Next
बहुजन हिताय बहुजन सुखाय - आकाशवाणी
BOI
Sunday, February 24, 2019 | 12:45 PM
15 1 0
Share this article:

जागतिक रेडिओ दिन १३ फेब्रुवारी रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘आकाशवाणी’बद्दल... 
...........
आकाशवाणी हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. पहाटे, कुठलेही केंद्र सुरू होताना, श्रीधर पार्सेकर यांनी वाजवलेली व्हायोलिनवरची खास धून, त्यानंतर सनईची मंगल ध्वनिमुद्रिका, दिल्लीहून सादर होणाऱ्या हिंदी व त्यानंतर संस्कृतमधून बातम्या, मग प्रादेशिक बातम्या हे सगळे वर्षानुवर्षे, अगदी दररोज लाखो घरांमधील ‘आन्हिक’ बनले आहे. एका बाजूला आपली दैनंदिन कामे सुरू असतात; पण आपले कान रेडिओकडे असतात. दूरदर्शन, त्यावरील असंख्य वाहिन्या चालू असल्या तरी रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही.

मुंबई आणि कलकत्ता येथे स्वत:च्या ट्रान्समीटरसह प्रथम ‘ऑल इंडिया रेडिओ’ या नावाने दोन केंद्रे २३ जुलै १९२७ रोजी सुरू झाली. सन १९३०मध्ये ‘भारतीय प्रसारण सेवा’ (Indian Broadcasting Corporation) या नावाने त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ‘आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठेवण्यात आले. (रवींद्रनाथ टागोर यांनी ते पूर्वीच सुचवलेले होते.) ‘प्रसार भारती’ची स्थापना आठ जून १९३६ रोजी झाली. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे नियंत्रण ही संस्था करते. पुणे आकाशवाणी केंद्र दोन ऑक्टोबर १९५३ रोजी सुरू झाले. विविध भारती’चे प्रसारण देशभर सर्व भाषांमध्ये होते. त्याचा प्रारंभ तीन ऑक्टोबर १९५७ रोजी मुंबई येथे झाला. सर्व केंद्रांवरून प्रामुख्याने चित्रपट संगीत लागत असल्यामुळे ‘विविध भारती’ लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘एफएम’वरून रेडिओ सिटी, मिरची, रेड एफएम, इत्यादी अनेक केंद्रे सध्या चालू आहेत. लवकरच त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

पुणे आकाशवाणी केंद्र सुरू झाले. तेव्हा मी सात वर्षांचा होतो. इयत्ता तिसरीत.  तेव्हा (जाहिरातीत गोड मुलाचे चित्र असलेला) मर्फी रेडिओ प्रथम घरात आला. माझ्या आठवणीप्रमाणे, सकाळी सातला कार्यक्रम सुरू व्हायचे. सनईनंतर भक्तिगीते लागायची. लता, आशा, भीमसेन, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर, पंडिराव नगरकर, सुमन कल्याणपूर आदींची गाणी लागायची. पुढे गदिमा/सुधीर फडक्यांचे ‘गीत रामायण’ सुरू झाले. त्याने लोकप्रियतेचा कळस गाठला. घरोघर लोक हृदयाचे कान करून दर आठवड्याचे गीत ऐकायचे. आधी पुरुषोत्तम जोशी यांचे गंभीर आवाजात दर गाण्याचे प्रास्ताविक असायचे. नंतर, फडक्यांसह अनेक गायक -गायिकांचे गाणे सुरू व्हायचे. सध्याही, पुणे केंद्रावरून जुन्या संचामधील ती गीते दर आठवड्याला लागतात. ती ऐकताना जुन्या आठवणी जागृत होतात. या कार्यक्रमांव्यतिरिक्त, शास्त्रोक्त संगीत, महिलांसाठी कार्यक्रम, रात्री श्रुतिका किंवा नभोनाट्य, मुलाखती हे सगळे श्रवणीय असे. गोपीनाथ तळवळकर (नाना) आणि सई परांजपे (ताई) सादर करीत असलेला ‘बालोद्यान’ हा कार्यक्रमसुद्धा त्या काळी विशेष लोकप्रिय होता. काही वेळा मी त्यात सहभागी झालो होतो. आजही घरात हजर असताना रेडिओचे कुठले ना कुठले केंद्र लहान आवाजात सुरू असते. अगदी दूरदर्शनवर कुठलाही कार्यक्रम चालू असला तरीही.

