Next
शेअर बाजाराची मदार पावसाळ्यावर
BOI
Sunday, June 10 | 03:45 PM
15 0 0
Share this story

रिझर्व्ह बँकेने वाढवलेले रेपो दर, जागतिक बाजारात इंधनाच्या दरात होणारे चढ-उतार याकडे शेअर बाजाराने दुर्लक्ष केले असून, शेअर बाजाराची सगळी मदार आता पावसाळ्यावर राहील. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.....
रिझर्व्ह बँक दर वर्षी फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबरमध्ये तिमाही आर्थिक धोरण प्रसिद्ध करते. त्याप्रमाणे या आठवड्यात शुक्रवारी हे धोरण जाहीर झाले. साडेचार वर्षांनंतर या वेळी रिझर्व्ह बँकेने रेपो व्याजदरात पाव टक्क्याने वाढ करून, तो सव्वासहा टक्के केला आहे. कर्जरोख्यांवरील परताव्यावर त्याचा परिणाम होईल व बँकांकडे वैधानिक तरलता परिमाणामध्ये (SLR) असलेल्या रोख्यांच्या किमती कमी होतील. त्यामुळे खरेदी रक्कम व चालू बाजारमूल्य यामधील फरक भरून, रोखे सध्याच्या किमतीला आणण्यासाठी बँकांना काही काळ दिला गेला आहे. रेपो दर वाढल्याने बँकांच्या कर्जावरील व्याजदर १० ते २५ पैशांनी वाढतील; पण ठेवींवरील व्याजदर कायम राहतील.

पेट्रोलच्या जागतिक किमती खूपच अस्थिर (volatile) आहेत. त्यामुळे त्या खाली-वर होतील तशा प्रकारे अर्थव्यवस्थेत फेरबदल होतील, असे मत रिझर्व्ह बँकेने नोंदवले आहे; पण या बाबींकडे शेअर बाजाराने काणाडोळा केला आहे. बाजाराची मदार सध्या पावसाळ्याच्या हालचालींवर राहील. गृहवित्त कर्जांमध्येही अनार्जित कर्जे वाढू शकतील व परवडणाऱ्या घरांसाठी कर्जे देताना बँकांनी सावधगिरीने पावले टाकायला हवी आहेत, असे तिचे मत आहे. बँकांनी गृहवित्ताबाबत हात आखडता घेतला, तर कर्जदार गृहवित्त देणाऱ्या नॉन बँकिंग कंपन्यांकडे वळतील. त्या कंपन्यांचा व्यवसाय वाढेल; पण त्याही मग कर्जावरील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

जे. कुमार इन्फ्रा कंपनीची मार्च २०१८ या तिमाहीची विक्री नऊ अब्ज रुपयांवर होती. त्यापैकी दीड अब्ज रुपयांची विक्री संयुक्त प्रकल्पातून झाली आहे. मार्च २०१७ तिमाहीपेक्षा कंपनीचा मार्च २०१८ तिमाहीचा नफा ९५ टक्के वाढला आहे. मुंबईची मेट्रो रेल आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथली कामे जोरात चालू आहेत. कंपनीकडे सध्या पावणेचार वर्षांत पुऱ्या करता येतील इतक्या ऑर्डर आहेत. कंपनीच्या शेअरचा भाव सध्या २७० रुपयांच्या आसपास आहे. तो वर्षभरात वाढून ४५० रुपयांच्या वर जाऊ शकेल.


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link