Next
पेण, पनवेल, उरण, घारापुरी...
BOI
Saturday, July 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अष्टागरांची माहिती घेतली. या भागात घेऊ या पेण आणि पनवेल परिसराची माहिती. 
..........
पनवेल, पेण हा शेतीप्रधान परिसर आहे. या भागात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते. तसेच मिठागरांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. या भागात कदंब, मौर्य, सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, मुघल, पोर्तुगीज, मराठे व शेवटी इंग्रज अशा राजवटी होऊन गेल्या. आगरी आणि कातकरी समाजही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. आचार्य विनोबा भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, रामभाऊ मंडलिक याच भागातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही यशस्वी मोहिमाही याच भागात पार पडल्या. उरण, रेवस, पेण, कर्जत, नाणेघाट, जुन्नर, पैठण असा जुना व्यापारी मार्ग होता. आता या भागात औद्योगिक वसाहती वाढत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे. पनवेलसारखी महानगरपालिकाही अस्तित्वात आली आहे. 

पेण : पेण म्हणजे विश्रांतीचे ठिकाण. बुद्धकाळापासून पेणला जुन्नर-पुणे-नगरपासून माल येत असे. बंदर म्हणूनही पेण हे मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. पेणजवळच अंबानदीची उपनदी असलेल्या भोगवतीच्या काठावर ‘अंतोरे’ नावाचे बंदर आहे. या बंदरातूनच रेवस खाडीतून व्यापार चाले. पेण हे अलीकडे प्रसिद्ध झाले ते गणपतीच्या मूर्तींमुळे, तसेच पेणचे पोहे आणि पापडामुळे. 

करणाई देवी मंदिरगणेश भिकाजी देवधर यांनी येथील मूर्ती उद्योगाचा पाया घातला. ते विजयदुर्गहून १८८५मध्ये मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यास आले आणि त्यांनी पेण येथे मोल्ड वापरून मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. नारायण गणेश देवधर यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यास सुरुवात केली. त्यांना १९४०मध्ये प्रभात फिल्म कंपनीकडून संत ज्ञानेश्वर चित्रपटासाठी ५०० मुखवट्यांची ऑर्डर मिळाली. आज अनेक कला केंद्रे पेणमध्ये उभी राहिली आहेत. आज पेणच्या आसपासच्या भागातील २५ हजार कलाकार मूर्ती करण्याच्या कामात गुंतले आहेत. साधारण १० ते १५ कोटींची उलाढाल येथे होते. परदेशस्थ महाराष्ट्रीयन येथून मूर्ती मागवितात. 

नुसतेच गणपती नाही, तर संत मीराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, श्री साईबाबा, ज्ञानेश्वर, विवेकानंद, अनेक देवदेवता यांच्याही सुरेख मूर्ती येथे तयार होतात. येथे जवळजवळ ७५ ते ८० प्रकारचे पापड तयार होतात. पोह्याच्या गिरण्याही येथे आहेत. पानिपतच्या लढाईत वीरगती मिळालेल्या सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई या पेणमधील कोल्हटकर घराण्यातील होत्या. 

वासुदेव बळवंत फडके यांचे घर, शिरढोण
आचार्य विनोबा भावे यांचे गागोदे हे गावही पेणजवळच आहे. पेण व आसपासच्या भागात शिलाहारकालीन मंदिरांचे अवशेष आहेत. शहरातील वाकेश्वर (म्हणजेच आताचे वाकरूळ गाव), दांडेश्वर (रामेश्वर) व व्याघ्रेश्वर, गोटेश्वर, पाचणोलीचे पाटणेश्वर ही मंदिरे त्या काळातली आहेत. अनेक शिवमंदिरे मलिक कपूर व निजामशाही सैन्याने वेळोवेळी राजपुरीवर केलेल्या स्वारीच्या वेळी पाडून, मोडून टाकलेली आहेत. 

पेणमध्ये पूर्वी एक किल्लाही होता. तेथे सध्या एक तहसीलदार कचेरी आहे. शिवाजी महाराजांचे सैन्य व मुघलांचे तुंबळ युद्ध येथे झाले होते व ही लढाई जिंकली होती. त्या वेळी सरदार वाघोजी तुपे यांनी मोठी कामगिरी केली होती. त्यात ते जखमी झाले होते व त्यातच त्यांचा अंत झाला. छत्रपती शिवाजी महाराज येथे दोन वेळा येऊन गेले होते. 

वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळाशिरढोण : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे हे जन्मठिकाण. फडके यांचे क्रांतिकार्य सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांचे राहते घर स्मारक म्हणून जपून ठेवण्यात आले आहे. फडके लहानपणी बोकडाच्या गाडीतून फिरत असत. ती गाडीही येथे आहे. मुंबई-गोवा महामार्गावावर पनवेल जवळच हे ठिकाण आहे. जवळच कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला आहे. 

