Next
चंबळच्या खोऱ्यातील भिंड आणि अटेर
BOI
Wednesday, February 14 | 06:45 AM
15 0 0
Share this story

चंबळच्या खोऱ्यातील भिंड आणि अटेर
‘करू या देशाटन’
या सदराच्या माध्यमातून आपण सध्या मध्य प्रदेशातील विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांची सैर करत आहोत. आज फिरू या चंबळ नदीच्या खोऱ्यातील भिंड, अटेर आणि आसपासच्या ठिकाणी...

..............
भिंड, मुरेना हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चंबळच्या खोऱ्यातील प्रदेश. छोट्या टेकड्यांमुळे (बिहड) येथे पूर्वी डाकूंची वस्ती होती. अगदी २५ वर्षांपूर्वीपर्यंत ही वस्ती होती. माधोसिंगसारखे कुविख्यात डाकू या भागात रॉबिन हूडसारखे प्रसिद्ध झाले होते. भिंड हे नाव भिंडी ऋषींच्या नावावरून पडले. भिंड हे ठिकाण प्रसिद्ध आहे तेथे असलेल्या पृथ्वीराज चौहान यांच्या आगळ्यावेगळ्या स्मारकासाठी.

वनखंडेश्वर मंदिरपृथ्वीराज चौहान यांचे स्मारक
या लाडक्या राजाच्या स्मरणार्थ ११९२पासून आजतागायत येथे अखंड ज्योत प्रज्ज्वलित ठेवण्यात आली आहे. असे म्हणतात, की महंमद घोरीने त्याला व त्याच्या मित्राला कैद करून गझनीला नेले आणि तेथे त्याचे डोळे काढले होते. पृथ्वीराज डोळे बांधून निशाणा साधत असे, अशी त्याची ख्याती होती. या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी घोरीने त्याच्या हाती धनुष्यबाण दिला. त्या वेळी त्याचा मित्र चंद्र बरदाई याने काव्यरूपाने पृथ्वीराजाला सूचित केले आणि राजाने घोरीचा वेध घेऊन त्याला ठार केले. त्यानंतर मित्रासह एकमेकांना कट्यारीने भोसकून त्यांनी एकमेकांना संपवले. याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. काहींच्या मते पृथ्वीराजाला अजमेर येथेच मारण्यात आले.

चार बांस चौबीस गज, अंगुल अष्ट प्रमाण,
ता ऊपर सुल्तान है, मत चुके चौहान।


या काव्याच्या ओळीतून चंद्र बारदाई याने घोरीच्या ठिकाणाबद्दल पृथ्वीराजाला सूचित केले, असे म्हणतात. हा दिवस वसंत पंचमीचा होता. तेव्हापासून भिंड येथील गौरी सरोवराजवळील वनखंडेश्वर मंदिरात अखंड ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे. हे देऊळ पृथ्वीराजानेच बांधले आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते पृथ्वीराजाबरोबरची संयुक्ता हे काल्पनिक पात्र आहे; तसेच पृथ्वीराजची बलिदान कथाही खोटी आहे. ते काहीही असले, तरी ही ज्योत मात्र गेले ९२० वर्षे तेवत आहे, हे मात्र खरे.

भिंडमधील प्रेक्षणीय ठिकाणे :
भिंड किल्लाभिंड किल्ला : हा किल्ला गोपालसिंह भदोरिया याने इ. स. १७००मध्ये बांधला. तो ओरछा-दिल्ली मार्गावर असल्याने त्याचे खूप महत्त्व होते. येथे भिंडी ऋषींचे मंदिर आहे. संकटकाळी बाहेर जाण्यासाठी किल्ल्यावर भुयारे आहेत. राजाच्या विहारासाठी तेथे तलावही बांधण्यात आला होता. तसेच अनेक सुंदर इमारतीही होत्या. सध्या तेथे जिल्हाधिकारी कार्यालय आहे.

सायना माहेगांव येथे नृसिंह मंदिर आहे. गौरी सरोवर, गौरी सरोवर पार्क, अटेर किल्ला, दंदरौआ मंदिर, जामनावाले हनुमानजी अशी अन्य ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत.

अटेर किल्लाअटेर किल्ला : भदोरिया घराण्यातील भदनसिंग याने इ. स. १६४४मध्ये बांधण्यास सुरुवात केली आणि महासिंग याने १६६८मध्ये पूर्ण केला. तो अत्यंत बळकट असा किल्ला होता. किल्ल्यावरील दिवाण-ए-खास व दिवाण-ए आम आता भग्नावस्थेत असले, तरी किल्ल्याच्या वैभवाची साक्ष देतात. तेथील खुनी दरवाजा प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या दरवाज्यावर बकऱ्याचे शिर कापून लावले जायचे. त्यातून रक्त पडायचे ते खाली एका कटोऱ्यात घेतले जायचे. ते रक्त राजा आपल्या कपाळी लावायचा. म्हणून त्याला खुनी दरवाजा हे नाव पडले. या दरवाज्यातून सामान्य लोकांना येण्याची बंदी असे. हा किल्ला मुघल आणि हिंदू संस्कृतीची छाप असलेला आहे. अटेर हे महाभारतात देवगिरी म्हणून ओळखले जायचे, तसेच त्याला भद्रावर्त असेही संबोधले जायचे. युधिष्ठिर राजाला एका यज्ञात येथील रत्न, सुवर्ण भेट दिल्याचा उल्लेख आहे.

येथील लोकांनी गुप्त खजिन्याच्या हव्यासापोटी अनेक ठिकाणी उकरून ठेवल्याने किल्ल्यातील इमारतींना, तळघरांना धोका निर्माण झाला आहे. हा किल्ला भिंडपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

अलामपूरअलामपूर : येथे पेशवाईतील सरदार मल्हारराव होळकर यांची छत्री आहे. २० मे १७६६ रोजी त्यांचे येथे निधन झाले. अहिल्याबाईंनी त्यांच्या स्मरणार्थ येथे छत्री उभारली आहे. हे ठिकाण भिंडपासून ११० किलोमीटर अंतरावर आहे.जामदरा जामदरा: हे ठिकाण भिंडपासून ३५ किलोमीटरवर असून, येथे रेणुकामाता मंदिर आहे. स्थानिक लोक या ठिकाणाला परशुरामाची जन्मभूमी समजतात.

गोहाड किल्ला : हा किल्ला इ. स. १५०५मध्ये राजपूत जाट राजांनी बांधला. या किल्ल्यात जाट राजांनी अनेक देवळे, छत्रमहाल, शीश महाल, राणीगुरू मंदिर, मोदी की हवेली अशी बांधमकामे केली. जाट राजांनी सुमारे ३०० वर्षे राज्य केले. इंग्रजांनी तो किल्ला १७ फेब्रुवारी १८०६ रोजी ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्याकडे दिला.

गोहाड किल्लाकसे जायचे?
पुणे-मुंबई नागपूरकडून भिंड व अटेर येथे जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन ग्वाल्हेर हे आहे. तसेच उत्तर प्रदेशातील इटावा हे रेल्वे स्टेशन कानपूर-अलाहाबाद मार्गावर आहे. जवळचा विमानतळ ग्वाल्हेर येथे आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

अटेर किल्ला

(भिंड-अटेर या भागांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kamalsing R Patil About 182 Days ago
छान माहिती सर
0
0

Select Language
Share Link