त्या वेळी मध्यम लहरींवर केंद्रे चालत. लघुलहरींमधले रेडिओ सिलोन हे असेच अत्यंत लोकप्रिय केंद्र. ‘बिनाका गीतमाला’ ही अमीन सयानीच्या निवेदनामुळे श्रोत्यांचे आकर्षण ठरली. हिंदी चित्रपटांमधील समकालीन गाजलेली गाणी एक तासभर चालायची. आम्ही दर बुधवारी रात्रीचे आठ कधी वाजतात, याची चातकासारखी वाट बघायचो. अभ्यास व्यवस्थित चालू असल्यामुळे घरातून अशी गाणी ऐकायला कधीही विरोध झाला नाही. मुंबई आकाशवाणीवरून छान छान कार्यक्रम होत असत. शाळा सांभाळून त्यातले निवडक सादरीकरण आम्ही ऐकत असू. पुणे-मुंबई केंद्रावरील कित्येक निवेदक/वृत्तनिवेदक खूप प्रसिद्ध झाले होते. पुरुषोत्तम जोशी, रवींद्र भट, सुधा नरवणे, भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, प्रतिमा कुलकर्णी (पुण्यातील) आणि कमालिनी विजयकर, लीलावती भागवत, नीलम प्रभू (मुंबईतील) हे सगळे श्रोत्यांचे निकटवर्तीयच बनले होते. हिंदी-मराठी चित्रपटसंगीताला प्राधान्य मिळत असल्यामुळे शास्त्रीय संगीत (थोडे अपवाद वगळता) मागे पडले आहे, ही मात्र खेदाची गोष्ट आहे. दूरदर्शनवरही तीच स्थिती आहे. साहित्यिक आणि संगीत नाटकांचे कार्यक्रम अधूनमधून होत असतात.

विविध भारती :
पुणे आणि मुंबईत ‘अ’ आणि ‘ब’ अशी केंद्रे सुरू झाली. रेडिओ सिलोनच्या अमाप लोकप्रियतेनंतर १९५७ साली ‘विविध भारती’च्या प्रसारणाला भारतात सुरुवात झाली. ‘ब’ म्हणजेच विविध भारती. हळूहळू देशभर त्याचे जाळे पसरले. पुण्यातच मुख्य केंद्रासह विविध भारती, रेडिओ सिटी, रेड एफएम, मिरची यांसह आठ केंद्रे कार्यरत आहेत. संगीताबरोबरच आरोग्य, महिलांसाठी चर्चा, नाटके, श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे आणि बातम्या असे कार्यक्रम नियमितपणे चालतात. सर्व केंद्रे आणि तिथले कर्मचारी, तसेच कलाकारांचे मानधन, हा खर्च अवाढव्य असल्याने, जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाला प्रायोजक घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे थोडा रसभंग होतो; परंतु जाहिरातींच्या वेळी ‘कान बंद’ करण्याची कला आता साध्य झालेली आहे. कुठलाही कार्यक्रम किंवा विशिष्ट जाहिरात सुरू झाली, की ‘किती वाजले’ हे कळतं. ‘टाइमशीर’ रेडिओचा हा एक फायदा. भविष्यात, ‘अमुक अमुक प्रायोजित आकाशवाणीचे पुणे केंद्र’ अशी घोषणा ऐकू आली तरी नवल वाटायला नको! मध्यम लहरी आणि लघुलहरींद्वारा (प्रक्षेपकाच्या क्षमतेप्रमाणे) रेडिओचा आवाज चारही दिशांना ठराविक अंतरांपर्यंत पोहोचतो. नागपूर किंवा सांगली केंद्र पुण्याला स्पष्टपणे ऐकू येत नाही. MW, SW आणि FM अशा तीन बँड्सवरून सर्व केंद्रांचे प्रसारण चालते. FM वरून, मोठ्या शहरांच्या भोवतालचा खूप मोठा भूभाग व्यापला जातो. म्हणजे, दिल्लीच्या अखत्यारीतील विविध भारती किंवा ‘मिरची’सारखी केंद्रे तिथल्याच भोवतालच्या भागात ऐकू येतात. पुण्यापर्यंत त्यांच्या लहरी पोहोचू शकत नाहीत. 