विक्रम विनायक मंदिर, साळवविक्रम विनायक मंदिर, साळव : विक्रम इस्पात कंपनीच्या परिसरात हे सुंदर, देखणे मंदिर एका टेकडीवर आहे. आकर्षक पद्धतीने चेकर्ड फरश्या वापरून पायऱ्या बांधल्या आहेत. बाजूने सुंदर बगीचा आहे. बागेत आदित्य बिर्ला यांचा पुतळा आहे. अलिबागपासून २० किलोमीटर अंतरावर कुंडलिका नदीच्या दक्षिणेस रेवदंडा ब्रिजच्या डाव्या बाजूला हे ठिकाण आहे. 

नागोठणे : हे गाव पूर्वी अंबा नदीवरील बंदर होते. साधारण सन १९१४पर्यंत गलबते येथपर्यंत येत असत. धरमतर खाडीमध्ये वाळू भरल्याने अंबा नदी या ठिकाणी जलवाहतुकीसाठी योग्य राहिली नाही. रिलायन्स उद्योगसमूहाचा खनिजतेल शुद्धीकरण कारखाना व कारखान्याची सुंदर वसाहत हे येथील आकर्षण आहे. वसाहतीमध्ये शहरापासून दूर राहिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी रंगीत कारंजे असलेला सुंदर बगीचा, तसेच करमणुकीसाठी चित्रपटगृह, खेळांच्या सुविधा, जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज रुग्णालय, मुलांसाठी नर्सरी, तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा व्यवस्थापनामार्फत चालविली जाते. 

मुसलमान ब्रिज, नागोठणेमुसलमान ब्रिज, नागोठणे : हा पूल नागोठणे पूल म्हणूनही ओळखला जातो. हा ऐतिहासिक पूल सन १५८०मध्ये निजामाचा चौल येथील सरदार अल्लुद्दीन याने बांधला. पोर्तुगीजांबरोबर सामना करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. ४८० फूट लांब, १९ फूट उंच व नऊ फूट नऊ इंच रुंदीचा हा पूल ४०० वर्षांचा साक्षीदार आहे. इतिहासप्रेमी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. 

पनवेल : मुंबई-पुणे मार्गावरील हे एक महत्त्वाचे ठिकाण. येथूनच गोव्यासाठी हमरस्ता सुरू होतो. २५ ऑगस्ट १८५२ रोजी स्थापन झालेल्या नगरपालिकेचे सन २०१६मध्ये महानगरपालिकेत रूपांतर झाले आहे. पनवेल हे कोकण रेल्वेवरील मोठे जंक्शन आहे. दिल्लीपासून त्रिवेंद्रम, तसेच पुण्यापर्यंत हे रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. पनवेल हे आयुर्वेदिक, तसेच अॅलोपॅथी औषधनिर्मितीचे केंद्र आहे. चिमाजी आप्पांनी खोदलेला वडाळे तलाव, याशिवाय जुनी मंदिरे, अशोक बाग अशी भेट देण्यासारखी ठिकाणे येथे आहेत. मुंबई अगदी जवळ असल्याने येथून मुंबईला येऊन-जाऊन काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ही सर्व महानगरे पनवेलजवळ येतात. लवकरच येथे आर्ट गॅलरी सुरू करण्यात येणार आहे. 

कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला :
किल्ल्यामध्ये दिसून येणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडक्या स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा सुळका प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५७मध्ये हा किल्ला घेतला. कर्नाळा अभयारण्याच्या परिसरातच हा किल्ला आहे. त्यामुळे किल्ला व अभयारण्य या दोन्ही गोष्टी पाहून होतात. अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या आकारामुळे याचे वेगळेपण जाणवते. करणाई देवी मंदिर, तटबंदीचे जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या अद्यापही पाहण्यास मिळतात. बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती झाली. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला लढवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. 

कर्नाळा

कर्नाळा अभयारण्य :
येथे वर्षभरात हंगामाप्रमाणे सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस किलोमीटर परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई-चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज, मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लायकॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजरे, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. जंगल परिसरात विविध औषधी वनस्पती आहेत. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, ताम्हण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. कर्नाळा किल्लाही याच परिसरात आहे. 

