Next
कोकणातील गावांत घुमत आहेत आरत्यांचे स्वर
BOI
Tuesday, September 18, 2018 | 03:00 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : गणेशोत्सव हा कोकणातील मोठा उत्सव. याची प्रचिती उत्सव साजरा करण्याच्या कोकणातील पद्धतींवरून येत असते. इतर अनेक गोष्टींप्रमाणेच आरत्या हेदेखील येथील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य. कोकणातील ग्रामीण भागातील बहुतांश घरांतील आरत्या केवळ झांजांच्या साह्याने पूर्ण होत नाहीत; तर त्यांना टाळ, पायपेटी किंवा पेटी, तबला, मृदंग अशा वाद्यांचीही साथ असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वांचा उत्साह. त्या उत्साहामुळेच या साग्रसंगीत आरत्या वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले असले, तरी अद्याप किमान पाच दिवसांचा उत्सव बाकी आहे. ग्रामीण भागातील घराघरांतून रात्रीच्या वेळी सामूहिक आरत्यांचे स्वर ऐकू येऊ लागले आहेत. सायंकाळी गणेशाची संगीत आरती करण्यासाठी प्रत्येक वाडीमध्ये गणेशभक्त फिरत आहेत. काही गावांत भाविक प्रत्येक घरी नियमितपणे पाच आरत्या म्हणण्यासाठी जातात. कोकणात हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी दाखल होतात. आरती चुकवायची नाही असा नेम सर्व जण करतात. यामुळे गावाची एकीसुद्धा जपली जाते.

गणेशगुळे येथे संगीत आरतीची परंपरा 
रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळच्या गणेशगुळे गावात ब्रह्मवृंदाच्या घरी गणपतीनिमित्त संगीत आरती, भजन करण्याची प्रथा अनेक वर्षे सुरू आहे. तबला, पेटीची साथ या आरत्यांना असते. काही ठिकाणी पायपेटीसुद्धा उपलब्ध असते. प्रत्येक आरती सुरेख चालीमध्ये म्हटली जाते. गणपतीबाप्पासोबत श्री शंकर, महालक्ष्मी, विठ्ठल, श्रीकृष्ण, संतमंडळी यांच्या विविध आरत्या वेगवेगळ्या चालींमध्ये म्हटल्या जातात. झांजा, टाळ आणि चकवा यांच्या लयबद्ध साथीमुळे या आरत्या श्रवणीय होतात. आरती म्हणताना सर्व लहान मुलेसुद्धा आनंदाने सहभागी होतात. हा वारसा हीच मुले पुढे नेतील, अशी खात्री ज्येष्ठ मंडळींना वाटते. 

गणेशगुळे गावात स्वयंभू गणपतीचे प्राचीन मंदिर आहे. हा गणपती गलबतवाल्यांचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तरीही काही ग्रामस्थ आपल्या घरी गणपती आणतात. दीड दिवस ते अकरा दिवस श्रींची पूजाअर्चा केली जाते. प्रत्येकाकडे दिवस ठरवून सर्व ब्रह्मवृंद एकत्र येऊन आरत्या, भजन करतात.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप शहरी भागात जास्त असले, तरी कोकणातील खेड्यापाड्यांत घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या सणानिमित्त बाहेर गावी असलेले कोकणवासीय एकत्र येतात. एकत्र कुटुंबांचा उत्सव एकाच घरात साजरा होतो. ग्रामीण भागात सर्रास प्रत्येक घरामागे एका गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत सकाळी व रात्री पूजा आणि आरत्या होतात. यामधील सकाळी होणारी पूजा व आरती प्रत्येक जण आपल्या कामावर जाण्याच्या सोयीनुसार करतो; मात्र संध्याकाळी होणारी पूजा आणि आरती ही सात ते नऊ या वेळेत केली जाते. या वेळेत प्रत्येक जण आपापल्या घरी असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या आरतीला ग्रामीण भागात अनेक जण एकमेकांच्या घरी जातात.

आबालवृद्ध या आरत्यांसाठी घरोघर फिरतात. आपल्या घरातील पूजा व आरती झाल्यावर प्रत्येक जण या गटात सहभागी होतो. टाळ, मृदंग, ढोलकी, झांजा घेऊन आरत्या केल्या जातात. गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक रात्री हा उपक्रम सुरू असल्याने प्रत्येक घरात प्रसादाचे वाटपही होते. रात्रीच्या वेळी शेवटच्या घरातील आरती झाल्यावर ठरल्याप्रमाणे सर्व जण एकत्र येऊन ठरलेल्या घरात भजनाचे कार्यक्रमही रात्रभर करतात. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणातील लोककला असलेल्या टिपरी व जाखडी नृत्याचेही कार्यक्रम रंगत असतात. त्यामुळेच कोकणातील गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे.

(गणेशगुळे येथील संगीत आरत्यांची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. )

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search