Next
‘चांगल्या आरोग्यासाठी चांगली जीवनशैली आवश्यक ’
डॉ. प्रवीण माने यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, January 02, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this article:

मसूर येथील व्याख्यानात बोलताना डॉ. प्रवीण माने.मसूर : ‘आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचे व रिपोर्ट नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य नव्हे. आपण आजारीच पडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे’,असा कानमंत्र ‘विश्वगण आयुर्वेद’चे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण माने यांनी दिला.

मसूर (ता. कराड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र तुकाराम चेणगे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त अष्टविनायक गल्लीतील दत्तमंदिरात ‘आरोग्यदायी जीवनशैली’ विषयावर डॉ. माने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

‘पूर्वी रोगजंतुमुळे आजार व्हायचे. आता जीवनशैली बदलल्यामुळे हृदयरोग, मधूमेह, रक्तदाब, निद्रानाश यासारख्या व्याधी होत आहेत. अयोग्य आहार, अयोग्य विचार, प्रतिकारशक्तीचा अभाव, अनुवंशिकता, अविचारी औषधे यामुळे आजार मागे लागतात. आजारी पडण्याची ही प्रमुख कारणे आहेत’, असे डॉ. माने यांनी नमूद केले.

‘उत्तम आरोग्यासाठी पहाटे साडेपाचच्या आत उठलेच पाहिजे. अभ्यंग, व्यायाम केला पाहिजे. दररोज सूर्यनमस्कार केल्यास विशेष फायदा होतो. दूध आणि मीठ, फळे आणि दूध, मासे आणि दूध, मध व गरम पाणी, चहा चपाती हे विरूध्द गुणधर्माचे अन्न असून, ते टाळले पाहिजे. भूक असेल तेव्हा व भूक असेल तेवढाच आहार घ्यावा. आहारानंतर आईस्क्रीम, फलाहार, कोल्ड कॉफी घेऊ नये. सकाळचे जेवण यथेच्छ जेवावे, तर रात्रीचे अत्यल्प. त्यामुळे आरोग्यदायी राहता येईल’, असे त्यांनी सांगितले. 

स्लाईड शोद्वारे त्यांनी श्रोत्यांना विषय सोप्या पद्धतीने समजावला. त्यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी गोपीनाथ कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. रामचंद्र चेणगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांना व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पाटील किवळकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

आयोजक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत बाजारे यांनी स्वागत केले, तर लालासाहेब अवघडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search