कर्नाळा

न्हावा शेवा बंदर (JNPT)
: न्हावा शेवा हे‘जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) म्हणूनही ओळखले जाते. मुंबई बंदरावरील बोजा कमी करण्यासाठी, तसेच रेल्वेने मुंबईमधून इतरत्र वाहतूक करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारला गेला. जगातील अत्याधुनिक बंदरांमध्ये याचा समावेश होतो. न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रावरील हे बंदर ठाणे खाडीतील न्हावा व शेवा या दोन गावांमधील जमिनीत घुसलेल्या समुद्राच्या पाण्यावर उभे केले आहे. आपल्याला घारापुरी बेटावरूनही हे बंदर दिसते. कोणत्याही बंदराला भेट देणे खूप आनंददायी असते. बोटीवर कंटेनर चढविले आणि उतरविले जात असतात, ते काम पाहण्यात खूप मजा येते. अजस्र क्रेन, कंटेनर्स उचलून बाजूला ठेवणारी अवजड मशिनरी यांचे काम तोंडात बोट घालायला लावते. बंदराच्या बाहेर कंटेनर वाहतूक करणारे हजारो मोठे ट्रक्स उभे असतात. 

उरण : उरण हे पुरातन शहर आहे. देवी उरणवतीवरून उरण हे नाव पडले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात उरुवन असेही नाव प्रचलित होते. अनेक भारतीय राजवंशांनी येथे शासन केले आहे. सुरुवातीच्या इतिहासात, मौर्य साम्राज्य, सातवाहन साम्राज्य, पश्चिमी क्षत्रप, वाकाटक साम्राज्य, चालुक्य आणि यादव यांचा समावेश होता. १५व्या शतकात पोर्तुगीज व पाठोपाठ इंग्रजही आले. पोर्तुगीज उरण म्हणत, तर इंग्रज ओरण म्हणत. सतराव्या शतकाच्या अखेरी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमारी नेतृत्व उदयास आल्यावर त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रज यांना हुसकावून लावले. पोर्तुगीज आणि इंग्रज येथून स्थलांतरित झाले. त्यामुळे पोर्तुगीज वास्तव्याच्या खाणाखुणा दिसून येतात. त्या काळात बांधलेली चर्च अद्यापही आहेत. 

उरणचा कोट : आत्ताच्या उरणमध्ये कोटनाका आहे. पूर्वी येथे किल्ला होता. पोर्तुगिजांनी येथे किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. किल्ल्याला भक्कम तटबंदी, दिंडी दरवाजा, शस्त्रागार, दारूगोळा व दफ्तरखाना ठेवण्यासाठी भक्कम शिबंदी होती. १० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट जिंकल्याचा उल्लेख आहे. सध्या किल्ल्याची एक भिंत अस्तित्वात आहे. 

करंजा बंदर : उरणला लागूनच दक्षिणेला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सन १५३४मध्ये पोर्तुगीजांकडे याचा ताबा आला. रेवस, करंजा, भाऊचा धक्का अशी वाहतूक चालू असायची. मांडवा बंदरामुळे यावर परिणाम झाला असला, तरी थोडी-फार वाहतूक चालू असते. अवर लेडी ऑफ चर्चची उभारणीही पोर्तुगीज राजवटीत झाली. तशीच अनेक चर्चेस करंजामध्ये होती. त्यांचे अवशेषही दिसून येतात. 

मोरा बंदर : हे बंदर चंद्रगुप्त मौर्याने वसविले. उरण वसण्यापूर्वी मोरा बंदर होते. मौर्य या शब्दावरून मोरे नाव पडले. 

द्रोणागिरी किल्ला

द्रोणागिरी किल्ला :
हा किल्ला उरण शहराजवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. बहुधा यादव काळात याची उभारणी झाली असावी. उरण आणि करंजाच्या जवळ असल्याने हा किल्ला जुन्या काळापासून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. संपूर्ण टेकडी जंगलाने झाकलेली आहे. किल्ला देवगिरीच्या यादवच्या राजवटीखाली होता. १५३०मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला दुरुस्त केला. १५३५मध्ये फादर एंटोनो-डी-पोर्टोने येथे तीन चर्चेस बांधली. 

त्यानंतर आदिलशहाने किल्ला जिंकला आणि काही काळ त्याच्या ताब्यात होता. अखेरीस तो ब्रिटिशांच्या हातात गेला. १० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे याने या किल्ल्यासह उरण किल्ला घेतला. किल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष आढळतात. बहुतेक इमारती व चर्च अवशेष स्वरूपात आहेत. 

पिरवाडी बीच

पिरवाडी बीच :
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील हा सुंदर सागरकिनारा असून, येथून सूर्यास्ताचे सुंदर दर्शन होते.

माणकेश्वर बीच : पिरवाडी बीचच्या उत्तरेला जवळच हा सुंदर सागरकिनारा आहे. 

