Next
नाशिक रोड प्रेसमध्ये छापल्या जाणार वीस रुपयांच्या नव्या नोटा
BOI
Saturday, May 18, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : नाशिक रोड येथील ‘नोट प्रेस’मध्ये वीस रुपयांच्या नव्या नोटांची छपाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. वीस रुपयांच्या ८०० दशलक्ष नवीन नोटा छापल्या जाणार असून ही संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. २०१९मध्ये म्हणजेच चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने वीस रुपयांची नवीन नोट चलनात आणण्याचे जाहीर केले होते.

महात्मा गांधींचे चित्र असलेल्या मालिकेतील या नोटेवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची स्वाक्षरी आहे. ही नोट हिरवट-पिवळ्या रंगात आहे. नोटेचे डिझाईन प्रेसला मिळाले असल्याने, छपाईचे काम कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. वीस रुपयांच्या नवीन ८०० दशलक्ष नोटांची छपाई केली जाणार असून त्यासाठी यंत्रणा व कामगार सज्ज आहेत. ‘ही नवी व मोठी जबाबदारी प्रेस कामगारांवर असून हे आव्हान ते योग्य रीत्या पेलतील’, असे मत कामगार नेते जगदीश गोडसे आणि ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केले आहे. 

इंग्रजांच्या काळापासून नोटांचा हा कारखाना नाशिक रोड याठिकाणी उभारण्यात आला आहे. सबंध भारताला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या प्रेसमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच केले जातात. कामगारही देण्यात आलेले उद्दिष्ट नेटाने पार पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कामगारांची गुणवत्ता ग्राह्य धरून सरकारने हे नवीन आव्हान प्रेसला दिल्याचे सांगितले जात आहे. 

यापूर्वी नाशिक रोड नोट प्रेसला १०, ५०, १००, २०० आणि ५००च्या नव्या डिझाईनमधील नोटा छपाईचे काम देण्यात आले होते. हे आव्हानही कामगारांनी पेलून दाखवले. आपली जबाबदारी पूर्ण केली. या आर्थिक वर्षात नाशिक रोड प्रेसला एकूण सहा हजार २०० दशलक्ष नोटा छपाईचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामध्ये वीस रुपयाच्या ८०० दशलक्ष नोटा तसेच पाचशे, शंभर, पन्नास व दहाच्या नोटांचा समावेश आहे.

देशात नोटांची छपाई करणाऱ्या एकूण चार प्रेस असून त्यांत रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालबोनी या दोन प्रेसचा तसेच प्रेस महामंडळाच्या नाशिक रोड आणि मध्य प्रदेशातील देवास येथील प्रेसचा समावेश आहे. या कामासाठी नाशिक रोड नोट प्रेसने आघाडी घेतली आहे. प्रेस महामंडळ हे सरकारी चलन तसेच पासपोर्ट, चेक, बाँड अशा सुरक्षाविषयक इतर कागदपत्रांची छपाई करते. 

प्रेस महामंडळाच्या देशभरात नऊ प्रेस असून, त्यांत हैदराबाद, मुंबई, कोलकता, नोएडा, देवास, होशिंगाबाद यांचा तसेच नाशिक रोडच्या ‘इंडिया सिक्युरीटी प्रेस’ (आयएसपी) व ‘करन्सी नोट (सीएनपी) प्रेस’चा समावेश आहे. आयएसपीमध्ये रेव्हेन्यू स्टँप, पोस्टल स्टँप, पोसपोर्ट, व्हिसा, चेक आदींची छपाई केली जाते. सीएनपीमध्ये चलनी नोटांची छपाई होते. त्यामध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे व पाचशेच्या नोटांचा समावेश आहे. वीस रुपयांची नोट लवकरच बाजारात येणार असून ही नोट आकर्षक असणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search