे कितीही खरे असले तरी जोपर्यंत समोरच्याला तुम्ही काय सांगत आहात हे कळत नाही तोपर्यंत तो शहाणाही होणार नाही. सोप्या भाषेची ही महती गाण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील डॉक्टरांना देण्यात आलेली मात्रा!

ब्रिटनमधील वैद्यकीय क्षेत्राची नियंत्रक संस्था असलेल्या ‘अॅकॅडमी ऑफ मेडिकल रॉयल कॉलेज’ या संस्थेने डॉक्टरांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘आपल्या रुग्णांसाठी तुम्ही जो पत्रव्यवहार कराल, तो सोप्या इंग्रजीत करा,’ असा सल्ला संस्थेने दिला आहे. ‘प्लीज, राइट टू मी,’ नावाची मोहीम यासाठी संस्थेने सुरू केली आहे. ‘डॉक्टर मंडळींनी लॅटिन शब्द आणि क्लिष्ट वैद्यकीय पारिभाषिक शब्द टाळावेत,’ असे त्यांना सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अवघड शब्दांच्या वापरामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदवले आहे. संस्थेने या संदर्भात एक पाहणीही केली आहे. त्यात बहुतेक रुग्णांनी थेट शब्दांत संवाद साधण्याला प्राधान्य दिले. गंमत म्हणजे बहुतांश डॉक्टरांनीही तीच भावना व्यक्त केली. 

डॉक्टरांनी कसे लिहू नये, हे सांगतानाच कसे लिहावे, हेही संस्थेने सांगितले आहे. तर कसे लिहावे? संस्था म्हणते, सुलभ इंग्रजीतील छोटी आणि थोडक्यात सांगणारी वाक्ये वापरा. वैद्यकीय संक्षिप्त रूपे वापरणे टाळा. लॅटिन शब्द टाळा. सामान्य व्यवहारात व वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळा अर्थ असलेले शब्द टाळा. नेहमीच्या वापरातील शब्द वापरा. (उदा. ‘रेनल’ऐवजी किडनी वापरा.)

या काही सूचना झाल्या. अन् त्या केवळ डॉक्टरांना कशाला हव्यात? प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अशा सूचनांचा स्वीकार करायला हवा. जगाच्या इतिहासात अशी हजारो उदाहरणे आहेत, की जिथे वक्त्यांनी सोप्या-सरळ भाषेत आपले म्हणणे मांडले आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत, वामन पंडितापासून रघुनाथ पंडितापर्यंत अनेक कवींनी रसाळ भाषेत रचना केल्या. आज आपण वापरत असलेल्या बहुतेक म्हणी व लोकोक्ती या कविराजांच्या कवितावृक्षांची फळे आहेत. रा. ग. गडकरी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे प्रतिभावंत विरळे! प्रत्येकाने त्या वाटेने जाण्याची गरज नाही. उलट तो प्रयत्न अंगावर शेकण्याचीच शक्यता जास्त!  

दुर्दैवाने आपल्याकडे दुर्बोध शब्द आणि लांबलचक वाक्यरचना हे पांडित्याचे निदर्शक असल्याचा समज आहे. त्याची लागण अशी जबरदस्त, की भाषेच्या सीमा ओलांडून तो हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा कितीतरी भाषांमध्ये फैलावला आहे. अलीकडे उर्दूमध्ये अरबी शब्दांची खोगीरभरती जोरात सुरू आहे अन् त्याला उत्तर म्हणून हिंदीचे संस्कृतकरण चालू आहे. याउलट हिंदीला आणखी एक विकृत वळण मिळत आहे, ते म्हणजे त्यात इंग्रजीची पेरणी करून तिला ‘मॉडर्न’ महाराष्ट्र वळण द्यायचे. इंग्रजी शब्द पेरण्याच्या या सोसापायी हिंदीचे रूप पार ओळखू न येण्याइतपत पालटण्यात येत आहे. मुख्यमंत्री या शब्दाऐवजी सीएम आणि पंतप्रधान शब्दाऐवजी पीएम हे शब्द लिहिण्यात येत आहेत अन् तेही रोमन लिपीतून. हिंदीचे सर्वच प्रकारे  अनुकरण करणाऱ्या मराठीत हा प्रकार लवकरच रूढ होऊ शकतो, ही भीती आहेच. 

अन् मराठीबाबत काय बोलावे? तिथे तर सगळाच आनंदीआनंद आहे. शब्दांचेही काही पावित्र्य असते आणि व्याकरणालाही काही किंमत असते, हेच आपल्या गळी उतरत नाही. याबाबत काही शंका असल्यास सरकारी निवेदने किंवा पोलिसांची पत्रके वाचावीत. या दुर्दैवावर कडी म्हणजे मराठी जराही दुर्बोध झाली, की त्याचा दोष संस्कृतवर ढकलून आपण मोकळे होतो. भाषेचे प्रदूषण शब्दांनी होते, हे खरेच; पण ढिसाळ रचना आणि बेबंद प्रयोग हेही भाषेचे मारेकरीच होत. नव्याने इंग्रजी शिकलेल्या भारतीय लोकांमध्ये विनाकारण जडजंबाळ भाषा आणि गुंतागुंतीच्या वाक्यरचना करण्याची हौस खासकरून दिसते. ‘रीडर्स डायजेस्ट’सारखे मासिक सोप्या भाषेत येऊन सगळ्यांच्या मनात जागा करत होते आणि त्यातून त्याच्या प्रतिष्ठेला जराही बाधा पोहोचली नाही, हे त्यांच्या गावीही नसते! (‘रीडर्स डायजेस्ट’ आज पूर्वीच्या वैभवाच्या परिस्थितीत नाही हे खरे आहे, पण त्याची कारणे वेगळी आहेत...)

तसे इंग्रजी भाषक सुदैवी म्हणायला हवेत. त्यांच्याकडे केवळ रुग्णांच्या नव्हे, तर भाषेच्या प्रकृतीकडे लक्ष देणारेही डॉक्टर आहेत. त्यामुळे सरळ, साध्या भाषेत संवाद कसा साधावा याची काळजी करणारे लोक तिकडे आहेत. उगाच नाही जगात प्रत्येक भाषेला तिची दहशत वाटते आणि तिच्या या घोडदौडीला खळ लागण्याची शक्यताही सध्या प्रकर्षाने दिसत नाही. 

एकीकडे भाषेच्या भवितव्यासाठी काळजी करणाऱ्या महाराष्ट्रात असे रोगनिदान करणारे भाषेचे डॉक्टर कधी येणार? सोपी भाषा सोडून द्या, त्यांनी डॉक्टरांना केवळ आपल्या भाषेत संवाद साधायला सांगितले तरी पुरे!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search