Next
मिलिंद बोकील, मनोहर शहाणे, मधू लिमये
BOI
Tuesday, May 01 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे,’ असं सांगणारं मुलांचं भावविश्व आपल्या ‘शाळा’ कादंबरीतून मांडणारे मिलिंद बोकील, ‘माणूस खरंच पूर्णपणे स्वतंत्र आहे का?’ असा प्रश्न करून त्याची भन्नाट उकल करणारे मनोहर शहाणे आणि सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून बहुमान मिळालेले राजकीय आणि सामाजिक भाष्यकार मधू लिमये यांचा एक मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
मिलिंद बोकील

एक मे १९६० रोजी जन्मलेले मिलिंद बोकील हे कथा-कादंबरीकार आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश’ ही वयाच्या २१व्या वर्षी लिहिलेली कथा किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध होऊन गाजल्यावर ते चर्चेत आले. ‘कातकरी विकास की व्यवस्थापन?’ हा दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याच्या व्यवस्थापनावर आधारित विषयावर संशोधन करून त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. याच विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतल्या वर्षांना खास स्थान असतं, तिथल्या आठवणी आपण कायमच हृदयाच्या कप्प्यात जपलेल्या असतात. शालेय जीवनातल्या एका अल्लड प्रेमावर आधारित त्यांची ‘शाळा’ ही कादंबरी तुफान लोकप्रिय झाली होती आणि त्यावर आलेला मराठी सिनेमाही गाजला होता.
 
जयप्रकाशजींच्या आंदोलनात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचे अनुभव कथन करणारं ‘धुनी तरुणाई’ हे पुस्तक, वर्षातले बाराही महिने अंगावर गवत बाळगणाऱ्या ‘गवत्या’ डोंगराच्या पार्श्वभूमीवरची ‘गवत्या’ ही कादंबरी, गांधी-विनोबांनी मांडलेल्या ग्राम-स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या मेंढा गावची कथा सांगणारी ‘गोष्ट मेंढा गावाची’ ही कादंबरी आणि पती-पत्नीच्या नात्यात उठलेल्या एका वादळाची कथा सांगणारी ‘समुद्र’ ही कादंबरी. या कादंबरीवर बेतलेलं नाटकही गाजलं होतं.

एकम्, रणदुर्ग, साहित्य, भाषा आणि समाज, समुद्रापारचे समाज, उदकाचिया आर्ती, झेन गार्डन, जनाचे अनुभव पुसता, महेश्वर, नेचर पार्क, अशी त्यांची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(मिलिंद बोकील यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

मनोहर मुरलीधर शहाणे 

एक मे १९३१ रोजी जन्मलेले मनोहर शहाणे हे साठच्या दशकातले कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी नाटकंही लिहिली. त्यांनी नाशिकच्या ‘गावकरी’ वृत्तपत्रामध्ये वृत्तसंपादक म्हणून काम केलं होतं आणि पुढे दीर्घकाळ ‘अमृत’ या मराठी ‘डायजेस्ट’चे प्रमुख संपादक म्हणून काम पाहिलं. 

साठोत्तरी काळातलं त्यांचं लेखन काही बाबतींत काळाच्या पुढे होतं. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, राज्य नाट्य पुरस्कार, तसंच भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला होता. 

उद्या, अर्धुक, शहाण्याच्या गोष्टी, ब्रह्मडोह, उलूक, इहयात्रा, धाकटे आकाश, झाकोळ, अनित्य, आरसे, लोभ असावा, एखाद्याचा मृत्यू, आरोपी अनंत राघो, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(मनोहर शहाणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

मधू रामचंद्र लिमये 

एक मे १९२२ रोजी पुण्यामध्ये जन्मलेले मधू लिमये हे समाजवादी नेते, राजकीय आणि सामाजिक भाष्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या खासदारकीच्या काळात ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ म्हणून ते ओळखले जात. 

गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. सामाजिक न्यायासाठी आणि समतेसाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम केले. 

आत्मकथा, त्रिमंत्री योजना, स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा, कम्युनिस्ट पक्षाचे अंतरंग, राष्ट्रपिता, पेच राजकारणातले, कम्युनिस्ट जाहीरनाम्याची शंभर वर्षे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
आठ जानेवारी १९९५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(मधू लिमये यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link