२००७मधे विविध भारतीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. भारतीय सेनेच्या मनोरंजनासाठी ‘जयमाला’मधून संध्याकाळी सव्वासात वाजता नामवंत कलाकार आपल्या आवडीची गाणी सादर करतात. वर्षानुवर्षे हा कार्यक्रम चालू आहे. बदलत्या काळाप्रमाणे नवनव्या कार्यक्रमांची निर्मिती होत राहते. अन्य गाजणारे कार्यक्रम म्हणजे हवामहल, संगीत सरिता, पिटारा, सखी सहेली, मंथन, उजाले उनकी यादों के इत्यादी इत्यादी. काही केंद्रांवरून २४ तास प्रसारण चालू असते.

‘डायरेक्ट-टू-होम (डीटीएच)’ म्हणजे सॅटेलाइटवरून अनेक रेडिओ केंद्रांपर्यंत राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यक्रम ‘पोहोचते’ केले जातात. त्यामुळे मोठे क्षेत्र ‘पादाक्रांत’ करता येते. डिश अँटेनाद्वारे हे सर्व काही श्रोत्यांना मोफत उपलब्ध आहे. दूरदर्शनची अनेक केंद्रेही ‘डीटीएच’द्वारे पाहता येतात.

हॅम रेडिओहॅम रेडिओ :
अधिकृत रेडिओ केंद्रांबरोबरच ‘हॅम रेडिओ’ म्हणजे ‘हौशी लोकांचे रेडिओ केंद्र’ याबद्दलही थोडे जाणून घेणे उपयुक्त ठरेल. अमेरिकेत लाखो आणि जगभरात कोट्यवधी लोक या ‘हॅम’ रेडिओचा लाभ घेतात. ही खासगी केंद्रे चालवणाऱ्या लोकांना ‘रेडिओ हॅम्स’ किंवा नुसते ‘हॅम्स’ असे म्हणतात. त्याचा परवाना मिळवण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. निरनिराळ्या लघुलहरींच्या बँड्सवरून या रेडिओचे प्रसारण करता येते. त्याद्वारे करमणुकीसह, शिक्षण, आणीबाणीच्या काळात संपर्क साधन, आपल्या भागात होणारे कार्यक्रम, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विषय हाताळता येतात. प्रसारण क्षमतेनुसार हा रेडिओ दूर अंतरापर्यंत ऐकता येतो. मोबाइल किंवा इंटरनेटशिवाय जगभर आणि अवकाशातसुद्धा बोलता येते, संपर्क साधता येतो, हे ‘हॅम’चे वैशिष्ट्य आहे. 

परवानाधारकांना असे केंद्र कुठेही उभे करणे शक्य आहे. त्यासाठी पायाभूत खर्च मात्र आहे. रेडिओचे तंत्रज्ञान आणि तो कसा चालवायचा, याचे शिक्षण आधी घ्यावे लागते. ‘एबीसी टेलिव्हिजन’च्या ‘लास्ट मॅन स्टँडिंग’ या मालिकेत ‘हॅम रेडिओ’ हा महत्त्वाचा भाग आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभर या ‘हौशी’ केंद्रांचा विस्तार झाला. आधुनिक संगणकांमुळे ‘डिजिटल मोड’ उपयोगात आल्यामुळे ‘हॅम्स’चे बळ वाढले आहे. ही केंद्रे सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात.

पूर्वी लहान गावांमधील ग्रामपंचायतींसाठी ‘रुरल ब्रॉडकास्टिंग’ ही सरकारी योजना चालू होती. आता तर खेडोपाडी लोकांच्या हातात मोबाइल्स आले आहेत. तरी आजही रेडिओ हेच प्रभावी माध्यम ठरलेले आहे. ‘प्रसार भारती’चे त्यावर नियंत्रण असले, तरी केंद्र संचालकांना आणि निर्मात्यांना पुरेसे स्वातंत्र्य दिलेले आहे. सरकारी खाती आणि कंपन्या यांच्याबद्दल लोकांच्या मनात जी अढी/अविश्वास असतो, त्याच्या अगदी विरुद्ध रेडिओचे कार्य, उच्च दर्जा राखून चालते. तिथे कुठलेही ‘प्राधान्य’ आड येत नाही.

रेडिओच्या सुमारे ९२ वर्षांच्या वाटचालीला लाख सलाम!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search