Next
‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’
BOI
Thursday, April 26, 2018 | 11:38 AM
15 0 0
Share this article:

सोलापूर येथे भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन करताना सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजय देशमुख.

सोलापूर :
‘सोलापूर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक व्हावी, त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी पणन मंडळामार्फत सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे,’ अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (पुणे) आणि कृषी उत्पन्न बाजार समिती (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील होम मैदान येथे आंबा महोत्सवाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते २३ एप्रिलला झाले. त्यावेळी ते बोलत. अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय देशमुख होते.

या वेळी व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, राज्य सहकारी बँकचे अविनाश महागावकर, लातूरचे माजी आमदार महादेश गुंडे, शहाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, मोहन निंबाळकर, अशोक गार्डी, यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक, आंबा उत्पादक शेतकरी, स्टॉलधारक व नागरिक उपस्थित होते.

पणन मंत्री देशमुख म्हणाले, ‘फळ हा नाशंवत माल आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांवर त्वरित प्रक्रिया झाल्यास व त्याची योग्यप्रकारे साठवणूक झाल्यास या मालाला चांगला भाव मिळेल. यासाठी स्थानिकस्तरावर सुविधा केंद्राची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल ग्राहकाला कोणत्याही मध्यस्थीशिवाय उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करत आहे. या महोत्सवातून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची सोय होते.’

ते पुढे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याला त्याच्या मालाचा हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांचा माल चांगल्या दराने विकला जावा यासाठी राज्यात हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हमीभाव केंद्रावरील भावापेक्षा जे व्यापारी कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. गतवर्षी सुमारे ७५ लाख क्विंटल तूर राज्य शासनाने हमी भावाने खरेदी केली आहे. यंदाही राज्य शासन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी करणार.’

‘ज्यावेळी शेतकऱ्याचा माल विक्रीसाठी उपलब्ध असतो त्यावेळी त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. यावर मात करण्यासाठी व शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाने शेती माल तारण योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेतून शेतकऱ्याला केवळ सहा टक्के दराने रक्कम मिळते,’ अशी माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

‘शेतकऱ्यांनी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी ठिबकचा वापर करावा. यासाठी शेततळे घेऊन पाणी बँक निर्माण करावी. जमिनीचा पोत, आवश्यक रासायनिक खते यांचा अभ्यास करून पीक पद्धतीचे नियोजन करावे. कार्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या आणि शेतकरी यांच्या सहयोगाने राज्यात नाशवंत मालावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यास पणन मंडळ प्रयत्न करणार आहे,’ असे त्यांनी या वेळी नमूद केले.

‘शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या हाती मिळावा यासाठी राज्यात आतापर्यंत सुमारे १३५ आठवडे बाजार सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेने शहरातील मैदाने आठवडा बाजारासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचा माल शहरवासीयांना योग्य आणि रास्त दरात उपलब्ध होईल. सोलापुरात भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवात ग्राहकांना चांगला दर्जेदार आंबा उपलब्ध होणार आहे. आंबा महोत्सवाला सोलापूरकरांनी उत्तम प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.  

पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘पणन मंडळामार्फत जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या फळ सुविधा केंद्रासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठीचा प्रस्ताव संबंधित विभागाने तातडीने पाठावा. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांच्या हाती मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात अनेक महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचविण्यासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक आहे.  शेतकरी हा अन्नदाता असून, त्याच्या जीवनात परिवर्तन व्हावे हीच या मागची भूमिका आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे. यावर्षी आज अखेर उजणी धरणामध्ये शिल्लक असलेले पाणी हे जिल्ह्यात यशस्वी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे फलित आहे.’

या प्रसंगी महापौर बनशेट्टी, प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून आंबा महोत्सवास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी स्वागत व प्रस्ताविक  केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 202 Days ago
How active is the centre now , a year after the launch ?
0
0

Select Language
Share Link
 
Search