Next
डाउन सिंड्रोमग्रस्त स्वयमसमोर समुद्रही हरला..
BOI
Friday, July 13, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

स्वयम पाटील

असाध्य रोगावर मात करत आयुष्य जगणारे अनेकजण आपण पाहत असतो, मात्र आपल्याला असलेल्या विकाराची कोणतीही तमा न बाळगता क्रीडा क्षेत्रात असामान्य कामगिरी करणारा खेळाडू विरळाच. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील हा असाच एक खेळाडू... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या जलतरणपटू स्वयम पाटीलबद्दल...
.............
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नाशिक‘संक रॉक’ ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही जलतरण मोहीम अवघ्या एका तासात पार करत स्वयमने ‘लिम्का बुक’मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. नाशिकमधील महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी स्वयमला जलतरणाचे धडे दिले. त्याच्यात धाडस आणि जिद्द निर्माण करण्याचे काम स्वयमची आई विद्या आणि वडील विलास पाटील यांनी केले आणि एका असाध्य आजाराने ग्रस्त असलेला स्वयम जागतिक पातळीवर जलतरणात विश्वविक्रमवीर ठरला. 

सावरकर जलतरण तलावावर स्वयम रोज चार तास सराव करतो. या सरावात त्याला राजू वाईकर, राजेंद्र खरात, राजेंद्र निंबाळते तसेच सहकारी खेळाडू दिक्षांत भास्कर, सायली भदाणे आणि प्रज्ज्वल सोनजे यांचे सहकार्य मिळते. स्वयमने यापूर्वी बेळगाव, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि मालवण येथे झालेल्या राज्य व जिल्हा पातळीवरील जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. डाउन सिंड्रोम झालेली मुलेदेखील जिद्द आणि धाडस या बळावर अशक्यप्राय कामगिरी करून दाखवतात हेच स्वयमने सिद्ध केले व इतर खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केला.

मुंबईत स्वयमने संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे सागरी अंतर एका तासात पार करत विक्रमाला गवसणी घातली तेव्हा महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक उपस्थित होते. त्यानंतर त्याला लिम्का बुकतर्फे विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. डाउन सिंड्रोमग्रस्त असूनही असा विक्रम साकारणारा स्वयम पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला, हादेखील एक विक्रमच आहे.

नाशिकमधील राणेनगर येथील सेठ रामनाथ नारायणदास जाजू प्राथमिक शाळेत स्वयम इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. मुंबईतील विक्रमी कामगिरीनंतर स्वयमने कर्नाटकमध्येही आपला ठसा उमटवला. उडपी जलतरण महोत्सवात त्याने एक किलोमीटरचे सागरी अंतर विक्रमी वेळेत पूर्ण केले व आणखी एक मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात खोवला गेला. कर्नाटकचे तत्कालीन क्रीडामंत्री प्रमोद माधवराज यांच्या हस्ते स्वयमच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.

यानंतर स्वयमने आणखी एक विक्रमी कामगिरी करताना पोरबंदर येथील समुद्रात दोन किलोमीटरचे अंतर विक्रमी वेळेत पार केले. याच मोसमात त्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील विविध स्पर्धांत एकूण दहा सुवर्णपदक पटकावली. याचबरोबर एक रौप्यपदक आणि आठ ब्राँझपदकांचीही कमाई केली. दिव्यांग स्वयमच्या वाटचालीत त्याचे प्रशिक्षक आणि आई-वडील यांचे योगदान खूपच मोलाचे आहे. त्यांनीच त्याला जलतरणातील कारकिर्दीसाठी प्रेरित केले. त्याच्यात धाडस निर्माण केले व राज्याला एक विक्रमवीर खेळाडू गवसला.

स्वयम फाउंडेशन सुरू होणार
स्वयमच्या या सरस कामगिरीमुळे त्याचे आई-वडील खूपच प्रेरीत झाले असून त्यांनी त्यांच्याच मुलाच्या नावाने ‘स्वयम फाउंडेशन’ ही संस्था सुरू केली आहे. समाजातील अनेक दिव्यांग खेळाडूंना या फाउंडेशनच्या छत्राखाली आणून त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना क्रीडाक्षेत्रातील कामगिरीसाठी प्रोत्साहित करणे व आवश्यक ते सर्व सहकार्य करणे, हा या फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे. याबरोबरच डाउन सिंड्रोम वा अन्य असाध्य विकारांशी झगडत असलेल्या खेळाडूंना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हे फाऊंडेशन मदत करणार आहे. शिवाय नृत्य, मॉडेलिंग, सायकलिंगसह अन्य क्रीडाक्षेत्रासाठीही हे फाउंडेशन मदत करेल.

स्वयम आता केवळ नऊ वर्षांचा असला, तरी त्याला भविष्यात जलतरणात देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. या वयात त्याचे जलतरणातील कौशल्य आणि चापल्य पाहता, येत्या काळात तो राष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी सिद्ध करेल यात शंका नाही. जलतरणाव्यतिरिक्त स्वयम स्वतः चांगले नृत्य करतो, सायकलिंग स्पर्धेतही सहभागी होतो. त्याने यातही अनेक पुरस्कार मिळवले आहेत. स्वयमने मॉडेलिंगमध्येही काम केले आहे आणि आता अशाच इच्छुक मुला-मुलींना भविष्यात रोजगार मिळावा यासाठीही हे फाउंडेशन प्रयत्न करणार आहे.

स्वयमसारखे अनेक खेळाडू आज विविध आजारांनी पछाडलेले असूनही क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करताना दिसतात. भविष्यात सरकारी पातळीवर आणि खासगी पातळीवर अशा खेळाडूंना पुरस्कर्ते मिळाले तर स्वयमच नव्हे, तर त्याच्यासारखी कित्येक मुले दिव्यांगांच्या ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत धडक मारतील आणि देशाला पदके मिळवून देतील; मात्र यासाठी आवश्यकता आहे, ती राजाश्रय किंवा लोकाश्रय यांच्याबरोबरच प्रोत्साहनाची आणि आर्थिक मदतीची. यातूनच सामान्य खेळाडू असामान्य कामगिरी करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Bhaskar Nichit About 218 Days ago
excllent work
0
0

Select Language
Share Link