रत्नेश्वरी देवीचे मंदिर

जसखार :
उरणजवळ न्हावा शेवा परिसरात हे ठिकाण असून, येथे रत्नेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. उरण तालुक्यातील हे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर उरण तालुक्यातील जसखार या गावामध्ये उरण शहरापासून मुख्यत्वेकरून दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिरामध्ये दर वर्षी चैत्रकलाष्टमीला देवीची यात्रा भरविण्यात येते. 

घारापुरी

घारापुरीची लेणी :
ही लेणी उरण तालुक्यात आहेत. परंतु सध्या मुंबईहून गेट वे ऑफ इंडियापासून प्रवासी बोटी निघतात. त्याला साधारण एक ते दीड तास लागतो; पण पनवेल भागातूनही हे ठिकाण जवळ आहे. घारापुरी बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किलोमीटर आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किलोमीटर असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातील मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव नि मुघल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले. सन १७७४मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापन केले. १९८७ साली या लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. 

हत्तीचे शिल्पघारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. एलिफंटा लेण्यांची निर्मिती इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान झाली असावी. येथे एक शिलालेख सापडला होता. तो पोर्तुगीजांनी लिस्बनला पाठवला, तो गहाळ झाला. तो सापडला असता, तर याचा कालावधी आणि ती कोणी केली याचा मागोवा घेता आला असता. ही शैव लेणी असून, एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. येथे एकूण पाच लेणी आहेत. त्यात शिवकथा कोरल्या आहेत. 

मुख्य गुहा अथवा शिवगुंफा भव्य असून, तिला महाकाय गुहा असे म्हणतात, ती ३९. ६३ चौरस मीटर आहे. २७ चौरस मीटरचा मंडप आहे. या लेण्यात भव्य दालन असून, मध्यभागी एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून, त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. 

रावणानुग्रहदुसऱ्या गुहेमध्ये रावण कैलास पर्वत उचलतो आहे असे दाखविले आहे. शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे. शंकर बावरलेल्या पार्वतीला एका हाताने आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.  

विवाह मंडल ही तिसरी महत्त्वाची गुंफा. येथे घारापुरीच्या लेण्यांतील सर्वोत्कृष्ट लेणे आहे. शंकर-पार्वती विवाह यात दाखविला असून, देव-देवता विवाह समारंभाला उपस्थित राहिले, हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे. इतर लेण्यांमध्ये मानवती पार्वती, गंगावतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात.

शिवपार्वती विवाहसमुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. हे पक्षी फेकलेले अन्नपदार्थ लीलया हवेतच उचलतात. सध्या तरी मुंबईमार्गे जाणे सोईस्कर आहे; मात्र लवकरच उरण येथून पर्यटकांसाठी व घारापुरीतील लोकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटसेवेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. (घारापुरी लेण्यांबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रसेश्वर, रसायनी : हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स ही भारत सरकारची अंगीकृत कंपनी होती. १९६० साली सुरू झालेला कारखाना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. रसायनी वसाहतीमध्ये शंकराचे मंदिर उभारले असून, त्याला ‘रसेश्वर’ असे नाव ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी दिले. 

कसे जाल पनवेल, उरण परिसरात?
पनवेल हे कोकण रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असून, उत्तर भारतापासून त्रिवेंद्रमपर्यंत रेल्वेने जोडलेले आहे मुंबई-पुणे मार्गावरील हे प्रमुख ठिकाण असून, गोव्याला जाण्यासाठी येथूनच महामार्ग सुरू होतो. जवळचा विमानतळ मुंबई - ३५ किलोमीटर. नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होत आहे. पनवेलमध्ये चांगली हॉटेल्स व भोजनाची उत्तम सोय आहे. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून वर्षभरात कधीही जाण्यास योग्य. 

(या भागासाठी नागोठणे शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी सोमण यांनी काही माहिती दिली.)

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 54 Days ago
Gharapuri caves . Some evidence of destruction is visible. The Portuguse were the perpetrators . the Company was , essentially , Interested in trade . Unlike the Portuguse . The latter looked upon themselves as Conquerors . The Company did not . Dividends to the shareholders -- that was their main concern .
0
0
सुधीर विनायक पोवळे About 64 Days ago
पेण जवळ वरसई गावाची माहीती दिली असती बर झाल असत. गावात पेशवे कालीन श्री वैजनाथाचे देऊळ महाराजांच्या पदस्पर्शाने झालेला माणिकगड साकसईचा किल्ला आहे.फडक्यांनी बाॅम्बची चाचणी ईथे केली.माधवराव पेशवेंची मुंज ह्याच गावात लागली.
0
0
Mahesh Kalburge About 67 Days ago
अतीशय उपयुक्त आणि छान माहिती दिली आहे. धन्यवाद...
0
0

Select Language
Share Link
 
Search